अमरावती 18 मार्च : ज्या मुलीला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं, शिकवलं तिलाच एका कुटुंबानं अचानक गमावलं. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तिची अधिकारी होण्याची इच्छा होती, ती इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करण्याचं स्वप्न एका अपघाताने क्षणार्धात भंगलं. अचलपूर तालुक्यातील हनवत खेडा येथील प्रतीक्षा राजेंद्र गावंडे असं या अपघातात जीव गमावलेल्या तरुणीचं नाव आहे. मृतक प्रतीक्षा ही परतवाडा येथील भगवंतराव शिवाजी पाटील महाविद्यालयात एम. कॉमला शिकत होती.
मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे वर भीषण अपघात; 3 जण जागीच ठार
नेहमीप्रमाणे सकाळी प्रतीक्षा आपल्या दुचाकीने घरून महाविद्यालयात जायला निघाली. वाटेतच एमएच २७ एक्स ६८५६ क्रमांकाच्या टिप्परने तिला चिरडलं. त्यात टिप्परच्या मागच्या चाकाखाली आलेल्या प्रतीक्षाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर टिप्पर चालक तिथून पळून गेला. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत माहिती मिळताच परतवाडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि मृतदेहाला शवविच्छेदनासाठी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आलं. पोलिसांनी टिप्परचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
प्रतीक्षा ही शेतकरी कुटुंबातील होती, तीन भावंडांमध्ये सर्वात लहान होती. तिच्यापेक्षा मोठ्या बहीण आणि भावाचं लग्न झालं होतं. प्रतीक्षाला एम. कॉम. पूर्ण करायचं होतं. ती एक हुशार, अभ्यासू आणि हसमुख विद्यार्थिनी होती. चांगली नोकरी मिळावी, असं स्वप्न तिने पाहिलं होतं , स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने स्पर्धा परीक्षेचा अभ्यासदेखील सुरू केला होता. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करून अधिकारी होण्याची स्वप्न प्रतीक्षा बघत होती. मात्र टिप्पर तिच्यासाठी काळ बनून आला आणि प्रतीक्षा तसंच तिच्या कुटुंबीयांच्या स्वप्नाची राखरांगोळी केली.
5 दिवसांची झुंज संपली, 13 वर्षांच्या शिवभक्त आर्यनने सोडले प्राण, पुणे हळहळलं
रस्त्यावर काही लोकांनी सर्रास अतिक्रमण केलं आहे. त्यामुळे रस्ता अरूंद झाला आहे. भविष्यात अपघात होऊन जीवितहानी होऊ शकते, याची कल्पना आल्याने हनवतखेडा येथील सरपंच सुनील ढेपे यांनी काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग, अचलपूर व अन्य यंत्रणांना पत्र देऊन सावध केले होते. मात्र, एखाद्या पत्राची सहजतेनं दखल घेईल ती सरकार यंत्रणाच कसली. त्याची दखल न घेतल्याने एका विद्यार्थिनीला आपला जीव गमवावा लागला, तर तिच्या कुटुंबियांना घरातली हसती खेळती मुलगी गमवावी लागली. या अपघाती मृत्यूने संपूर्ण परिसरात हळूहळू व्यक्त केली जात असून शासकीय यंत्रणेवर रोष व्यक्त केला जात आहे, तिच्यासारखे आणखी किती बळी घेणार असाही प्रश्न यानिमित्ताने या परिसरातील नागरिक विचारत आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.