मुंबई, 25 ऑगस्ट: टिकटॉक स्टार आणि भारतीय जनता पक्षाची नेता सोनाली फोगट हिचं नुकतंच निधन झालं. परंतु, सोनालीचा मृत्यू संशयास्पद आहे, यामागे मोठं कटकारस्थान आहे, असा दावा सोनालीच्या भावानं केला आहे. याबाबत सोनालीच्या भावानं पोलिसांत तक्रारही दिली आहे. यात बलात्कार, ब्लॅकमेलिंगसारख्या अनेक गोष्टी नमूद आहेत. त्यामुळे सोनालीच्या मृत्यूची घटना सामान्य नाही, तर तिची हत्या करण्यात आली आहे, असं त्यात म्हटलं आहे. सोनालीचा मृत्यू अचानक हार्ट अॅटॅक येऊन होणं, हे केवळ अशक्य आहे, असं तिच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. त्यामुळे जोपर्यंत मृतदेहाचं पोस्टमॉर्टेम होत नाही, या प्रकरणाचा सखोल तपास होत नाही, तोपर्यंत सोनालीच्या मृत्यूचं खरं कारण समोर येणार नाही, हे स्पष्ट आहे. आज तकने याविषयीचं वृत्त दिलं आहे. टिकटॉक स्टार आणि बीजेपी नेता सोनाली फोगट हिच्या मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. सोनालीचा भाऊ रिंकू ढाका याने तिच्या मृत्यूसंदर्भात पोलिसांत तक्रार दिली आहे. सोनालीचा मृत्यू हा किरकोळ नसून, ते कटकारस्थान आहे, असं या दाखल तक्रारीवरून दिसतं. यात सोनालीसोबत वर्षानुवर्षं सुरू असलेला बलात्कार, ब्लॅकमेलिंग आणि स्लो पॉयझनिंगची वेदनादायी कथा दडलेली आहे. हेही वाचा - Sonali Phogat: सोनाली फोगाट मृत्यूप्रकरणाला नवं वळण; भाच्याने ‘या’ जवळच्या व्यक्तीवर केला कटकारस्थानाचा आरोप सोनाली फोगट एक अभिनेत्रीही होती. ती सोशल मीडियावर लहान व्हिडिओ आणि आकर्षक फोटोज शेअर करत असे. ती फिटनेस फ्रिक आणि आरोग्याविषयी सजग होती. ती तिच्या आरोग्याची काळजी घेत असे. ‘सोनालीचा हार्ट अॅटॅकमुळे अचानक मृत्यू होणं अशक्य आहे’, असं तिच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. सोनालीच्या मृत्यूप्रकरणी प्राथमिक कारवाईचा भाग म्हणून गोवा पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. सध्या तिचे कुटुंबीय गोव्यात आहेत. सोनालीच्या मृत्यूची घटना घडून आता 48 तासांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. परंतु, अजूनही मृतदेहाचं पोस्टमॉर्टेम झालेलं नाही; मात्र गोवा सरकार अजूनही सोनालीचा मृत्यू ही सर्वसामान्य घटना मानत आहे. ‘सोनालीच्या मृत्यूचं खरं कारण स्पष्ट होण्याकरिता आमची सखोल तपास करण्याची तयारी आहे’, असं गोवा सरकारने म्हटलं आहे. जी स्त्री स्वतःची तुलना अनेकदा वाघिणीशी करते, जी अनेकदा राजकारणाच्या माध्यमातून नागरिकांच्या भल्यासाठी आपले प्राण झोकून देण्याचा दावा करते, प्रत्यक्षात ती आपल्या खासगी आयुष्यात कारस्थानांच्या भोवऱ्यात इतकी वाईटरीत्या अडकलेली असावी, यावर विश्वास ठेवणं खूप कठीण आहे; पण सोनालीचा भाऊ रिंकू ढाकाने तक्रारीत नमूद केलेल्या प्रत्येक ओळीतून सोनालीच्या आयुष्यात सुरू असलेलं कटकारस्थान स्पष्ट होतं. ते पाहिलं तर कोणाचाच त्यावर विश्वास बसणार नाही. हेही वाचा - Sonali Phogat Death: सोनाली फोगाटची ‘ती’ पोस्ट ठरली शेवटची; VIDEO होतोय VIRAL सोनालीच्या भावाची तक्रार खूप काही सांगून जाते. या तक्रारीनुसार सोनालीचा मृत्यू ही केवळ हत्या नसून, त्यामागचा कट आणि हेतूही दिसून येतो. सोनालीच्या भावानं सांगितलं, `सोनालीचा पीए सुधीर सांगवान आणि त्याचा मित्र सुखविंदर यांनी मिळून माझ्या बहिणीला जाळ्यात अडकवलं. सुखविंदरने तीन वर्षांपूर्वी सोनालीच्या जेवणात अंमली पदार्थ मिसळून तिच्यावर बलात्कार (Rape) केला होता आणि त्याचा व्हिडिओही बनवला होता. त्यानंतर सुधीर आणि त्याचा मित्र सुखविंदर सातत्यानं सोनालीला ब्लॅकमेल (Blackmail) करत होते. हे दोघं अधूनमधून सोनालीच्या जेवणात विषारी पदार्थ मिसळत होते. त्यामुळे अनेकदा तिची प्रकृती बिघडली होती. शेवटी या दोघांनी मिळून कट करत गोव्यात नेऊन तिची हत्या केली.` `गोव्याला जाण्याबाबत सोनालीचं कोणतंही प्लॅनिंग नव्हतं. तिथं कोणतंही शूटिंगदेखील नव्हतं. परंतु, ती गुरुग्राम येथून गोव्याला गेल्याचं कुटुंबीयांना समजलं. तिथंच तिचा संशयास्पद मृत्यू झाला. वास्तविक हा मृत्यू म्हणजे नियोजित हत्या आहे,` असं रिंकूनं म्हटलं आहे. `गोव्याला पोहोचताच जीवनात होत असलेल्या त्रासाविषयी प्रथमच सोनालीनं आपली बहीण आणि मेव्हण्यांना सांगितलं; मात्र कुटुंबीय मदतीला पोहोचण्यापूर्वीच तिचा गोव्यात मृत्यू झाला,` असं तिच्या भावाचं म्हणणं आहे. सोनालीच्या भावाव्यतिरिक्त तिच्या कुटुंबीयांनी आतापर्यंत जे काही सांगितलं आहे, ते सोनालीच्या मृत्यूमागे कटकारस्थान असल्याकडे निर्देश करतं. सोनालीच्या बहिणीच्या म्हणण्यानुसार, `सोनाली माझ्याशी गोव्यावरून व्हॉट्सअॅप कॉलवर बोलली होती. जेवल्यावर माझे हात-पाय गळून गेले असून, त्याचा मला त्रास होत आहे, अशी तक्रार फोनवरून सोनालीनं मृत्यूपूर्वी केली होती. परंतु, ती याबाबत अधिक काही सांगण्यापूर्वीच त्या रात्री सोनालीच्या खोलीत कोणी तरी आलं आणि सोनालीनं संभाषण मध्येच थांबवलं.` हेही वाचा - Sonali Phogat: हार्ट अटॅक की घातपात? सोनालीच्या मृत्यूबाबत गोवा पोलिसांनी दिली मोठी अपडेट सोनालीच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, `सोनालीसोबत असं घडण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. काही दिवसांपूर्वीही तिने अन्न खाल्ल्यावर त्रास होत असल्याची तक्रार केली होती. त्या वेळी तिला कुटुंबीयांनी डॉक्टरांची भेट घेण्याचा सल्ला दिला होता; पण तिने त्याकडे गांभीर्यानं पाहिलं नाही.` सोनालीनं ही गोष्ट तिच्या आईला आणि लहान बहीण रूपेशला सांगितली होती. एकदा खीर खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडल्याचं सोनालीनं सांगितलं होतं. तसंच तेव्हाही खीर तिला पीए सुधीरनं दिली होती, असंही ती म्हणाली होती. ‘केवळ सोनालीच्या हत्येबाबत आमचे आरोप नसून, तिच्या हत्येनंतर मारेकरी पुरावे (Evidence) नष्ट करण्याचाही प्रयत्न करत आहेत’, असं तिच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे. ‘सोनालीच्या मृत्यूनंतर आमच्या हिस्सार इथल्या फार्म हाउसमध्ये लावलेला सीसीटीव्हीचा डीव्हीआर, तिचा लॅपटॉप आणि अन्य काही वस्तू चोरीला गेल्या आहेत. हे सर्व कृत्य तिचा पीए सुधीर सांगवान आणि त्याचा मित्र सुखविंदरनेच केलं आहे’, असं सोनालीच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. या सर्व गोष्टी पाहता जोपर्यंत सोनालीचं पोस्टमॉर्टेम होत नाही, व्हिसेराचा टॉक्सिकोलॉजी अहवाल येत नाही, तिच्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सची फॉरेन्सिक तपासणी होत नाही आणि संशय असलेल्या व्यक्तींची चौकशी केली जात नाही, तोपर्यंत सोनालीच्या गूढ मृत्यूचं सत्य समोर येणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.