नवी दिल्ली 13 ऑगस्ट : अफगाणिस्तानातून अमेरिकी सैन्याच्या फौजा मागे बोलावण्याचा निर्णय अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी घेतला होता. त्यानंतर तालिबानी बंडखोरांनी देशात हिंसाचाराला (Violence) सुरुवात करून एकेक भाग काबीज करायला सुरुवात केली. त्यांनी अफगाणिस्तानातल्या (Afghanistan) गझनी (Ghazni) शहरावर गुरुवारी (12 ऑगस्ट) कब्जा मिळवला. तसंच नंतर त्यांनी कंदाहार या महत्त्वाच्या शहरावरही ताबा मिळवला. अफगाणिस्तानचा दोन-तृतीयांश भाग सध्या तालिबानच्या ताब्यात गेला आहे. त्यामुळे सरकारचं आणि सैन्याचं देशावरचं नियंत्रण सुटत चाललं आहे. त्यामुळे तालिबानी बंडखोर (Talibani Insurgents) हिंसा थांबवणार असतील, तर त्यांना सत्तेत वाटा दिला जाईल, असा प्रस्ताव अफगाणिस्तान सरकारने त्यांच्यासमोर ठेवला आहे.
या पार्श्वभूमीवर, चारकिंत जिल्ह्यात गव्हर्नर (Lady Governor) म्हणून कार्यरत असलेली सलिमा माजरी (Salima Mazari) हिचा कणखरपणा डोळ्यांत भरण्यासारखा आहे. मुळात पुरुषप्रधान संस्कृती असलेल्या अफगाणिस्तानात एक महिला गव्हर्नर कार्यरत आहे हे एक वेगळेपण आणि तिने तालिबान्यांच्या विरोधात लढण्यासाठी स्वतःची सेना उभारली आहे हे दुसरं वैशिष्ट्य. तिला स्थानिक नागरिकांकडून पाठिंबाही मिळतो आहे. 'लाइव्ह हिंदुस्तान डॉट कॉम'ने याबद्दलचं सविस्तर वृत्त दिलं आहे.
'प्रार्थना करा..'; महिला पत्रकारानी सांगितली अफगाणिस्तानातील भयंकर स्थिती
सलिमा माजरी हिची कहाणी प्रेरक आहे. 1980 साली सलिमाचा जन्म इराणमध्ये झाला. तेव्हा तिच्या कुटुंबाने सोव्हिएत युद्धात (Soviet War) भाग घेतला होता. त्यामुळे तेव्हा तिचं कुटुंब इराणमध्ये (Iran Refugee) निर्वासित म्हणून असतानाच सलिमाचा जन्म झाला. तिचं शिक्षण इराणमध्येच झालं. तेहरान युनिव्हर्सिटीतून पदवीधर झाल्यानंतर ती वेगवेगळी विद्यापीठं आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये कार्यरत होती. त्यानंतर तिने आपल्या आई-वडिलांना सोडून एकटीनेच अफगाणिस्तानात परतण्याचा निर्णय घेतला. 2018 साली अफगाणिस्तानातल्या चारकिंत जिल्ह्याच्या गव्हर्नर पदावर भरती होत असल्याची बातमी तिला कळली. चारकिंत जिल्हा ही तिची मातृ-पितृभूमी. त्यामुळे तिने त्या पदासाठी अर्ज करायचं ठरवलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे महिला असूनही तिची त्या पदावर निवड झाली. तालिबानचा (Taliban) धोका कायम असल्याने जिल्ह्याची सुरक्षितता (Security) अधिक वाढवण्यासाठी सलिमाने सिक्युरिटी कमिशनची स्थापना केली. स्थानिक पातळीवरच्या सैन्यात भरतीची जबाबदारी त्या आयोगाकडून सांभाळली जाते. सलिमाच्या धाडसी निर्णयांमुळे आपल्या कार्यकाळात तिने तालिबान्यांच्या नाकी नऊ आणले आहेत.
सलिमा माजरी कार्यरत असलेल्या चारकिंत जिल्ह्याचा साधारण अर्धा भाग तालिबानने गिळंकृत केला आहे; मात्र उर्वरित अर्ध्या जिल्ह्याच्या बचावासाठी सलिमा प्रयत्नांची पराकाष्ठा करते आहे. स्थानिक शेतकरी, मजूर असे सुमारे 600 नागरिक सलिमाने उभारलेल्या स्थानिक सैन्यात आतापर्यंत सहभागी झाले आहेत. त्यांच्याकडे शस्त्रास्त्रं नव्हती; पण त्यांनी आपली पाळीव जनावरं आणि काही जणांनी तर जमिनीदेखील विकून पैसे उभे केले आणि शस्त्रास्त्रं खरेदी केली. रात्रं-दिवस हे स्थानिक सैन्य पहारा देत आहे. त्यांना कोणतंही श्रेय मिळत नाहीये किंवा त्यांना पगारही नाहीये, तरीही नागरिक हे सारं करत आहेत, असं सलिमा सांगते. जिल्हा पोलीस प्रमुख सय्यद नझीर यांच्या म्हणण्यानुसार, स्थानिक नागरिकांच्या या सैन्याकडून होत असलेल्या प्रतिकारामुळेच तालिबान अद्याप या जिल्ह्यावर वर्चस्व मिळवू शकलेला नाही.
अफगाणिस्तानच्या मोठ्या शहरावर तालिबानचा हल्ला, 4 लाख नागरिकांचं स्थलांतर
पिक-अप गाडीच्या पुढच्या सीटवर आत्मविश्वासाने बसून सलिमा उत्तर अफगाणिस्तानातल्या ग्रामीण भागांचा दौरा करते आणि स्थानिक सैन्यात तिथल्या नागरिकांना सहभागी करून घेते. 'मेरे वतन... मैं अपनी जिंदगी तुझ पर कुर्बान कर दूंगा' हे तिथलं लोकप्रिय गीत तिच्या गाडीच्या कर्ण्यातून नागरिकांना साद घालत असतं. ते त्यांना भावतंही. म्हणूनच तिच्या सैन्यातल्या नागरिकांची संख्या वाढत चालली आहे.
1996 ते 2001 या कालावधीत बहुतांश अफगाणिस्तान तालिबानच्या नियंत्रणाखाली होतं. अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर (WTC) 11 सप्टेंबर 2001 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि अल कैदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख ओसामा बिन लादेन (Osama Bin Laden) याला आसरा दिल्याच्या कारणावरून तालिबानकडून सत्ता काढून घेण्यात आली होती. म्हणूनच अमेरिकेचा पाठिंबा असलेल्या अफगाणिस्तानच्या सरकारचा पाडाव करून तिथे पुन्हा कडक इस्लामिक कायदा लागू करण्याचा तालिबानचा मानस आहे. तालिबानची सत्ता असताना महिला आणि मुलींच्या शिक्षणावर, त्यांनी नोकरी करण्यावर बंदी आणण्यात आली होती. 2001मध्ये तालिबानची सत्ता गेल्यानंतरही नागरिकांची मानसिकता पूर्णपणे बदललेली नाही.
पुण्यातील मराठे ज्वेलर्सच्या प्रणव मराठेंना अटक
सलिमा म्हणते, 'तालिबानी मानवाधिकारांचं (Human Rights) उल्लंघन करतात. ते सामाजिक पातळीवर महिलांचं नेतृत्व स्वीकारू शकत नाहीत.' सलिमा हजारा समुदायातली आहे. या समुदायातल्या बहुतांश व्यक्ती शिया आहेत. त्यांना सुन्नी मुसलमानांचं तालिबान अजिबात आवडत नाही. तालिबान आणि इस्लामिक स्टेटमधले हल्लेखोर त्यांच्यावर सातत्याने हल्ले करत असतात. मे महिन्यात तालिबान्यांनी राजधानीतल्या एका शाळेवर हल्ला करून 80 मुलींना ठार केलं होतं.
तालिबानची सत्ता असतानाच्या काळातल्या कटू आठवणी चारकिंत जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातले नागरिक अद्याप विसरलेले नाहीत. 'मी जर मागे हटले, तर नागरिक पुन्हा कोणत्याच महिलेचं नेतृत्व स्वीकारणार नाहीत, याची मला कल्पना आहे. महिलांच्या शिक्षण आणि नोकरीच्या संधींवर गदा आणली जाईल. तरुणांना नोकऱ्या मिळणार नाहीत. म्हणूनच मी कार्यरत आहे,' असं सलिमा सांगते.
सलिमाचा लढा तालिबानविरुद्ध आहे, तसाच तो वाईट मानसिकतेविरोधातही आहे. वर्षानुवर्षांची मानसिकता बदलण्यात तिला थोडं तरी यश येत असल्याचं चित्र तिच्या सैन्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होत असलेल्या नागरिकांमुळे पाहायला मिळत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Afghanistan, Taliban