मुंबई, 24 ऑगस्ट- भाजप नेत्या आणि प्रसिद्ध टिकटॉक स्टार सोनाली फोगाट यांचं काल हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. काल सोनालीच्या बहिणीने हा मृत्यू नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यांनतर आता त्यांच्या भाच्याने त्यांच्या जवळच्या एका व्यक्तीवर संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे सोनाली फोगाट मृत्यूप्रकरकणाला नवं वळण लागलेलं पाहायला मिळत आहे. सोनाली फोगाट आपल्या टीमसोबत गोव्यामध्ये होत्या. दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झाल्याचं समोर आलं आहे. त्या 44 वर्षांच्या होत्या. ‘बिग बॉस 14’मुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. त्यांच्या अचानक जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान आता या मृत्यू प्रकरणाने गंभीर वळण घेतलं आहे. काल सोनाली फोगाटची बहीण रुपेश यांनी त्यांच्या निधनावर प्रश्न उपस्थित करत हा नैसर्गिक मृत्यू नसून, घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता. याबाबत बोलतांना त्यांनी म्हटलं होतं, ‘सोनालीने मृत्यूपूर्वी घरी फोन केला होता. त्यावेळी ती व्हॉट्सऍपवर बोलायचं असल्याचं म्हटलं होती. तसेच इथे काहीतरी गडबड होत असल्याचंही म्हटलं होतं. त्यांनतर तिच्या मृत्यूची बातमी समोर आली होती’. आज तकच्या रिपोर्टनुसार, आता सोनाली फोगाट यांचा भाचा ऍडव्होकेट विकास यांनी अभिनेत्रीचा खाजगी पीए सुधीर सांगवान यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सोनालीच्या मृत्यूसाठी त्याने सुधीर यांना जबाबदार धरलं आहे. इतकंच नव्हे तर सुधीरनेच सोनालीच्या मृत्यूचा कट रचल्याचा आरोप विकासने केला आहे. **(हे वाचा:** Sonali Phogat Death: सोनाली फोगाटची ‘ती’ पोस्ट ठरली शेवटची; VIDEO होतोय VIRAL ) तसेच यापूर्वी सोनाली फोगाट यांचा पुतण्या मोहिंदर फोगाटने दावा केला होता की, मृत्यूनंतर सोनालीच्या चेहऱ्यावर सूज आली होती. आणि चेहऱ्याच्या एका बाजूला व्रणसुद्धा होते. हा घातपात असल्याचं त्याने म्हटलं होतं. आपण या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी केल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. इतकंच नव्हे तर काही दिवसांपूर्वी सोनालीने आपल्याविरुद्ध कुणीतरी कटकारस्थान रचत असल्याचा संशय कुटुंबाजवळ व्यक्त केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.