मुंबई, 21 जून : राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे सध्या संकटात सापडलं आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे काही आमदारांसह सूरतमध्ये निघून गेले आहेत. त्यामुळे हे सरकार संकटात आलंय. राज्यातील राजकारणात वेगानं घडामोडी घडत असतानाच अकोलामध्येही वेगळचं नाट्य रंगलं आहे.
अकोल्यातील बाळापूरचे शिवसेना आमदा नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांच्या पत्नीनं पोलिसांमध्ये पती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे. देशमुख यांचा फोन मंगळवारपासून बंद आहे, असं त्यांच्या पत्नीनं सांगितलंय. याबाबत माध्यमांशी अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिलाय.
कुठे आहेत देशमुख?
शिवसेना आमदार नितीन देशमुख हे सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत सूरतमध्ये असल्याची माहिती आहे. बुधवारी सकाळी देशमुख यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्यांच्या प्राथमिक उपचार करण्यात आले होते. पण दुपारी पु्न्हा एकदा त्रास उदभवल्यामुळे नितीन देशमुख यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नितीन देशमुख यांची प्रकृती ठीक असल्याचे सांगितले जात आहे.
नाराज एकनाथ शिंदे पुढे काय करणार? बंड मागे घेण्यासाठी ठेवल्या 'या' अटी
एकनाथ शिंदे कोणत्याही पक्षासोबत जाणार नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जायचं नाही, अशी त्यांची मागणी आहे. त्याचबरोबर शिवसैनिकांवर अन्याय होता कामा नये, तसंच शिवसेना आमदारांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे या मागणीवर ते ठाम आहेत. शिंदे चर्चा करायला तयार आहेत. पण, सर्व आमदारांसोबत चर्चा केली जावी अशी त्यांची मागणी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Akola, Eknath Shinde, Shivsena