तिरुवनंतपुरम, 27 जुलै : एखाद्या चित्रपटात प्राण्यांचा वापर करणं हे काही नवं नाही. अगदी ‘हम आपके हैं कौन’पासून प्राण्यांच्या भूमिका प्रसिद्ध झाल्याचं आपण पाहिलं आहे. मात्र चित्रपटात एक, दोन प्राण्यांचा समावेश असेल तर ठीक आहे. परंतु डझनभर प्राणी मुख्य भूमिकेत असतील तर निर्मात्यांना काय तारेवरची कसरत करावी लागत असेल, याचा विचार आपण करूच शकतो. अशातच ‘वलाट्टी, अ टेल ऑफ टेल’ या चित्रपटाची निर्मिती कशी झाली असेल, याची कल्पना न केलेलीच बरी. कारण दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणारे देवन यांनी या चित्रपटात जवळपास 100 प्राण्यांचा वापर केला आहे. ‘वलाट्टी: टेल ऑफ टेल्स’ या मल्याळम शब्दांचा अर्थ होतो ‘शेपूट हलवणाऱ्यांची कहाणी’. 21 जुलैला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला केरळमध्ये उत्तम प्रतिसाद मिळतोय. एकमेकांच्या शेजारी राहणाऱ्या नर गोल्डन रिट्रिव्हर आणि मादी कॉकर स्पॅनियल श्वानांची म्हणजेच कुत्र्यांची लव्हस्टोरी या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. ‘द लायन किंग’ चित्रपटाप्रमाणेच लोकप्रिय कलाकारांनी या चित्रपटातील प्राणी आणि पक्ष्यांना आवाज दिला आहे. मात्र यात खरे प्राणी वापरण्यात आले आहेत. त्यासाठी श्वानांना वर्षभर प्रशिक्षण देण्यात आलं. कोरोना काळात सुरू झालेलं या चित्रपटाचं चित्रीकरण सुमारे 100 दिवसांत पूर्ण झालं.
दिग्दर्शक देवननं ‘न्यूज18’ला दिलेल्या माहितीनुसार, एकापेक्षा जास्त प्राणी एकाच फ्रेममध्ये होते, हाच फार कठीण भाग होता. जर त्यांना एकाच प्रकारचं प्रशिक्षण दिलं गेलं असतं, तर सर्वांचे हावभाव सारखेच दिसले असते. त्यामुळे प्रत्येक प्राण्याला वेगवेगळ्या पद्धतीने प्रशिक्षण देण्यात आलं, जेणेकरून त्यांच्या भूमिकांमध्ये गोंधळ होऊ नये. शबीर, जिजेश, शालिन आणि व्हिक्टर हे श्वानांचे मुख्य प्रशिक्षक होते. श्वानांपेक्षा त्यांच्या पिल्लांना प्रशिक्षण देणं सर्वात अवघड होतं. अगदी लहानपणापासून त्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली होती. काही पिल्लं तर 40 दिवसांचीच होती. त्यांना शूटिंग सेटमधील उपकरणांचा परिचय व्हावा यासाठी मूव्ही कॅमेरा आणि लायटिंगसारखी खेळणी दिली गेली होती. आता, मटण-चिकन नाही! आता ‘या’ चविष्ट मांसाला आहे सर्वाधिक मागणी मुख्य पात्र साकारणाऱ्या श्वानांच्या जोडीशिवाय रॉटविलर, लॅब्राडोर रिट्रिव्हर, अफगाण हाउंड, डॉबरमॅन, इत्यादींसह काही स्थानिक प्रजातींचे श्वान होते. प्रत्येकवेळी त्यांचा मूड खूप महत्त्वाचा होता. अॅनिमल वेल्फेअर बोर्ड अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली शूटिंग सुरू होतं. प्राण्यांसाठी वातानुकूलित कॅराव्हॅन वापरण्यात आल्या आणि त्यांना हवं तेव्हा त्यांच्या केबिनमध्ये नेलं गेलं. एकाच फ्रेममध्ये जवळपास 100 श्वान भुंकत असलेला क्लायमॅक्स चित्रित करण्यासाठी सुमारे 10 दिवस लागले, अशी माहिती देवनने दिली. गेल्या दशकात मल्याळम चित्रपटसृष्टीत डझनभर दिग्दर्शकांना ओळख मिळवून देणारे निर्माते विजय बाबू यांनी देवननला पाठिंबा दिला. स्क्रिप्टमध्ये जास्त मानवी कलाकार नसल्यामुळे किफायतशीर बजेटवर शूटिंगची सुरुवात झाली होती. मात्र निर्मात्यांनी चित्रित केलेला भाग पाहिला तेव्हा बजेट वाढवण्यात आलं. या चित्रपटाची हिंदी, तेलुगू, तमिळ आणि कन्नड व्हर्जन्स येत्या काही दिवसांत चित्रपटगृहात दाखल होणार आहेत. दरम्यान, ‘या प्रोजेक्टला जवळपास चार वर्ष लागली. कारण प्राण्यांचं प्रशिक्षण जवळपास तीन वर्ष सुरू होतं. एवढं मोठं प्री-प्रॉडक्शन शेड्युल असलेला दुसरा कोणताही चित्रपट आतापर्यंत झाला असेल, असं मला तरी नाही वाटत’, असं मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते विजय बाबू म्हणाले. त्यांनी या चित्रपटात रोहिणी, श्रीकांत मुरली, देव मोहन, महिमा नांबियार आणि अक्षय राधाकृष्णन यांच्यासोबत स्क्रीन स्पेस शेअर केली आहे.