मुंबई, 15 मे : सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राच्या सत्तासंर्घषाचा निकाल लागल्यानंतर 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा विधानसभा अध्यक्षांकडे आला आहे. या 16 आमदारांचं लवकरात लवकर निलंबन व्हावं, अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून करण्यात येत आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देशाबाहेर असल्यामुळे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी अपात्रतेबाबतचा निर्णय घ्यावा, अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. यासाठी ठाकरे गटाच्या नेत्यांनी नरहरी झिरवळ यांची भेटही घेतली. एकीकडे ठाकरे गटाचे नेते 16 आमदारांच्या अपात्रतेसाठी आग्रही असतानाच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. या 16 आमदारांचं निलंबन होणार नाही, असं अजित पवार म्हणाले आहेत. 288 पैकी 16 जणांचा यदाकदाचित वेगळा निकाल लागला, वेगळा निकाल लागणारच नाही, पण लागला तरीदेखील बहुमतावर कोणताही परिणाम होत नाही, 288 पैकी 16 गेले तरी त्यांचे 272 राहत आहेत. 272 मध्ये त्यांना स्पष्ट बहुमत आहे, त्यामुळे त्याचा परिणाम होईल, असं आतातरी दिसत नाही, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी नरहरी झिरवळ यांची भेट घेतलेली असतानाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर परदेशातून मुंबईमध्ये दाखल झाले आहेत, यामुळे शिंदेंच्या शिवसेनेने सुटकेचा निश्वास सोडला आहे. प्रक्रिया लवकर झाली तर 15 दिवसात निर्णय होईल. प्रक्रिया लांबली तर निकाल पुढे जाण्याची शक्यता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वर्तवली आहे. सभागृहाचा माझ्यावर विश्वास असल्याने मी या पदावर आहे. मी संविधानाच्या अधिकारात राहून निर्णय घेईल, त्यामुळे निश्चित राहावे. याचिका दाखल झाल्यापासूनच प्रक्रिया सुरू झालेली आहे. राजकीय पक्ष कोणता आणि व्हिप या संदर्भात न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले आहे. दरम्यान, मी धमक्यांना भीक घालत नाही. अपात्रता निर्णय हा कायदा आणि नियमानुसार घेणार आहे, असं नार्वेकर यांनी स्पष्ट केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







