मराठी बातम्या /बातम्या /explainer /तालिबान्यांना आव्हान देणारा एकमेव वीर; Ahmed masood आहे तरी कोण?

तालिबान्यांना आव्हान देणारा एकमेव वीर; Ahmed masood आहे तरी कोण?

तालिबान्यांविरोधात लढणारा 'पंजशीरचा बछडा'

तालिबान्यांविरोधात लढणारा 'पंजशीरचा बछडा'

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशी सगळीच परिस्थिती प्रतिकूल असूनही अहमद मसूद नावाच्या योद्ध्याने तालिबानला आव्हान दिलं आहे.

    काबूल, 23 ऑगस्ट : अमेरिकेने 20 वर्षे अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) ठेवलेलं सैन्य मागे घेत असल्याची घोषणा केली आणि त्यानंतर अवघ्या चार महिन्यांत अफगाणिस्तान पुन्हा तालिबानच्या (Taliban) ताब्यात गेलं. शेवटच्या काही दिवसांत तर अक्षरशः अजिबातच विरोध स्वीकारावा न लागता तालिबानी पटापट वेगवेगळ्या शहरांवर ताबा मिळवत गेले. पण पंजशीर खोऱ्यात (Panjshir valley) शिरकाव करणं मात्र त्यांना अद्यापही जमलेलं नाही. कारण इथं त्यांनाच आव्हान देणारा एक वीर आहे. पंजशीरचा बछडा अहमद मसूद (Ahmed masood) तालिबानसमोर उभा ठाकला आहे.

    अगदी सहज आपल्या मनासारखं होणार असं तालिबानला वाटत असतानाच विरोधाच्या एका बुलंद आवाजाने त्यांना रोखलं आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशी सगळीच परिस्थिती प्रतिकूल असूनही अहमद मसूद नावाच्या योद्ध्याने तालिबानला आव्हान दिलं आहे. पंजशीर खोऱ्यात त्याने मुजाहिदीन योद्ध्यांची फळी उभी केली असून, तालिबानने खोऱ्यात पाऊल टाकून दाखवावंच असं आव्हान त्याने दिलं आहे. एवढी हिंमत दाखवणारा हा अहमद मसूद नेमका कोण आहे?

    अफगाणिस्तानच्या नॅशनल रेझिस्टन्स फ्रंटचं (National Resistance Front) नेतृत्व अहमद मसूद (Ahmad Massoud) करतो आहे. त्याला पाहिल्यावर अनेकांना त्याचे वडील अहमदशाह मसूद यांचंच स्मरण होतं आहे. कारण इतिहासाची जणू पुनरावृत्ती होत आहे.

    हे वाचा - तालिबानविरुद्ध लढणाऱ्या पंजशीरची ताकद वाढली, अफगाणी सैनिक शस्त्रांसह आले मदतीला

    त्याचे वडील अहमदशाह मसूद हे अफगाणिस्तानातले तालिबानविरोधी लोकप्रिय योद्धे म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म पंजशीर खोऱ्यात 1953 साली झाला. त्यांनी 1979 साली आपल्या नावापुढे मसूद हा शब्द जोडला. त्याचा अर्थ होतो नशीबवान. अहमदशाह यांनी त्या वेळी काबूलमध्ये सत्तेत असलेलं कम्युनिस्ट सरकार, तसंच तत्कालीन सोव्हिएत युनियनला (Soviet Union) कडवा विरोध केला. ते देशातल्या सर्वांत प्रभावी मुजाहिदीन कमांडर्सपैकी एक झाले.

    2001 ते 2021 या कालावधीत नाटोच्या (NATO) पाठिंब्यावर अफगाणिस्तानमध्ये अस्तित्वात असलेल्या सरकारच्या कालावधीत देशातला सर्वांत सुरक्षित भाग कुठला असेल, तर तो होता पंजशीर खोरं. अर्थात, पंजशीर खोऱ्याची ही सुरक्षितता अहमदशाह मसूद यांच्या कार्यामुळे होती. कारण त्यांनी इस्लामी मूलतत्त्ववादी गट असलेल्या तालिबानला तीव्र विरोध करून त्यांचं या भागातलं वर्चस्व कमी होण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली होती.

    शेवटी अल-कैदा, तालिबान या संघटनांच्या आदेशावरून 9 सप्टेंबर 2001 रोजी अहमदशाह मसूद यांची हत्या करण्यात आली. त्यांची हत्या झाली, तेव्हा त्यांचा मुलगा अहमद लहान होता, तरीही त्याच्यावर अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचे संस्कार झाले होते. ते संस्कार आता प्रकर्षाने दिसून येत आहेत. म्हणूनच, बाकीच्या अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवला असला, तरी अद्याप पंजशीर खोऱ्यात (Panjshir Valley) त्यांना घुसता आलेलं नाही.

    हे वाचा - अफगाणिस्तानात जीन्सवर बंदी? हा इस्लामचा अपमान असल्याचं सांगत तरुणांना मारहाण

    तालिबानविरुद्ध लढण्यासाठी सर्व शक्तींनी, सर्व सैनिकांनी आपल्याला साथ द्यावी असं आवाहन अहमद मसूद याने केलं आहे. फ्रेंच विचारवंत बर्नार्ड-हेन्री लेव्ही (Bernard-Henry Levy) यांनी त्याच्याशी फोनवरून संपर्क साधला होता. त्या वेळी अहमदने त्यांना सांगितलं, 'विरोध तर आत्ता कुठे सुरू झाला आहे. शरणागती हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.'

    पंजशीरमध्ये 1998 साली एका गुहेत अहमदचे वडील अहमदशाह (Ahmadshah) यांनी आपले सैनिक गोळा केले होते. तेव्हा अहमद 9 वर्षांचा होता. तेव्हा अहमदशाह यांनी सैनिकांसमोर केलेलं वक्तव्य अहमदच्या आजही स्मरणात असल्याचं त्याने सांगितल्याचं लेव्ही यांनी म्हटलं आहे. 'जेव्हा तुम्ही तुमच्या स्वातंत्र्यासाठी लढता, तेव्हा तुम्ही आमच्या स्वातंत्र्यासाठीही लढत असता,' असं ते म्हणाले होते.

    तीच भावना कायम राखून अहमद मसूदने वॉशिंग्टन पोस्टमध्ये (Washington Post) लेख लिहून पाश्चात्य देशांना मदतीचं आवाहन केलं आहे. 'खुला समाज मिळण्यासाठी आम्ही दीर्घ काळापासून लढतो आहोत. असा समाज जिथे मुली डॉक्टर बनू शकतात, जिथे पत्रकारांना मुक्तपणे पत्रकारिता करण्याचं स्वातंत्र्य असेल, जिथे तरुणांना संगीत ऐकण्याची, नाचण्याची किंवा स्टेडिअममध्ये जाऊन फुटबॉल मॅचेस पाहण्याची संधी मिळेल, जी स्टेडिअम्स पूर्वी तालिबान्यांकडून सार्वजनिकरीत्या मृत्युदंड देण्यासाठी वापरली जात होती आणि कदाचित पुन्हाही तशी वेळ येऊ शकेल,' असं त्याने लिहिलं आहे.

    हे वाचा -अफगाणी पॉपस्टार म्हणते पाकिस्तान नव्हे भारतच आहे सच्चा मित्र!

    'मी आज पंजशीर खोऱ्यासाठी लिहितो आहे. मुजाहिदीन (Mujahideen) योद्धे तालिबानला (Taliban) पुन्हा एकदा शिंगावर घ्यायला सज्ज आहेत. त्यांच्यासोबत मी माझ्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून चालण्यास सज्ज आहे. आमच्याकडे शस्त्रसाठा आणि दारूगोळा आहे. तो आम्ही माझ्या वडिलांच्या काळापासून संयमाने हळूहळू गोळा केला आहे. कारण आम्हाला कल्पना होती, की हा दिवस कधी ना कधी तरी येईल,' असं अहमदने लिहिलं आहे.

    'तालिबान ही केवळ अफगाणिस्तानपुढची समस्या नाही. अफगाणिस्तानचं (Control of Afghanistan) नियंत्रण तालिबानच्या हातात गेलं, तर इथे पुन्हा एकदा लोकशाहीविरोधातले कट रचले जातील. मूलतत्त्ववाद्यांच्या (Extremist) कारवायांसाठी हे महत्त्वाचं ठिकाण ठरेल, यात काही शंका नाही,' असंही अहमदने त्या पत्रात लिहिलं आहे.

    First published:
    top videos

      Tags: Afghanistan, Taliban, World news