मराठी बातम्या /बातम्या /explainer /

Explainer: बेडवरून 'Work From Home' ठरु शकतं मानसिक आरोग्याला घातक

Explainer: बेडवरून 'Work From Home' ठरु शकतं मानसिक आरोग्याला घातक

शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्याही कणखर (Mentally Strong) असणं किती महत्त्वाचं आहे, याची जाणीव कोरोनाच्या काळात सर्वांनाच झाली.

शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्याही कणखर (Mentally Strong) असणं किती महत्त्वाचं आहे, याची जाणीव कोरोनाच्या काळात सर्वांनाच झाली.

शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्याही कणखर (Mentally Strong) असणं किती महत्त्वाचं आहे, याची जाणीव कोरोनाच्या काळात सर्वांनाच झाली.

नवी दिल्ली, 08 ऑक्टोबर: मानसिक आरोग्याचं महत्त्व सर्वांनाच प्रकर्षाने कळून चुकलं ते कोरोनाच्या जगद्व्यापी संसर्गाच्या काळात. बाहेर पडायचं तर कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती, घरातच कोंडून राहायचं तर खायचं काय याची भ्रांत, असे प्रश्न जगातल्या कोट्यवधी नागरिकांना या काळात पडले. शिवाय घरातल्या कोणाला या कोरोनाचा संसर्ग झाला किंवा कोणी दुर्दैवाने मृत्युमुखी पडलं, तर येणारा मानसिक ताण (Mental Stress) वेगळाच. त्यामुळे शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्याही कणखर (Mentally Strong) असणं किती महत्त्वाचं आहे, याची जाणीव कोरोनाच्या काळात सर्वांनाच झाली. मानसिक आरोग्य (Mental Health) हा विषय महत्त्वाचा असला, तरी त्याकडे म्हणावं तितकं लक्ष दिलं जात नाही. म्हणून दर वर्षी 10 ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिन अर्थात वर्ल्ड मेंटल हेल्थ डे (World Mental Health Day) साजरा केला जातो.

सध्याच्या काळात मानसिक आरोग्याचा प्रश्न ज्यामुळे उभा राहू शकतो, असे कित्येक प्रश्न आहेत; मात्र त्यातला एक महत्त्वाचा प्रश्न ज्यातून उभा राहू शकतो किंवा राहतो, तो म्हणजे वर्क फ्रॉम होम (Work From Home). कोरोनाच्या अगदी सुरुवातीचा थोडा कालावधी वगळला, तर त्यानंतर जिथे शक्य आहे, त्या क्षेत्रातल्या अनेकांना वर्क फ्रॉम होमची सवलत देण्यात आली. नंतर गेल्या दीड वर्षात तर वर्क फ्रॉम होम हेच जणू नॉर्मल होऊन गेलं आहे. त्यामुळे अनेक त्रास वाचले, वेळेची बचत झाली, प्रवासखर्च वाचला, धावपळ कमी झाली, असे अनेक फायदे झाले; मात्र वर्क फ्रॉम होम योग्य पद्धतीने केलं नाही, तर मानसिक आरोग्यापुढे मात्र मोठं आव्हान उभं ठाकू शकतं, असं लक्षात आलं. 'हेल्थशॉट्स डॉट कॉम' या वेबसाइटवर या संदर्भातला लेख प्रसिद्ध झाला आहे.

हेही वाचा-  Explainer - विमान प्रवासात बाळाचा जन्म झाल्यास त्याचं जन्म ठिकाण काय असतं?

घरून काम करणं अनेक दृष्टीने सोयीचं असलं, तरी अनेक जणांच्या घरी त्यासाठी वेगळी जागा नसते. टेबल-खुर्चीची सोयही नसते. या सगळ्यामुळे वातावरणनिर्मिती होत नाही. त्यामुळे कामावर लक्ष केंद्रित करणं अवघड होतं. काही जण तर चक्क बेडवरूनच काम करतात. बेडवरून काम करणं ही संकल्पना वरवर पाहताना एकदम आरामदायी वाटणं शक्य आहे; मात्र 'वर्क फ्रॉम बेड' (Work From Bed) ही गोष्ट मानसिक आणि भावनिक आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकते आणि त्यामुळे आत्मविश्वास कमी होऊ शकतो, असं मुंबईच्या वोकहार्ट हॉस्पिटलमधल्या सायकिअॅट्रिस्ट डॉ. सोनल आनंद यांना वाटतं.

बेडवरून काम करणं ही बाब शरीरासाठीही चांगली नसते. कारण मान, पाठ आणि पाठीचा कणा ताठ राहत नसल्यामुळे या अवयवांचं दुखणं ओढवू शकतं. शिवाय स्क्रीनपासून डोळ्यांचं अंतर योग्य न राखलं गेल्यामुळे डोळ्यांचे विकारही ओढवू शकतात; पण या शारीरिक गोष्टी असल्यामुळे याबद्दल अनेकांना अनुभव येतो आणि त्यातून त्यांना काही प्रमाणात शहाणपणही येतं; पण शरीरावर होणारे आणखीही काही अप्रत्यक्ष परिणाम, तसंच मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम अनेकांच्या लक्षात येत नाहीत. ते दुष्परिणाम कोणते असू शकतात, याबद्दल डॉ. सोनल आनंद यांनी माहिती दिली आहे.

'वर्क फ्रॉम बेड'चे शारीरिक दुष्परिणाम

बेड अर्थात पलंगाचा मुख्य उपयोग झोपण्यासाठी किंवा रोमान्ससाठी करणं अपेक्षित असतं. जेव्हा बेड कामासाठी किंवा वाचनासाठी वापरला जातो, तेव्हा दुसऱ्या व्यक्तीच्या झोपेवर त्याचा दुष्परिणाम होतो. शिवाय यामुळे झोपेशी असलेलं बेडचं नातं थोडं कमजोर होतं आणि त्यामुळे एरव्हीही त्या बेडवर झोपताना झोप कमी होऊ शकते.

हेही वाचा-  Drugs घेतले तर आपल्या देशात जास्तीत जास्त काय आहे शिक्षा? फाशीचीही आहे तरतूद?

दुसरीकडे, बेडवरून काम करताना धड कामात लक्ष लागत नाही आणि झोप (Sleepy) येऊ शकते. त्यामुळे कामावर लक्ष केंद्रित होऊ शकत नाही. साहजिकच प्रॉडक्टिव्हिटी कमी होते. शिवाय नीट बसून काम करता येत नसल्यामुळे आपली स्थिती बिघडू शकते. त्यामुळे मात, पाठ, हात, मनगटं, डोळे दुखू शकतात.

एकाच ठिकाणी बसून काम करत राहिल्यामुळे वजन वाढतं. त्यामुळे अॅसिडिटीलाही (Acidity) निमंत्रण दिलं जातं. अशा रीतीने अनेक दुष्परिणामांची साखळी सुरू होते. सेक्स लाइफवरही दुष्परिणाम होऊ शकतो.

'वर्क फ्रॉम बेड'चे मानसिक दुष्परिणाम

सर्वसाधारणपणे बेडरूमचं वातावरण हे झोपेच्या आणि रोमान्सच्या दृष्टीने तयार केलेलं असतं. तिथे सूर्यप्रकाशाची किंवा एकंदर प्रकाशाची उपलब्धता कमी प्रमाणात असू शकते. अनेकांच्या बेडरूम्सच्या खिडक्या बऱ्याचदा बंदच असतात. या सगळ्यामुळे हे वातावरण कामासाठी उत्साह निर्माण करणारं नसतं. सूर्यप्रकाशात प्रेरणा देण्याची नैसर्गिक शक्ती असते. ती तिथे मिळत नाही. मंद प्रकाशात काम करताना दमल्यासारखं वाटू शकतं आणि त्याचा नकारात्मक परिणाम मनावर होतो. अशा वातावरणात मूड स्विंग होऊ (Mood Swings) शकतात.

हेही वाचा- Explainer: चटका लागतो म्हणजे नेमकं काय होतं? स्पर्श आणि तापमानाची संवेदना डिकोड करणाऱ्या शास्त्रज्ञांना नोबेल

बेडरूममधल्या मंद प्रकाशयोजनेमुळे (Dim Lighting) तिथे काम करताना मनावरचा ताण, चिंता वाढते. सातत्याने ताण राहिला, तर साहजिक मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम होतो. झोप कमी होते, ऊर्जा कमी होते, उत्साह कमी होतो, कामाची उत्पादकता घटते, त्याचा परिणाम पुन्हा मानसिकतेवर होतो, त्यामुळे पुन्हा ताण वाढतो. असं दुष्टचक्र सुरू राहतं.

हे सगळं टाळण्यासाठी काय करायचं?

डॉ. सोनल आनंद म्हणतात, की आपलं रुटीन व्यवस्थित जपणं हे पूर्वीपेक्षाही आताच्या काळात खूपच महत्त्वाचं झालेलं आहे. घरूनच काम करताना वर्क-लाइफ बॅलन्स (Work-Life Balance) साधणं सोपं आहे, असं वाटत असलं, तरी ते ठरवून केल्याशिवाय होत नाही. घरून काम करताना प्रॉडक्टव्हिटी कायम राखण्यासाठी अधूनमधून ब्रेक्स घेणं महत्त्वाचं आहे. काही जणांना बेडवरून काम करण्याशिवाय पर्यायच नसेल, तर अशा व्यक्तींनी अधूनमधून जागेवरून उठून पोझिशन्स बदलल्या पाहिजेत, स्ट्रेचिंग केलं पाहिजे. त्यामुळे डोळे, पाठ, मान आदी अवयव दुखणार नाहीत. हालचाली होत राहिल्यामुळे अॅसिडिटीसारखे त्रास होणार नाहीत आणि चिंता, ताणही येणार नाही.

ऑफिसमध्ये काम करताना ऑफिसचा म्हणून एक माहौल असतो. तसं वर्किंग एन्व्हायर्न्मेंट (Working Environment) घरीही तयार करायला हवं. म्हणजे बेडवरून काम करण्यापेक्षा टेबल-खुर्चीचा वापर करावा. योग्य पद्धतीने बसावं. शक्य असल्यास बेडरूमपेक्षा अन्य खोलीत काम करावं. टेबलवर एखाद-दुसरं इनडोअर प्लांट लावावं. लॅपटॉप चार्जर्स वगैरे गोष्टी पसारा होणार नाहीत, अशा पद्धतीने मांडाव्यात. एकंदरीत मनाला फ्रेश वाटेल, अशा पद्धतीचं वातावरण तयार करावं. त्यामुळे कामालाही उत्साह येतो आणि मनावरचा ताण हलका होतो.

हेही वाचा-  प्राणी नाही तर वनस्पतींही देतात दूध आणि मांस; कधी खाल्लं आहे का Vegetarian Meat and Milk

घरूनच काम करत असलो, तरी गबाळं राहून काम करू नये. रात्री झोपताना घातलेले कपडेच घालून कामाला बसू नये. प्रॉपर ड्रेसिंग (Proper Dressing) करून कामाला बसल्यास आपल्यालाही कामाचा फील येतो. तसंच, कामाच्या वेळा आणि आपल्या वैयक्तिक कामाच्या वेळा, जेवणा-खाण्याच्या वेळा, व्यायामाच्या वेळा सांभाळाव्यात आणि रोज पाळाव्यात. या सगळ्यामुळे एक रूटीन बसेल आणि त्याचा फायदा शरीराला आणि मनालाही नक्की होईल.

First published:

Tags: Work from home