शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्विट करत पॉप म्युझिक स्टार रिहाना भारतात चर्चेत आली आहे. रिहाना नक्की आहे तरी कोण असा प्रश्न अनेकांना पडतो आहे.
वयाच्या 17 व्या वर्षी रिहानानं आपलं करियर सुरू केलं. 'म्युझिक ऑफ द सन', 'अ गर्ल लाइक मी' हे तिचे सुरवातीचे दोन अल्बम लक्षवेधी ठरले.
अंब्रेला या तिच्या कंपोजिशनला प्रतिष्ठेचं ग्रॅमी अवॉर्ड मिळालं. रिहाना अशी पहिली आर्टिस्ट आहे जिनं लंडनच्या ओटू एरिनामध्ये 10 कॉन्सर्ट्स केल्या आहेत.
32 वर्षाची रिहाना आजवर घरगुती हिंसा, एलजीबीटीक्यु, डोनाल्ड ट्रंप यांची धोरणं अशा अनेक मुद्द्यांवर आपली मतं मांडत आली आहे.
2010 साली आलेलं रिहानाचं मॅन डाऊन हे गाणं बलात्कार आणि त्यावर मात करत जोमानं नवं आयुष्य सुरू केलेल्या महिलेचा लढा मांडतं. या गाण्याचे बोल आहेत 'Mama, I shot a man down...'
या गाण्यानं रेप रिव्हेंज, अर्थात बलात्काऱ्यावर उगवलेला सुड चूक की बरोबर अशा एका वादाला तोंड फोडलं.
रिहाना केवळ एक गायिका नाही तर यशस्वी बिझनेसवुमनही आहे. २०१७ मध्ये तिनं आपला फॅशन आणि कॉस्मॅटिक्सचा फेंटी हा ब्रॅन्ड सुरू केला.
रिहानानं दोन स्वयंसेवी संस्थाही स्थापन केल्या असून ती त्यामाध्यमातून शिक्षण, हवामानबदल आणि आरोग्याच्या क्षेत्रात काम करते.
कोरोना साथीच्या काळात तिनं केलेली मदत लक्षवेधी ठरली. गेल्यावर्षी मार्चमध्ये तिच्या क्लारा लिओनेल फाउंडेशनने तब्बल 50 लाख डॉलर्सची मदत यासाठी केली.