अमिता शिंदे, प्रतिनिधी
वर्धा, 25 मे: पतीच्या अकाली निधनानंतर महिला खचून जातात. काही त्यातून सावरत स्वत:च्या पायावर उभा राहतात. आपल्या जिद्दीनं आणि कष्टानं समाजापुढं एक वेगळा आदर्श प्रस्थापित करतात. असाच आदर्श वर्ध्यातील यशोदा नारायण ढोबळे यांनी समाजापुढं ठेवलाय. 2000 साली पतींचं निधन झालं आणि संसाराची सूत्रं हाती घेत यशोदाबाईंनी झुणका भाकर केंद्र सुरू केलं. झुणका भाकर विकून त्यांनी कुटुंबाला सावरत मुलांची शिक्षणंही केली आहेत.
पतीचं अकाली निधन
यशोदा ढोबळे यांचे पती नारायणराव हे रिक्षा चालवून कुटूंब सांभाळत होते. 2000 साली त्यांचं हृदयविकारानं निधन झालं. 2 मुलांची जबाबदारी यशोदाबाईंवर येऊन पडली. त्यामुळं त्यांनी स्वत:ला सावरत कुटुंबाची जबाबदारी घेतली. अवघं सहावीपर्यंत शिक्षण झालं त्यामुळं बाहेर नोकरी मिळणं शक्य नव्हतं. त्यासाठी त्यांनी सिव्हिल लाईन्स परिसरात स्वत:चं झुणका भाकर केंद्र सुरू केलं. या झुणका भाकर केंद्रामुळं कुटुंब सावरलं आणि मुलांची शिक्षणंही झाली.
अवघ्या 5 रुपयांपासून झाली सुरुवात
2005 या वर्षी झुणका भाकर केंद्र त्यांनी सुरू केलं तेव्हा एका प्लेटची किंमत अवघे 5 रुपये होती. आता काळानुसार 40 रुपये इतकी किंमत एका प्लेटची आहे. प्रशासकीय कार्यालयांमधील अनेक अधिकारी कर्मचारी या ठिकाणी येत असतात. सुरवातीला काही महिलांना घेऊन त्यांनी झुणका भाकर केंद्र उभारलं. मात्र आता त्या एकट्या हा व्यवसाय सांभाळत आहेत. सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत झुणका भाकर केंद्र चालवतात. दिवसभराच्या कालावधीत यशोदाबाईना चांगली मिळकतही होते. त्यातूनच त्यांनी आपल्या मुलांना शिकविले आणि त्यांना त्यांच्या पायावर उभे केले.
इतर विधवा महिलांना दिला पाठिंबा
सध्या यशोदाबाईंचे वय 64 वर्ष आहे. मात्र यापुढेही झुणका भाकर केंद्र सुरूच ठेवून मेहनतीने व्यवसाय टिकविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यशोदाबाईंनी काही विधवा महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी धीर आणि पाठिंबा दिला आहे. त्यांनी स्वतः झुणका भाकरीचा यशस्वी व्यवसाय करून इतर महिलांपुढे आदर्श निर्माण केलाय.
हेही वाचा - MSBSHSE Hsc Result 2023 फक्त एका क्लिकवर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18, Success Story, Wardha, Wardha news