मुंबई, 21 जून : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नाराज होऊन सूरतला निघून गेल्यानंतर राज्यातील राजकारणात भूकंप झाला आहे. शिंदे यांच्यासोबत 35 आमदार असल्याची माहिती आहे. त्यामुळे शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर आहे. शिंदे भाजपामध्ये जाणार का? भाजापाने शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे का? या सर्व चर्चा आता सुरू झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी कोणत्या अटी ठेवल्यात याची महत्त्त्वाची माहिती आता समोर आली आहे. काय आहेत अटी? एकनाथ शिंदे कोणत्याही पक्षासोबत जाणार नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जायचं नाही, अशी त्यांची मागणी आहे. त्याचबरोबर शिवसैनिकांवर अन्याय होता कामा नये, तसंच शिवसेना आमदारांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे या मागणीवर ते ठाम आहेत. शिंदे चर्चा करायला तयार आहेत. पण, सर्व आमदारांसोबत चर्चा केली जावी अशी त्यांची मागणी आहे. बंडाची ठिणगी का? एकनाथ शिंदे शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते आहेत. सर्व आमदारांचे प्रमुख असूनही त्यांनी प्रमख निर्णय प्रक्रियेतून नेहमी दूर ठेवलं जातं. हे कुणाच्या सांगण्यावरून केलं जात होतं. याचीही माहिती एकनाथ शिंदे यांना होती. तरीही कधी ना कधी न्याय मिळेल या आशेने ते पक्षात कार्यरत राहिले. मात्र राज्यसभा आणि विधान परीषद निवडणुकीची सर्व सूत्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकडे दिली आणि एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांमध्ये बंडाची ठिणगी पेटली. 12 तासांमध्ये बदललं राज्याचं राजकारण, आता पुढे काय होणार? वाचा 5 महत्त्वाचे मुद्दे गेली अडीच वर्षे मनात धगधगणाऱ्या ज्वालामुखीचा अखेर आज स्फोट झाला. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करताना शिवसेना पक्षप्रमख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी सिचवलं होतं. तसं अधिकृत पत्रही राज्यपालांना देण्यात आलं होतं. मात्र शिवसेना नेते संजय राऊत आणि सुभाष देसाई यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाला विरोध केला होता. शिवसेना पक्षात आणखी एक नारायण राणे निर्माण होईल आणि मग तो पक्षाला डोईजड होईल. अशी कारणं देत उद्धव ठाकरे यांचे कान भरण्यात आले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री बनण्याचे रास्ता रोखला गेला. गेल्या अडीच वर्षात देखील पक्षातील प्रमुख निर्णय प्रक्रियेतून एकनाथ शिंदे यांना परस्पर दूर ठेवलं जात होतं. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे सर्वात बलाढ्य नेते आहेत. असं असूनही त्यांना मिळणारी सापत्नं वागणूक शिवसेनेच्या इतर आमदारांनाही खटकत होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.