नवी दिल्ली, 10 जुलै: आजूबाजूच्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी स्वतःमध्ये म्युटेशन (Mutation) घडवून आणणं ही विषाणूंमध्ये घडणारी नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यानुसार कोरोना विषाणूंमध्येही म्युटेशन्स होत आहेत आणि त्यामुळे वेगवेगळे व्हॅरिएंट्स तयार होत आहेत. डेल्टा व्हेरिएंटचा (Delta Variant of Corona) संसर्ग झालेले रुग्ण जगभरात आढळत असताना आता लॅम्ब्डा व्हेरिएंटचे (Lambda Variant) रुग्णही 25हून अधिक देशात आढळले आहेत. हा व्हेरिएंट नवा नाही. ऑगस्ट 2020पासून तो पेरू, चिली, इक्वेडोर, अर्जेंटिना आदी दक्षिण अमेरिकी देशांत तो आढळत होता. पेरूमध्येच त्याचा उगम झाल्याचा अंदाज असून, तिथल्या 80 टक्के कोरोनाबाधितांना याच व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
C.37 असं त्याचं शास्त्रीय नाव असून, मार्च 2021च्या अखेरीपासून हा व्हेरिएंट दक्षिण अमेरिकेच्या (South America) बाहेरच्या देशातही आढळू लागला आहे. आतापर्यंत जगभरातल्या किमान 25 देशांमध्ये आढळला आहे. त्यामुळे 14 जून रोजी जागतिक आरोग्य संघटनेने लॅम्ब्डा व्हेरिएंटला 'व्हॅरिएंट्स ऑफ इंटरेस्ट' या वर्गात समाविष्ट केलं आहे. याचा अर्थ असा, की या व्हेरिएंटचा संसर्ग कसा पसरत आहे, यावर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज आहे. व्हॅरिएंट्स ऑफ इंटरेस्ट या वर्गात समाविष्ट झालेला हा कोरोना विषाणूचा सातवा व्हेरिएंट आहे.
आतापर्यंत हा व्हेरिएंट भारतात आढळलेला नाही. मात्र ब्रिटन आणि युरोपीय देशांमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवास करून आलेल्या काही जणांना या व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याचं सिद्ध झालं आहे. ऑस्ट्रेलियातही या संसर्गाचे रुग्ण आढळले आहेत. 'दी इंडियन एक्स्प्रेस'ने कोरोना विषाणूच्या लॅम्ब्डा व्हेरिएंटबद्दल सविस्तर माहिती देणारा लेख प्रसिद्ध केला आहे.
हेही वाचा- कोरोनानंतर Bone death चा धोका; नेमका काय आहे हा आजार?
प्रत्येक व्हेरिएंटचं म्युटेशन कुठे झालं आहे आणि किती झाली आहेत, त्यावर त्याची घातकता अवलंबून असते. स्पाइक प्रोटीन (Spike Protein) हा कोरोना विषाणूचा महत्त्वाचा भाग असून, त्याच्या साह्याने विषाणू मानवी शरीरातल्या पेशींचं बाह्य आवरण फोडून आत प्रवेश करू शकतो. डेल्टा व्हेरिएंटच्या स्पाइक प्रोटीनवर तीन महत्त्वाची म्युटेशन्स आहेत, तर लॅम्ब्डा व्हेरिएंटच्या स्पाइक प्रोटीनवरच्या महत्त्वाच्या म्युटेशन्सची संख्या सात आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेचं (WHO) म्हणणं आहे. या म्युटेशन्समुळे विषाणूचा प्रसार आणि संसर्ग होण्याची क्षमता वाढू शकते. त्यांच्यामध्ये अँटीबॉडीजना (Antibodies) प्रतिकार करण्याची क्षमता निर्माण होऊ शकते. या सगळ्यामुळे साहजिकच त्याची घातकता वाढू शकते.
लॅम्ब्डा व्हेरियंट चं वर्तन नेमकं कसं आहे, याची नेमकी माहिती अद्याप शास्त्रज्ञांना अवगत झालेली नाही. त्यावर संशोधन सुरू आहे; मात्र चिलीमधल्या शास्त्रज्ञांना असं आढळलं आहे, की ब्रिटनमध्ये आढळलेला अल्फा व्हेरियंट आणि ब्राझीलमध्ये आढळलेला गॅमा व्हेरियंट यांच्या तुलनेत लॅम्ब्डा व्हेरियंट ची संसर्गक्षमता अधिक आहे. तसंच या व्हेरियंट वर चीनने विकसित केलेली कोरोनाव्हॅक (Coronavac) ही लस फारशी प्रभावी ठरत नसल्याचंही आढळलं आहे. या व्हेरियंट चा संसर्ग रोखण्यासाठी आणि त्यावर लस प्रभावी ठरण्याच्या दृष्टीने अधिक संशोधनाची गरज आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे.
आतापर्यंत लॅम्ब्डा व्हेरिएंटसह व्हॅरिएंट्स ऑफ इंटरेस्ट (Variants of interest) या वर्गात सात व्हॅरिएंट्सचा समावेश करण्यात आला आहे. कारण त्यांच्यापासून धोका निर्माण होण्याची शक्यता शास्त्रज्ञांना वाटते आहे. तसंच अल्फा, बीटा, गॅमा आणि डेल्टा या चार व्हॅरिएंट्सना 'व्हॅरिएंट्स ऑफ कन्सर्न' (Variants of Concern) या गटात समाविष्ट करण्यात आलं आहे. कारण त्यांनी वेगवेगळ्या देशात धुमाकूळ घातला असून त्यांचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरला आहे.
हेही वाचा- Explainer : Avascular Necrosis म्हणजे नेमका काय आजार आहे? वाचा कोरोनाशी असलेला संबंध
सुदैवाने आशियात केवळ इस्रायलमध्येच लॅम्ब्डा व्हेरिएंटचा रुग्ण आतापर्यंत आढळला आहे. भारतात किंवा भारताच्या शेजारी देशांमध्ये अद्याप या व्हेरिएंटचा संसर्ग झालेला रुग्ण आढळलेला नाही. मात्र फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन, इटली या युरोपीय देशांमध्ये लॅम्ब्डा व्हेरिएंटचे रुग्ण असून भारतातून तिथे ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. ही काळजीची गोष्ट आहे.
लसीकरणातून प्राप्त झालेल्या प्रतिकारशक्तीलाही भारी पडू शकतील, असे लॅम्ब्डासारखे व्हॅरिएंट्स विकसित होत आहेत. त्यामुळे लसीकरणातून सामुदायिक संरक्षण मिळवण्याचं उद्दिष्ट साध्य होऊ शकत नाही. युरोपात आणि खासकरून ब्रिटनमध्ये गेल्या काही आठवड्यात रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होण्यामागे हेच कारण आहे. त्यामुळे भारतात लॅम्ब्डासारखा नवा व्हेरिएंट दाखल झाला, तर नवी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं तज्ज्ञांना वाटत असल्याचं 'इंडियन एक्स्प्रेस'च्या लेखात म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccination, Corona virus in india, Coronavirus