मुंबई, 02 जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी (Actor Sushant Singh Rajput Suicide) आतापर्यंत एकूण 30 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहे. आता यामध्ये बॉलिवूडमधील एक बडे नाव देखील जोडले जाणार आहे. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी आता दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची चौकशी केली जाणार आहे. येत्या काही दिवसांत भन्साळी यांची चौकशी केली जाईल, यासाठी त्यांना समन्सही बजावण्यात आला आहे. त्याचबरोबर यशराजच्या कास्टिंग डिरेक्टर शानु शर्मा यांचीही दुसऱ्यांदा चौकशी केली जाणार आहे. शानु शर्मा गेली अनेक वर्ष यश राजमध्ये कास्टिंग डिरेक्टर म्हणून काम करतात. बॉलिवूडमध्ये त्यांचा दबदबा देखील आहे.
दरम्यान काही मीडिया अहवालानुसार 'रामलीला' आणि 'बाजीराव मस्तानी'साठी संजय लीला भन्साळी यांची पहिली पसंत सुशांत होता. पण एका प्रोडक्शन हाऊसबरोबर असणाऱ्या कॉन्ट्रॅक्टमुळे सुशांतला हे सिनेमा करता आहे नाहीत. काही दिवसांपूर्वी नवभारत टाइम्सने यासंदर्भात वृत्त दिले होते. या कारणामुळे संजय लीला भन्साळी यांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
(हे वाचा-सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाला नवं वळण, मोठ्या दिग्दर्शकाची होणार चौकशी)
काय पो चे' या सिनेमातून बॉलिवूडमधून पदार्पण केल्यानंतर सुशांतने एका प्रोडक्शन हाऊसबरोबर तीन चित्रपटांचा कॉन्ट्रॅक्ट केले होते. त्याच्या अंतर्गत सुशांतचा 'शुद्ध देसी रोमान्स' या सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्यानंतर या कॉन्ट्रॅक्टमुळे त्याला ऑफर झालेले अनेक चित्रपट करता आले नाहीत.
(हे वाचा-मोठ्या पडद्यावरील सुशांतच्या आठवणीत नेणारा VIDEO!नेहा कक्करचे म्यूझिकल ट्रिब्यूट)
बुधवारी सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिथानी याची देखील चौकशी करण्यात आली. सिद्धार्थ पिथानी सुशांतचा मित्र तर होताच पण त्याचबरोबर तो त्याचा क्रिएटिव्ह कंटेंट मॅनेजर म्हणून देखील काम पाहायचा. सिद्धार्थ सुशांतच्या आत्महत्येवेळी त्याच्या घरातच उपस्थित असल्याने बुधवारी त्याची पुन्हा एकदा चौकशी करण्यात आली. तर त्याआधी मंगळवारी सुशांत बरोबर शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा'मध्ये ज्या अभिनेत्रीने काम केले आहे, त्या संजना सांघीची चौकशी करण्यात आली. संजनाची जवळपास 9 तास चौकशी करण्यात आली होती.
आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार सुशांतने गळफास घेतल्यामुळे श्वास कोंडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समजते आहे. मात्र तो या निर्णयापर्यंत का पोहोचला आणि त्याने टोकाचे पाऊल का उचलले याचा तपास वांद्रे पोलिसांकडून केला जात आहे.
संपादन - जान्हवी भाटकर