मुंबई, 17 मार्च: विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाल करत आहे. हा सिनेमा एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रेक्षक उचलून धरतील, अशी कल्पनाच कदाचित निर्मात्यांनी केली नसेल. दरम्यान या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात कमाईचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. प्रभासचा 'राधेश्याम' आणि आलिया भट्टचा 'गंगुबाई काठियावाडी' अद्यापही चित्रपटगृहांमध्ये असताना या सिनेमाने रेकॉर्ड ब्रेकिंग कामगिरी केली आहे. या सिनेमांवरही 'द कश्मीर फाइल्स' अनेक चित्रपटगृहांमध्ये भारी पडत आहे. या सिनेमाने सहाव्या दिवशी 19.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ज्यानंतर असा अंदाज वर्तवला जात आहे की हा सिनेमा लवकरच 100 कोटी क्लबमध्ये समाविष्ट होऊ शकेल.
‘द कश्मीर फाइल्स’हा सिनेमा 11 मार्च रोजी प्रदर्शित झाला असून 1990 साली काश्मीरमधून झालेल्या काश्मिरी पंडितांचा विस्थापनावर आधारित हा सिनेमा आहे. या सिनेमात अनुपम खेर (Anupam Kher), मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty), पल्लवी जोशी (Pallavi Joshi), दर्शन कुमार (Darshan Kumar), भाषा सुंबली (Bhasha Sumbli), चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar), पुनीत इस्सर (Puneet Issar), मृणाल कुलकर्णी (Mrinal Kulkarni), अतुल श्रीवास्तव (Atul Srivastav) आणि पृथ्वीराज सरनाईक (Prithviraj Sarnaik) अशी तगडी स्टार कास्ट आहे.
हे वाचा-द कश्मीर फाइल्स बघण्यासाठी कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवस सुट्टी, या राज्याचा निर्णय
'द कश्मीर फाइल्स' ने पाचव्या दिवशी वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिसवर 18 कोटी रुपये कमावले होते आणि सहाव्या दिवशी यामध्ये जबरदस्त वाढ झाल्याचं पाहायला मिळाली. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाने सहाव्या दिवशी 19.5 कोटी रुपयांची कमाई केली आणि जगभरातील या सिनेमाचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन सुमारे 79.25 कोटी रुपये झाले आहे. विवेक अग्निहोत्रींच्या या चित्रपटाच्या दुसऱ्या आठवड्यातील कलेक्शन पहिल्या आठवड्यातील चित्रपटाच्या कमाईपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. चित्रपटाचा वेग पाहता हा सिनेमा आजच 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करू शकतो.
View this post on Instagram
अक्षय कुमारचा 'बच्चन पांडे' होळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत असून त्याचा 'द कश्मीर फाइल्स'च्या कमाईवर काही परिणाम होतो का, हे पाहावे लागेल. दुसऱ्या आठवड्यातही चित्रपटाची कमाई याच वेगाने सुरू राहिली तर चित्रपट बॉक्स ऑफिसवर 1975 साली एकूण खर्चाच्या वीसपट कमाई करणारा ‘जय संतोषी माँ’चा विक्रमही मोडू शकतो.
View this post on Instagram
फिल्म बिझनेस अनालिस्ट तरन आदर्श यांनी इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टनुसार, पँडेमिकआधी 'तान्हाजी' आणि 'उरी' या सिनेमांचे बुधवारचे बॉक्स ऑफिस कलेक्शन सर्वाधिक होते, तेही अनुक्रमे 16.72 कोटी आणि 7.73 कोटी रुपये. तर पँडेमिकनंतर सुर्यवंशी, गंगुबाई काठियावाडी, 83 या सिनेमांचे बुधवारचे कलेक्शन अनुक्रमे 9.55 कोटी, 6.21 कोटी आणि 5.67 कोटी रुपये होते. तर द कश्मीर फाइल्सने सर्व रेकॉर्ड ब्रेक करत बुधवारी 19.05 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anupam kher, Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News, Jammu and kashmir, Jammu kashmir, Mithun chakraborty