नवी दिल्ली, 05 फेब्रुवारी : गेल्या जवळपास एक वर्षापासून कोरोनामुळे (Corona) मानवी जीवनात आमूलाग्र बदल झाल्याचं दिसून येतं. अनेकांच्या जीवनात प्राथमिक प्राधान्य असलेल्या गोष्टींमध्ये मोठा बदल झाला. कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा जसा सामाजिक, आर्थिक घटकांवर परिणाम झाला आहे, तसाच तो अनेकांच्या वैयक्तिक आयुष्यावर देखील झाला आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीमुळे अनेक कपल्स (Couples) एकमेकांना भेटू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्या नात्यात तणाव आणि दुरावा निर्माण झाला. परिणाम ब्रेकअपचे (Break up) प्रमाण वाढलं. आपल्याला हे ऐकून आश्चर्य वाटेल की कोरोनामुळे गेल्या वर्षी लक्षणीय प्रमाणात ब्रेकअप झाले आहेत. फेब्रुवारी महिना सुरू होताच युवक आणि अविवाहित तरुण आतुरतेने वाट पाहतात ती व्हॅलेंटाईन डेची (Valentine Day). व्हॅलेंटाईन डे निमित्ताने अनेक तरुण आपले प्रेम व्यक्त करतात आणि प्रेमाचा आनंद साजरा करतात. गतवर्षी कोरोनामुळे लोक घरांमध्येच होते किंवा दुसऱ्या राज्य, देशांत अडकून पडले होते. त्यामुळे यंदाचा व्हॅलेंटाईन डे त्यांच्यासाठी खूपच खास असा आहे. अनेक कपल्स यंदाचा व्हॅलेंटाईन डे अत्यंत उत्साहात आणि निरनिराळ्या पद्धतीनं साजरा करू इच्छितात. कोरोना महासाथीमुळे (Corona Pandemic) प्रत्येकालाच तणावाचा सामना करावा लागला. यामुळे अनेक कपल्स दुरावले, त्यांना भेटता आलं नाही. परिणामी अनेक कपल्सचे ब्रेकअप झाले. गतवर्षी लॉकडाऊनमुळे (Lockdown) लक्षणीय प्रमाणात ब्रेकअप झाले. जागरण च्या वृत्तानुसार, वुमेन फर्स्ट सोशल नेटवर्किंग अॅप बंबलने देशभरातील कपल्सच्या सहभागातून नुकताच एक सर्व्हे (Survey) केला. या सर्व्हेनुसार, 2020 मध्ये लॉकडाऊन दरम्यान दिल्लीत सर्वाधिक म्हणजेच 28 टक्के ब्रेकअप झाले. कोरोनामुळे प्राथमिकतेत झालेला बदल हा यामागील प्रमुख कारण आहे. हे वाचा - Valentine’s Day Special : ही फर्म घटस्फोट मिळवून देण्यासाठी करणार मोफत मदत बंबलच्या सर्व्हेनुसार, जोडीदाराला भेटू न शकणं हे ब्रेकअपचे प्रमुख कारण ठरलं. 46.45 टक्के लोकांना असं वाटतं की लॉकडाऊनमुळे ते त्यांच्या जोडीदाराला भेटू शकले नाहीत, याचे पर्यावसन ब्रेकअपमध्ये झालं. 3 पैकी 1 म्हणजेच 29 टक्के लोकांच्या म्हणण्यानुसार, अस्तित्वात असलेल्या अडचणी, प्रश्नांनी महासाथीच्या कालावधीत उग्र रुप धारण केलं. त्यामुळे आमच्यावर ब्रेकअपचं संकट कोसळलं. 2021 हे नववर्ष अविवाहितांसाठी (Singles) नवी आशा घेऊन आलं आहे. कोरोनाच्या अनुषंगाने पुरेशी काळजी घेत लोकांनी दैनंदिन व्यवहार सुरु केले आहेत. जे अविवाहित आहेत ते आता जोडीदाराच्या प्रतीक्षेत असून, त्यांनी त्यादृष्टीने शोध सुरू केला आहे. 2020 मधील अनुभवांनी महिलांना आपले प्रेम घाईत मिळवण्याऐवजी आपल्या योग्य जोडीदाराच्या गुणांवर लक्ष केंद्रीत करण्यास भाग पाडलं आहे. हे वाचा - शेतकरी आंदोलनावर ट्वीट करत गदारोळ उठवणारी रिहाना हॉट पॉप स्टार की फेमिनिस्ट? नव्या ट्रेंडविषयी बोलताना बंबल इंडिया पीआरच्या संचालक समर्पिता समद्दर म्हणतात, जे नातं योग्य रितीनं निभावलं जात नव्हतं, ज्या नात्यातून आनंद मिळत नव्हता, असे नातेसंबंध थांबवण्याची वेळ आणि धाडस महिलांना 2020 मधील घटनांनी दिलं. 2021 हे वर्ष अविवाहित महिलांसाठी नवी आशा घेऊन आलं आहे. आता त्या नव्या सामान्य स्थितीत अस्थिरतेला मागे टाकून आनंदी आणि आरोग्यदायी वर्षात पाऊल ठेवत आहेत. आमच्या अंदाजानुसार 2021च्या सुरुवातीला डेटिंगमध्ये (Dating) वाढ होईल. कारण 69 टक्के लोकांचं म्हणणं आहे की ते 2021मधील व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी डेटिंग अॅप्सचा गतवर्षीच्या तुलनेत अधिक वापर करणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.