मुंबई, 3 जुलै, प्रणाली कापसे : अजित पवार यांनी राष्ट्रवादीमधून बंडखोरी केल्यानं राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. पक्षातील काही प्रमुख नेते आणि अनेक आमदार हे अजित पवार यांच्यासोबत असल्याचं पहायला मिळत आहे. मात्र त्यातच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठा दावा केला आहे. जे आमदार अजित पवारांसोबत गेले आहेत, ते पुन्हा राष्ट्रवादीत परतण्यासाठी एका मर्यादेपर्यंत थांबू, अनेक जण संभ्रमामुळे तिकडे गेले आहेत. ते सगळे जण मला फोन करत आहेत, सर्वजण शरद पवार यांच्यासोबतच असल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला आहे. नेमकं काय म्हणाले जयंत पाटील? ज्या आमदारांनी बंडखोरी केली आहे, ते आमदार परत एकदा राष्ट्रवादीमध्ये परतण्यासाठी एका मर्यादेपर्यंत थांबू. त्यानंतर कारवाईचा निर्णय घेऊ, अनेक जण संभ्रमामुळे तिकडे गेले होते. ते सगळे मला फोन करत आहेत. सर्व जण शरद पवारांसोबत आहेत. आम्ही विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून कारवाई करण्यास सांगितलं आहे. निवडणूक आयोगाकडे आज तक्रार दाखल करणार आहोत. राष्ट्रवादीच्या आमदारांना 5 जुलैपर्यंतचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. त्याच दिवशी दोन्ही बैठकांचं नियोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे कोण कोणत्या बैठकीला जात ते बघू आणि करावाई करू असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान राष्ट्रवादीमध्ये झालेल्या बंडानंतर काँग्रेसकडून प्रदेशाध्यपदावर दावा करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यावर देखील जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांच्याकडे नंबर असतील त्यांचा विरोधी पक्षनेता होईल. आम्हाला काँग्रेससोबत वाद घालायचा नाही, आम्ही चर्चा करू ठरवू असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.