मुंबई, 15 ऑक्टोबर : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आगामी काळात काहीतरी मोठं घडणार आहे हे निश्चित आहे. राज्याच्या राजकारणात तीन महिन्यांपूर्वी मोठा भूकंप घडला होता. त्यानंतरही राजकीय घडामोडी या सुरुच आहेत. कारण मनसे नेत्यांकडून गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर काही प्रमाणात टीकेची झोड उठवली जात असताना आज वेगळंच घडलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी थेट त्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी दाखल झाले. सुरुवातीला आरोग्य विषयावर चर्चा करण्यासाठी या दोन बड्या नेत्यांची भेट होत असल्याची माहिती समोर येत होती. नंतर अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी ही बैठक असल्याचं मानलं जात होतं. पण या भेटीचे वेगवेगळे कयास बांधले जात आहेत. काही जणांनी ही त्यांची वैयक्तिक कारणासाठी भेट असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे या भेटीदरम्यान पडद्यामागे नेमकं काय-काय घडत असेल याचे वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. या भेटीमागचं नेमकं कारण काय याबाबत आम्ही मनसे नेते अविनाश अभ्यांकर यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी आपली भूमिका मांडली. “राज ठाकरे यांची ही वैयक्तिक भेट आहेत. पण आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले आहेत तर सर्व विषयांवर सविस्तर चर्चा होऊ शकते. पण ही भेट वैयक्तिक आहे. महाराष्ट्रातले दोन मोठे नेते एकत्र भेटत असल्याने राज्यातील वेगवेगळ्या निवडणुका आणि मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होऊ शकते”, अशी प्रतिक्रिया अविनाश अभ्यंकर यांनी दिली. ( शिंदे गटाच्या ढाल तलवार चिन्हावर मोठा आक्षेप, रद्द करण्याची मागणी ) अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवर काय चर्चा होऊ शकते? अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात चर्चा होऊ शकते. या मतदारसंघात मराठी मतदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या निवडणुकीत राज ठाकरे यांची भूमिका देखील महत्त्वाची आहे. या पोटनिवडणुकीत जवळपास सहा वेगवेगळ्या पक्षाचे आणि अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके आणि भाजपचे उमेदवार पटेल यांच्याच काँटे की टक्कर बघायला मिळणार आहे. दोन्ही गटाकडून संपूर्ण ताकद लावली जात आहे. भाजप ही पोटनिवडणूक जिंकण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या बाजूने असणारे मतदार आपल्याकडे वळवण्यासाठी शिंदे गटाच्या मार्फत भाजपची रणनीती आखली जाऊ शकते. या भेटीनंतर कदाचित राज ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करु शकतात.
राज ठाकरे हे शिंदे की उद्धव नेमकं कुणाच्या बाजूने? अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. खरंतर हा तात्पुरता स्वरुपाचा निकाल आहे. पण निवडणूक आयोगाने शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण गोठवलं आहे. त्यामुळे राज्यभरातील हजारो शिवसैनिक भावूक झाले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं धनुष्यबाण चिन्हासोबत एक वेगळं नातं होतं. त्यामुळे हे चिन्ह गोठवल्यानंतर राज ठाकरे यांनादेखील वाईट वाटलं असेल, अशी चर्चा होती. कारण या महत्त्वाच्या घडामोडींवर मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काहीच भूमिका मांडू नये, असं राज ठाकरे यांनी जाहीर केलं होतं. त्यामुळे राज ठाकरे आपल्या मोठ्या भावाच्या मदतीला धावून जातात का, अशी चर्चा रंगली होती. पण या सगळ्या घडामोडींनंतर राज ठाकरे यांनी थेट एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राज आणि शिंदे एकत्र येणार? राज्यात पुढच्या काही काळात मुंबई महापालिका निवडणुका येऊ घातल्या आहेत. या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव करण्यासाठी कदाचित मनसे भाजप, शिंदे गट यांच्यासोबत जाण्याची शक्यता आहे. अर्थात याबाबतच्या अधिकृत माहितीचा कोणताही दुजोरा नाही. पण मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर वेगळं राजकीय समीकरण तयार होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे हे राज्याच्या राजकारणातील महत्त्वाचे नेते आहेत. ठाकरेंवर तरुण वर्गाचं प्रचंड प्रेम आहे. तरुण वर्गाकडून राज ठाकरेंना चांगलं समर्थन मिळतं. त्यामुळे मुंबई महापालिकेतील मराठी मतांसाठी त्यांचं भाजप आणि शिंदे गटाच्या युतीत राहणं दोन्ही पक्षांसाठी गरजेचं आहे. पण या घडामोडी खरंच घडतील याची शाश्वती नाही. राजकारणात काहीही घडू शकतं. या सगळ्या घडामोडींनंतर ठाकरे बंधू एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा अभूतपूर्व असा बदल घडलेला बघायला मिळू शकतो.