मुंबई, 15 ऑक्टोबर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती ताजी असतानाच आता वर्षा बंगल्यावरील आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर काँग्रेसचे तीन बडे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले. यामध्ये राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, काँग्रेस नेते मिलिंद देवरा आणि अमिन पटेल यांचा समावेश आहे. राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेसच्या तीन बड्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी जावून भेट घेतल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीमागे नेमकं कारण काय याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण शाळेच्या पटसंख्ये संदर्भात सुरु असलेल्या वादावर चर्चा करण्यासाठी ही भेट झाल्याची चर्चा आहे. किंवा तीनही काँग्रेस नेते हे आपापल्या मतदारसंघाच्या विकास कामांसाठी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर चर्चा करण्यासाठी आल्याची शक्यता आहे. राज ठाकरे वर्षा बंगल्याबाहेर निघत होते अगदी त्या क्षणाच्या अवघ्या काही काळाआधी वर्षा गायकवाड या ‘वर्षा’ बंगल्याच्या आवारात प्रवेश करताना कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. वर्षा गायकवाड यांच्यासोबत मिलिंद देवरा, अमिन पटेल हे देखील वर्षा निवासस्थानी दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आपापल्या मतदारसंघातील काही कामांसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, अशी चर्चा आहे. तसेच शाळांमधील पटसंख्येच्या वादावर गायकवाड आणि शिंदेंमध्ये चर्चा झाल्याचा अंदाज बांधला जातोय.
( …आणि थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी राज ठाकरे पोहोचले ‘वर्षा’ बंगल्यावर ) महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विविध घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर हालचालींना वेग आला आहे. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतंच वर्षा बंगल्यावर जावून एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे देखील वर्षा बंगल्यावर उपस्थित होते. या भेटीत आरोग्य विषयक प्रश्नांवर चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तसेच राज्यातील विविध राजकीय घडामोडींवर देखील दोन्ही बड्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज आणि शिंदे यांच्या भेटीनंतर काँग्रेसच्या तीन नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने राज्याच्या राजकारणात नेमकं काय सुरुय? असा प्रश्न उपस्थित होतोय. राज्याच्या राजकारणात पडद्यामागे नेमंक काय घडतंय ते आगामी काळात समोर येईलच. पण सध्याच्या घडीला अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.