मराठी बातम्या /बातम्या /explainer /

Explainer: चटका लागतो म्हणजे नेमकं काय होतं? स्पर्श आणि तापमानाची संवेदना डिकोड करणाऱ्या शास्त्रज्ञांना नोबेल

Explainer: चटका लागतो म्हणजे नेमकं काय होतं? स्पर्श आणि तापमानाची संवेदना डिकोड करणाऱ्या शास्त्रज्ञांना नोबेल

सूर्याची धग स्पर्शातून कशी जाणवते? तिखट मिरची कशी झोंबते? स्पर्श आणि तापमानाबद्दलच्या या संशोधनामुळे वेदनांची तीव्रता कमी करण्याच्या संशोधनातही मोलाची भर पडू शकते.

सूर्याची धग स्पर्शातून कशी जाणवते? तिखट मिरची कशी झोंबते? स्पर्श आणि तापमानाबद्दलच्या या संशोधनामुळे वेदनांची तीव्रता कमी करण्याच्या संशोधनातही मोलाची भर पडू शकते.

सूर्याची धग स्पर्शातून कशी जाणवते? तिखट मिरची कशी झोंबते? स्पर्श आणि तापमानाबद्दलच्या या संशोधनामुळे वेदनांची तीव्रता कमी करण्याच्या संशोधनातही मोलाची भर पडू शकते.

नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर: आपल्या शरीराला उष्णतेची धग जाणवते, थंडीचा कडाका समजतो, प्रेमाच्या व्यक्तीने मारलेल्या मिठीतली मायेची ऊब कळते आणि स्पर्शांचा अर्थही उमगतो. या संवेदना  (touch Sensations) कळतात म्हणजे मेंदूला जाणीव होते, असं आपल्याला विज्ञान सांगतं आणि त्यात मज्जासंस्थेची (Nervous System) महत्त्वाची भूमिका आहे, हेही आपल्याला माहिती आहे; पण या शारीरिक संवेदनांचं (Physical Sensations) मज्जासंस्थेच्या इलेक्ट्रिकल संदेशांत (Electrical Messages) रूपांतर नेमकं कसं होत असेल? नेमक्या याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी अमेरिकेतले प्रा. डेव्हिड ज्युलियस (Prof. David Julius) आणि प्रा. आर्डेम पॅतापौटियन (Prof. Ardem Patapoutian) यांनी संशोधन केलं. त्यांचं हेच संशोधन यंदाच्या मेडिसीन/फिजिऑलॉजी (Nobel in Medicine/Physiology 2021) विभागातल्या नोबेल पुरस्काराचं मानकरी ठरलं आहे. नोबेल पारितोषिक समितीकडून आज, चार ऑक्टोबर रोजी त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यांच्या या संशोधनातून वेदनांवर उपचार करण्याचे नवे मार्ग शोधण्याचा रस्ता सापडू शकतो, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. 'बीबीसी'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

10 दशलक्ष स्वीडिश क्रोनॉर म्हणजेच 1.14 दशलक्ष डॉलर्स किंवा 8 लाख 45 हजार पौंड एवढ्या रकमेचं हे पारितोषिक या शास्त्रज्ञांना विभागून दिलं जाणार आहे.

Explainer : डेंग्यू म्हणजे काय?, कसा होतो प्रसार, काय आहेत लक्षणे आणि उपचार?

नोबेल पारितोषिक समितीतले थॉमस पर्लमन यांनी म्हटलं आहे, की या दोन्ही शास्त्रज्ञांनी केलेलं हे संशोधन अत्यंत महत्त्वाचं आहे. उष्णता, थंडी किंवा मेकॅनिकल फोर्स या गोष्टींमुळे नर्व्ह इम्पल्स कसा तयार होतो आणि त्याच्या साह्याने आपल्याला आपल्या आजूबाजूच्या जगाचं ज्ञान कसं होतं आणि त्याच्याशी जुळवून कसं घेता येतं, हे समजून घेणं या संशोधनामुळे शक्य झालं आहे. तीव्र वेदनांसह वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांवर उपचारपद्धती विकसित करण्यासाठी या ज्ञानाचा वापर करून घेतला जात आहे, असंही या समितीने म्हटलं आहे.

प्रा. डेव्हिड ज्युलिअस यांनी सॅन फ्रान्सिस्कोमधल्या कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीत हे संशोधन केलं. अनेकांना मिरची (Chilli Pepper) खाणं आवडतं, तर कित्येक जणांना नुसती मिरची खाणं आवडत नसलं, तरी मिरचीचा तिखटजाळ स्वाद आवडतो. मिरची खाल्ल्यावर जिभेला होणारी जळजळ झाल्याची जाणीव नेमकी कशी होते, असा प्रश्न प्रा. डेव्हिड यांना पडला आणि त्यातून त्यांनी संशोधनाला सुरुवात केली.

प्राणी नाही तर वनस्पतींही देतात दूध आणि मांस; कधी खाल्लं आहे का Vegetarian Meat and Milk

 मिरचीमध्ये असलेल्या कॅप्सिसिन (Capsaicin) या रसायनामुळे मिरचीला तिखट स्वाद येतो. आपल्या जिभेवरच्या पेशींमध्ये अनेक प्रकारचे संवेदक अर्थात रिसेप्टर्स (Receptors) असतात. त्यातला नेमका कोणत्या प्रकारचा रिसेप्टर कॅप्सिसिनला प्रतिसाद देतो, हे प्रा. डेव्हिड यांनी शोधून काढलं. अधिक संशोधनाअंती असं लक्षात आलं, की तोच रिसेप्टर उष्णतेलाही प्रतिसाद देत होता. त्रासदायक किंवा वेदनादायी तापमानामध्ये त्याच्या कामाला चालना मिळते.

या संशोधनामुळे प्रा. डेव्हिड आणि प्रा. आर्डेम यांना असे सर्व प्रकारच्या तापमानाच्या संवेदनांना प्रतिसाद देणारे रिसेप्टर शोधून काढण्याची प्रेरणा मिळाली. थंड तापमानाला प्रतिसाद देणारा रिसेप्टरही त्यांनी शोधून काढला.

स्क्रिप्स रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत असलेल्या प्रा. पतापौटियन यांनी डिशमध्ये पेशी घेऊन त्यांच्यावर बळाचा (Mechanical Force) वापर करून पाहिला. त्या प्रयोगांतून असं लक्षात आलं, की स्पर्श किंवा बळाचा वापर केल्यास वेगळ्या प्रकारचा रिसेप्टर कार्यान्वित होतो.

या मूलभूत संशोधनाबद्दल या संशोधकद्वयीला हे पारितोषिक जाहीर करण्यात आलं आहे. येत्या काही दिवसांत वेगवेगळ्या विभागांतली नोबेल पारितोषिकं जाहीर केली जातील. भौतिकशास्त्रातलं नोबेल मंगळवारी (5 ऑक्टोबर), रसायनशास्त्रातलं नोबेल बुधवारी (6 ऑक्टोबर), साहित्यातलं गुरुवारी, तर शांततेच नोबेल शुक्रवारी जाहीर केलं जाणार आहे. अर्थशास्त्रातलं नोबेल 11 ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे, असं 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तात म्हटलं आहे.

डायनामाइटचा शोध लावणारा स्वीडिश शास्त्रज्ञ आल्फ्रेड नोबेल (Alfred Nobel) याने ठेवलेल्या संपत्तीतून ही पारितोषिकं दर वर्षी दिली जातात.

First published:

Tags: Nobel, Science