अकोला : सध्या राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आहे. अकोल्यामध्ये पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आता हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे. सावरकरांनी इग्रजांना पत्र लिहीलं. सावकरांनी पत्राच्या माध्यमातून माफीनामा सादर केला. त्यांनी इंग्रजांची मदत केली असं वादग्रस्त वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं आहे. सोबतच हिंमत असेल तर भारत जोडो यात्रा आडवून दाखवा असं आव्हानही राहुल गांधी यांनी भाजपाला केलं आहे.
वाद पेटणार
दोनच दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल वादग्रस्त व्यक्तव्य केलं होतं. आंदमानात असताना सावरकर यांनी इंग्रजांना पत्र लिहीलं. तुम्हाला जे घ्यायचं ते घ्या पण माझी सुटका करा असं सावरकर यांनी या पत्रात म्हटल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला होता. त्यावरून राजकारण तापलं असतानाच आता पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यावरून आता भाजप अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारवर घणाघात
पुढे बोलताना राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर देखील जोरदार टीका केली आहे. राज्यात रोजगार नाही. शिक्षण घेऊनही नोकऱ्या मिळत नसल्यानं तरुण पिढी नैराश्यात आहे. महागाई वाढली आहे. सरकारी शाळा बंद करण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे. सरकारी शाळा बंद झाल्या तर गरिबांनी कुठे शिकायचं असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा : तेव्हा बाळासाहेबांनी त्यांना जोडे मारले होते, आज नातू..., राम कदमांचा आदित्य ठाकरेंना टोला
संसदेत बोलू दिलं जात नाही
सत्ताधाऱ्यांकडून न्यायव्यवस्थेवर दबाव आणला जात आहे. आम्हाला संसदेत बोलू दिलं जात नाही. त्यामुळे आता जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी यात्रेशिवाय दुसरा पर्याय उरला नसल्यांचही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. त्यांनी थेट भाजपलाच भारत जोडो यात्रा आडवून दाखवा असं आव्हान केलं आहे. त्यामुळे आता भाजप नेते राहुल गांधी यांच्या या आव्हानाला काय प्रत्युत्तर देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Akola, BJP, Devendra Fadnavis, Rahul gandhi, काँग्रेस