मुंबई, 14 नोव्हेंबर :दाक्षिणात्य चित्रपट 'RRR' रिलीज होऊन आठ महिने उलटले तरीही प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची क्रेझ आजही कायम आहे. आज सुद्धा हा चित्रपट अनेक रेकॉर्ड बनवत आहे. एसएस राजामौली दिग्दर्शित या चित्रपटाची कथा आजही जगभरात आपला ठसा उमटवत आहे. दरम्यान, या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता राम चरण याने आरआरआरच्या सुरुवातीच्या दृश्यावर मोठा खुलासा केला आहे. एवढेच नाही तर या राम चरणने यावेळी बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमारचीही खिल्ली उडवली आहे. लीडरशिप समिट 2022 या कार्यक्रमामध्ये अक्षय कुमार आणि राम चरण सहभागी झाले होते. यावेळी बोलताना राम चरणने अक्षयला चांगलाच टोमणा मारला आहे.
बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता अक्षय कुमार पूर्वी एकापाठोपाठ एक सुपरहिट चित्रपटांसाठी ओळखला जायचा. पण सध्या त्याची एकामागोमाग एक फ्लॉप चित्रपटांची चर्चा आहे. अक्षयच्या चित्रपटाला प्रेक्षकांचा सध्या फारसा प्रतिसाद मिळत नाहीये. त्याचे एका वर्षात 4 ते 5 चित्रपट सहज प्रदर्शित होतात. 25-30 दिवसात शूटिंग करत अक्षय एक चित्रपट पूर्ण करतो. पण आता हेच त्याच्या चित्रपटाच्या अपयशाचं कारण मानलं जात आहे. आता याच मुद्द्यावरून राम चरणने अक्षयला टोमणा मारला आहे.
हेही वाचा - Akshay Kumar: '...त्याबद्दल मला माफ करा'; असं काय झालं की अक्षय कुमारने प्रेक्षकांची माफी मागितली
खरंतर, राम चरणला या कार्यक्रमादरम्यान त्याचा चित्रपट 'RRR' च्या शूटिंगबद्दल विचारण्यात आले. या प्रश्नाला उत्तर देताना राम चरण म्हणाला की, "आमच्यासोबत ''आरआरआर'च्या सेटवर सुमारे 3000 ते 4000 लोक उपस्थित होते. चित्रपटाच्या सुरुवातीच्या एका सीनच्या शूटिंगसाठी सुमारे 35 दिवस लागले. एवढ्या दिवसात तर अक्षय कुमार एका अक्ख्या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण करतात.''
अक्षयच्या 'सम्राट पृथ्वीराज' चित्रपटाचे शूटिंग 42 दिवसांत पूर्ण झाले आहे. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी अक्षय कुमारच्या 40 दिवसांत चित्रपट संपवण्याच्या सवयीची खिल्ली उडवली. इतकंच नाही तर त्याला सोशल मीडियावर ट्रोलही करण्यात आलं. यानंतर अक्षय कुमारला मीडियासमोर येऊन स्पष्टीकरण द्यावे लागले.
अक्षय कुमार म्हणाला, “आम्ही हा चित्रपट 42 दिवसांत पूर्ण केला. वेळेवर आलात आणि वेळेवर निघून गेलात तर चित्रपट वेळेवर पूर्ण होईल. पण, महामारीमुळे चित्रपटाला उशीर झाला, अन्यथा चित्रपट खूप आधी प्रदर्शित झाला असता." मात्र, शूटिंगचे शेड्यूल समोर आल्यानंतर अक्षयला चांगलाच ट्रोल झाला. आता सतत अपयशी होणाऱ्या चित्रपटांमागील कारण अक्षय सध्या शोधत आहे. त्याचमुळे त्याने 'हेरा फेरी 3' करण्यास नकार दिला आहे.'हेरा फेरी 3' चित्रपटाचं स्क्रिप्ट पटलं नसल्याने आपण त्याला नकार दिला' असं अक्षय म्हणाला होता. आता या चित्रपटात अक्षयच्या जागी कार्तिक आर्यनला रिप्लेस करण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Akshay Kumar, Bollywood actor, Bollywood News, Entertainment