Home /News /explainer /

लहान डोक्याच्या मुलांचे फोटो आठवतायेत? हाच झिका विषाणू पुन्हा काढतोय डोकं वर; नेमका काय आहे?

लहान डोक्याच्या मुलांचे फोटो आठवतायेत? हाच झिका विषाणू पुन्हा काढतोय डोकं वर; नेमका काय आहे?

झिका विषाणूच्या (Zika Virus) संसर्गाने केरळमध्ये डोकं वर काढलं आहे. गेल्या आठवड्यात केरळमध्ये झिका विषाणूचे तब्बल 19 रुग्ण आढळले आहेत.

नवी दिल्ली 13 जुलै: कोरोना विषाणूच्या (Coronavirus) संसर्गाची दुसरी लाट ओसरतेय ना ओसरतेय तोपर्यंत झिका विषाणूच्या (Zika Virus) संसर्गाने केरळमध्ये डोकं वर काढलं आहे. 27 जानेवारी 2020 रोजी केरळमध्ये (Kerala) झिका विषाणूचा रुग्ण सापडला होता. त्यानंतर आता गेल्या आठवड्यात केरळमध्ये झिका विषाणूचे तब्बल 19 रुग्ण आढळले (Zika Virus Cases in Kerala) आहेत. त्यात 24 वर्षांच्या एका गर्भवती महिलेचाही समावेश आहे. या विषाणूच्या संसर्गाच्या वृत्तामुळे आजूबाजूच्या राज्यांसह अनेक राज्यांत अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, या विषाणूसंदर्भातली सविस्तर माहिती 'दैनिक भास्कर'ने प्रसिद्ध केली आहे. भारतात झिका विषाणूची लागण झाल्याच्या केसेस सर्वांत पहिल्यांदा 1952-53 मध्ये आढळल्या होत्या. मे 2017 मध्ये अहमदाबादमध्ये तीन, जुलै 2017 मध्ये तमिळनाडूत एक, तर 2018 मध्ये राजस्थानात झिका विषाणूच्या 80 केसेस सापडल्या होत्या. ब्राझीलमधल्या (Brazil) माकडांमध्येही झिका आणि चिकनगुनिया विषाणू आढळले आहेत. माणसातून हा संसर्ग माकडांना झाला होता. त्यामुळे अनेक माकडिणींचा गर्भपात करावा लागला होता. एडीस जातीच्या डासांपासून हा विषाणू पसरतो. माकडांना चावलेले डास माणसांनाही चावले की विषाणू पसरू शकतो. कोरोनाचा पुन्हा संसर्ग होणं जास्त घातक? Corona reinfection सर्वाधिक धोका कुणाला? झिका व्हायरस पहिल्यांदा एप्रिल 1947 मध्ये युगांडातल्या झिका जंगलात राहणाऱ्या रीसस मकाउ माकडांत आढळला. 1950 पर्यंत तो केवळ आफ्रिका, आशियाच्या विषुववृत्तीय प्रदेशातच होता. 2007 ते 2016 या कालावधीत तो प्रशांत महासागराच्या प्रदेशात आणि अमेरिकेत पसरला. 2015-16 मध्ये अमेरिकेने त्याला महामारी घोषित केलं होतं. एडीस जातीचे डास (Mosquito) डेंग्यूही पसरवतात. साठलेल्या पाण्यात त्यांचं प्रजनन होतं आणि हे डास घरात राहण्याचं प्रमाण अधिक असतं. झिका विषाणूमुळे जन्मजात दोष उद्भवतात. गिलेन बॅरे सिंड्रोमही होऊ शकतो. गर्भवती महिलांना संसर्ग झाल्यास तिच्या बाळामध्ये व्यंगही येऊ शकतं. ताप, सांधेदुखी, शरीरावर चट्टे अशा प्रकारची लक्षणं झिका व्हायरसच्या संसर्गामुळे दिसतात. हा विषाणू मुख्यत्वे डासांपासून पसरत असला, तरी अन्य मार्गांतूनही तो पसरू शकतो. गर्भवती मातेकडून तो गर्भातल्या बाळाला होऊ शकतो. लैंगिक संबंधांतूनही हा विषाणू पसरू शकतो. तसंच, ब्लड ट्रान्स्फ्युजनद्वारेही म्हणजे व्यक्तीला रक्त दिल्यासही या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो, असं अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल या संस्थेचं म्हणणं आहे; मात्र याबद्दल अद्याप 100 टक्के खात्री देण्यात आलेली नाही. Explainer: कोरोना काळात घरातील सोन्यावर कर्ज घेताय? काय आहे तज्ज्ञांचा सल्ला लक्षणं कोरोना संसर्गाप्रमाणेच झिकाचा संसर्ग झालेल्या अनेकांना कोणतंच लक्षण दिसत नाही. काही जणांना सौम्य लक्षणं दिसतात. त्यात डोकेदुखी, ताप, सांधेदुखी, स्नायूदुखी, डोळे लाल होणं, त्वचेवर रॅशेस येणं आदी लक्षणांचा समावेश आहे. ही लक्षणं दोन ते सात दिवसांपर्यंत दिसू शकतात. अनेकांना लक्षणं दिसत नसल्याने किंवा सौम्य असल्याने संसर्ग झालाय हेच कळत नाही. झिका संसर्गाने मृत्यू होण्याची शक्यता फारच कमी असते; मात्र गर्भवतींना संसर्ग झाल्यास खूप धोकादायक असतं. कारण त्यांच्या गर्भातल्या बाळांनाही त्याची लागण होते. त्यामुळे त्या बाळांना मायक्रोसेफॅली (Microcephali) हा विकार होतो. या बाळांच्या डोक्याचा आकार लहान राहतो. त्यामुळे त्यांचा मेंदूही लहान राहतो आणि त्याचा योग्य पद्धतीने विकास होऊ शकत नाही. जागतिक आरोग्य संघटनेचं (WHO) असं म्हणणं आहे, की ब्राझीलसह ज्या देशांमध्ये झिकाचा संसर्ग पसरला आहे, तिथे गिलेन बॅरे सिंड्रोम होणाऱ्या व्यक्तींच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तो मज्जासंस्थेचा विकार असून, त्यामुळे लकवा येतो आणि 8.3 टक्के जणांचा मृत्यूही होऊ शकतो. Explainer: कोरोना विषाणूचा सातवा व्हेरिएंट 'लॅम्ब्डा' किती धोकादायक? झिका विषाणूवर अद्याप औषध नाही; मात्र इनअॅक्टिव्हेटेड व्हॅक्सिन (Inactivated Vaccine) विकसित करण्याचे आदेश जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिले आहेत. मार्च 2016 पासून जगभरातल्या 18 औषध कंपन्या या लसनिर्मितीचं संशोधन करत आहेत. यासाठी 10 वर्षं लागू शकतात, असं त्यांचं म्हणणं आहे. काही लशींच्या चाचण्या झाल्या असल्या, तरी अद्याप कोणत्याच लशीला मंजुरी नाही आणि उत्पादनही सुरू झालेलं नाही. त्यामुळे प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय आहे. प्रतिबंधात्मक काळजी डासांची संख्या वाढणार नाही आणि डास माणसांना चावणार नाहीत, याची शक्य ती सर्व काळजी घेणं अत्यावश्यक आहे. फुल शर्ट-पँट घालणं, घराच्या खिडक्यांना जाळ्या लावणं, मच्छरदाणी वापरणं, मॉस्क्विटो रिपेलंट वापरणं आदी काळजी घ्यायला हवी. घराबाजूला डबकी असतील, तर त्यात पाणी साठू देऊ नये, जेणेकरून डासांची पैदास होणार नाही. झिका व्हायरसचा संसर्ग झाला असेल, अशा भागांत जाऊ नये. संसर्ग झाला तर... झिका विषाणूचा संसर्ग झालाच, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं घ्यावीत. डिहायड्रेशन (Dehydration) होऊ नये म्हणून भरपूर पाणी प्यावं. आराम करावा. आपल्यापासून दुसऱ्यांना संसर्ग होऊ नये म्हणून आवश्यक ती काळजी घ्यावी. स्वच्छता बाळगावी. आपल्या शरीरातलं रक्त किंवा लाळेसह अन्य कोणतेही स्राव निरोगी व्यक्तीपर्यंत पोहोचणार नाहीत, याची काळजी घ्यावी. असुरक्षित लैंगिक संबंध ठेवू नयेत. गर्भवती महिलेची विशेष काळजी घ्यावी.
Published by:Kiran Pharate
First published:

Tags: Kerala, Virus, Zika

पुढील बातम्या