नवी दिल्ली, 15 जून: सुपरमार्केट सर्वसामान्यांच्या अगदी बोटांपर्यंत आणून ठेवणारी व्यक्ती म्हणजे अॅमेझॉनचा (Amazon) सर्वेसर्वा जेफ बेझॉस (Jeff Bezos). आता बेझॉस आपल्याच कंपनीने बनविलेल्या रॉकेटमधून अवकाशयात्रेला जाणार आहेत. जगातल्या या सर्वांत श्रीमंत माणसांच्या यादीत असणाऱ्या व्यक्तीचं लहानपणचं स्वप्न होतं अंतराळात विहार करण्याचं. त्यांनी ते कसं पूर्ण करायचं ठरवलं आहे, त्यांच्या या अवकाशयात्रेविषयी जाणून घ्या सर्व काही..
बेझॉस अवकाशयात्रेला का चालले आहेत?
- त्यांच्या प्रवासाचं मुख्य कारण सहल हे आहे. बेझॉस हे सध्या पृथ्वीतलावरची दुसरी श्रीमंत व्यक्ती असून, त्यांची संपत्ती 185 अब्ज डॉलरहून अधिक आहे. ब्लू ओरिजिन (Blue Origin) ही बेझॉस यांची स्पेस एक्स्प्लोरेशन (Space Exploration Company) कंपनी. त्यांच्या या कंपनीने न्यू शेफर्ड (New Shephard) नावाचं रॉकेट आणि कॅप्सूल विकसित केली आहे. त्याची आतापर्यंत 15 चाचणी उड्डाणं झाली आहेत; मात्र त्यापैकी एकाही चाचणीवेळी आत कोणीही मनुष्य नव्हता.
आता 20 जुलै रोजी या स्पेसक्राफ्टचं पहिलं मानवी उड्डाण होणार असून, त्या वेळी त्यात जेफ बेझॉससह त्यांचा भाऊ मार्कही असणार आहे. त्याशिवाय यातून प्रवासासाठी एका जागेचा लिलावही करण्यात आला होता. तो लिलाव जिंकलेली व्यक्तीही यातून प्रवास करणार आहे. या लिलावाचा पहिला राउंड संपल्यानंतर कंपनीने दुसरा राउंडही आयोजित केला होता. त्यात पाच हजारांहून अधिक जणांनी भाग घेतला होता. 2.8 दशलक्ष डॉलर ही आतापर्यंतची सर्वांत मोठी बोली लावण्यात आली होती. सर्वांत मोठ्या बोली कोणी लावल्या, त्यांची नावं मात्र जाहीर करण्यात आलेली नाहीत.
बेझॉस यांना अवकाशात घेऊन जाणारं रॉकेट कसं आहे?
- न्यू शेफर्ड स्पेसक्राफ्ट हे रॉकेट आणि कॅप्सुल असा कॉम्बो असून, ते सहा माणसांना घेऊन पृथ्वीच्या वर 100 किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकतं. या रॉकेटची लांबी शेंड्यापासून बुडख्यापर्यंत 60 फूट असून, अंतराळात जाणारा पहिला अमेरिकन अॅलन शेफर्ड (Alan Shephard) यांचं नाव रॉकेटला देण्यात आलं आहे.
हे ही वाचा: डोनाल्ड ट्रम्पवर कुल्फी विकायची वेळ आली की काय? पाहा VIDEO आणि वाचा सत्य
न्यू ग्लेन (New Glenn) नावाचं आणखी एक रॉकेटही ब्लू ओरिजिन कंपनीच्या ताफ्यात आहे. पृथ्वीप्रदक्षिणा करणारा पहिला अमेरिकी अंतराळवीर जॉन ग्लेन यांचं नाव त्या रॉकेटला देण्यात आलं आहे. न्यू ग्लेनची उंची 270 फूट असून, मोठे पेलोड्स कक्षेत नेण्यासाठी त्याचा उपयोग केला जाणार आहे.
नव्या युगातल्या अब्जाधीश उद्योगपतींसाठी स्वस्तातला अवकाश प्रवास ही यानं घडवून आणणार आहेत. न्यू शेफर्ड आणि न्यू ग्लेन ही दोन्ही यानं व्हर्टिकल टेक ऑफ आणि व्हर्टिकल लँडिंग होणारी असून, त्यांचा अनेकदा पुनर्वापर करता येणार आहे.
या यानातल्या प्रवाशांना काय पाहता येणार?
- न्यू शेफर्डच्या मार्जिन ऑफ इन्फिनिटीचा स्पिन 11 मिनिटं टिकणार आहे. यानातल्या प्रवाशांना अंतराळाच्या काळेपणाच्या पार्श्वभूमीवर पृथ्वी पाहता येईल, तसंच वजनविरहित अवस्था अनुभवता येईल. ट्रिप संपल्यावर प्रेशराइज्ड कॅप्सुल पॅराशूटच्या साह्याने पृथ्वीवर परत येईल. कॅप्सुलला सहा ऑब्झर्व्हेशन विंडोज असतील.
अंतराळात गेलेले अन्य अब्जाधीश कोण आहेत?
- ब्रिटिश अब्जाधीश रिचर्ड ब्रॅन्सनकडे (Richard Branson) व्हर्जिन गॅलॅक्टिक हे यान असून, टेस्ला कंपनीचे सर्वेसर्वा एलॉन मस्कदेखील (Elon Musk) स्पेसएक्सद्वारे मानवाला अंतराळात घेऊन जायचं स्वप्न बाळगून आहेत; मात्र ही कल्पना प्रत्यक्षात आणणारे जेफ बेझॉस पहिले ठरले आहेत. आपल्या या नियोजित ट्रिपची घोषणा करताना बेझॉस यांनी इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं होतं, की 'मी पाच वर्षांचा असल्यापासून अंतराळात प्रवास करण्याचं स्वप्न पाहिलं होतं.'
हे ही वाचा:Microsoft ची मोठी घोषणा; बंद होणार Windows 10, सांगितलं हे कारण
जापनीज अब्जाधीश युसाकू माईझावा (Yusaku Maezawa) चालू वर्षाच्या डिसेंबर महिन्यात रशियाच्या सोयूझ यानातून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला भेट देणार आहेत. तसंच, 2023मध्ये ते स्पेसएक्सच्या (SpaceX) स्टारशिप व्हेइकलमधून चंद्राला प्रदक्षिणा करणार आहेत.
अवकाश प्रवास (Space Travel) किती सुरक्षित आहे?
- नासा (NASA) या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेच्या माहितीनुसार, अंतराळवीराला पाच वेगवेगळ्या प्रकारच्या धोक्यांना सामोरं जावं लागू शकतं. रेडिएशन, आयसोलेशन, पृथ्वीपासूनचं अंतर, गुरुत्वाकर्षणाचा अभाव आणि बंदिस्त वातावरण. हे धोके एकेकट्यानेच येतील असं नाही, तर ते एकमेकांवर परिणाम करू शकतात आणि त्याचा परिणाम मानवी शरीरावर होऊ शकतो. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात या संभाव्य धोक्यांचं विश्लेषण केलं जातं आणि ते कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इन्शुरन्स कंपन्यांनी अद्याप अवकाश प्रवासातल्या धोक्यांचा समावेश त्यांच्या यादीत केलेला नाही. त्यामुळे अद्याप तरी या प्रवासात मृत्यू झाल्यास त्यातून नुकसानभरपाई दिली जाणार नाही, असं एका इन्शुरन्स फर्मच्या अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amazon, Spacecraft