नवी दिल्ली, 20 मार्च : कोरोना विषाणू महामारीने संपूर्ण जगाला विळखा घातलाय. त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रत्येक देश मार्ग शोधतो आहे. पहिला मार्ग म्हणजे विज्ञानाचा लस शोधण्याचा. त्यात अनेक देशांतील शास्रज्ञ गुंतले होते. लशी तयारही झाल्या पण त्यांचा प्रभाव कमी झाला म्हणून आणखी प्रभावी लशी शोधण्यासाठी सध्या संशोधन सुरू आहे. भारतात योगशास्र हे आधीच्या काळी अत्यंत प्रगत होतं. गेल्या वर्षभरात देशात सर्वांनी पारंपरिक काढा घेऊन प्रतिकारशक्ती वाढवली.
आता एक पाऊल पुढे टाकत भारतीय पारंपरिक ज्ञानाचा म्हणजे योगशास्राचा उपयोग कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात होतो का याची पडताळणी सुरू झाली आहे. आधुनिक विज्ञानाचे उपचार घेतानाच गायत्री मंत्राचा उच्चार आणि जप केल्याने तसंच प्राणायाम केल्याने कोविड-19 विषाणू आजाराविरुद्ध लढण्यासाठी काही मदत होते का यावर अभ्यास करावा असा आदेश केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वतीने देण्यात आला आहे. त्याला अनुसरून हृषीकेश एम्समधील शास्रज्ञांनी या विषयावर संशोधन सुरू केलं आहे. आउटलूकने याबाबत वृत्त दिलं आहे.
एम्सच्या शास्रज्ञांनी कोविड-19 वर उपचार घेणाऱ्या 20 रुग्णांची या अभ्यासासाठी निवड केली असून त्याचा प्रत्येकी 10 जणांचा एक असे दोन गट तयार केले आहेत. एका गटाला कोविडचे सर्व आधुनिक उपचार दिले जात असून, त्याचसोबत त्यांना गायत्री मंत्राचा जप आणि सकाळ-संध्याकाळ प्राणायाम करायला सांगितला आहे.
दुसऱ्या गटातील रुग्णांना केवळ आधुनिक उपचार दिले जात आहेत. हा प्रयोग 14 दिवस केला जाणार असून त्यानंतर पहिल्या आणि दुसऱ्या गटातील रुग्णांच्या आरोग्याची निरीक्षणं समोर ठेवून त्यांची तुलना केली जाईल. त्यातून गायत्री मंत्र आणि प्राणायामाचा परिणाम कोविड रोखण्यासाठी मदत करतो का हे स्पष्ट होईल. या प्रयोगावर काम करणाऱ्या अधिकाऱ्याने त्याबद्दल अधिक तपशील सांगण्यास नकार दिल्याचंही या वृत्तात म्हटलं आहे.
चेन्नईतील न्युक्लियर आणि अर्थ सायंटिस्ट डॉ. के. एल. सुंदर कृष्णा एएनआयशी संवाद साधताना म्हणाले, ‘कोरोना विषाणू सूर्यग्रहणावेळी घडलेल्या फ्युजनमधून निर्माण झालेल्या पहिल्या न्युट्रॉनमधून निर्माण झाला असावा आणि त्यामुळेच महामारी पसरली असावी. त्यांच्यामते 26 डिसेंबर 2020 ला झालेल्या सूर्यग्रहणानंतर 'planetary configuration with new alignment in the solar system' ही घटना घडल्यामुळेच कोरोना विषाणूचा पुन्हा उद्रेक झाला असावा. ’
कोरोना विषाणू कुठून आला याबद्दल जी थेअरी मांडली जाते आहे त्याबद्दल कृष्णा म्हणाले, ‘वातावरणाच्या वरच्या स्तरात इंटर-प्लॅनेटरी फोर्स व्हेरिएशन होतं तिथून हा विषाणू पृथ्वीवर आला, न्युट्रॉनचं न्युक्लिएशन सुरू झालं आणि वातावरणाच्या वरच्या स्तरात बायो-न्युक्लिअर इंटरअक्शन झाली. या बायो न्युक्लिअर रिअक्शनमधूनच हा विषाणू पृथ्वीवर आला असावा.’
या आधी एका शास्रज्ञाने दावा केला होता की, योग्य पद्धतीने श्वासोच्छवास केला तर कोरोना विषाणू मरतो. द कॉन्व्हर्सेशनमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार जर माणसाने नाकाने श्वास घेऊन तो तोंडावाटे सोडला तर ते शरीरासाठी उत्तम असतं.
1998 मध्ये नोबेल पुरस्कार मिळवलेल्या लुईस जे. इग्नारो यांच्या अभ्यासानुसार या प्रकारे श्वसन करणं अधिक उपयुक्त आहे कारण नाकातल्या पोकळीत नायट्रिक ऑक्साइड तयार होतं. त्यामुळे फुफ्फुसांना रक्ताचा अधिक पुरवठा होतो त्यामुळे ऑक्सिजनची पातळी वाढते.
जगभरातल्या शास्रज्ञांनी वेगवेगळी संशोधनं सुरू ठेवली आहेत आता आधुनिक विज्ञानाला पारंपरिक विज्ञानाने साथ दिली, तर तो सुयोग्य संगम म्हणता येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus in india, Coronavirus, Covid-19 positive, Covid19, Gayatrimantra, Pandemic, Virus, Yoga