मुंबई, 02 जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूतला (Sushant Singh Rajput) आज 17 दिवस पूर्ण होत आहेत. आज देखील त्याच्या आठवणीमध्ये त्याचे चाहते, सहकलाकार, मित्रपरिवार आणि कुटुंबीय हळहळत आहे. त्याच्या आठवणी सर्वांबरोबर आहेत, मात्र सुशांत सर्वांच्या लक्षात राहील तो त्याच्या सहज अभिनयामुळे, त्याच्या डान्समुळे आणि त्याच्या बोलक्या डोळ्यांमुळे. दरम्यान एखाद्या रोमँटिंक गाण्यामध्येही त्याचा अंदाज वेगळा होता. 'जान निसार' आणि 'खैरियत पुछो..' या दोन्ही गाण्यांची प्रेक्षकांनी नेहमी प्रशंसा केली आहे. याच गाण्यांच्या माध्यमातू प्रसिद्ध गायिका नेहा कक्करने (Neha Kakkar) सुशांतला श्रद्धांजली वाहिली आहे. तिने तिच्या यूट्यूब पेजवर स्वत:च्या आवाजातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने 'केदारनाथ' (Kedarnath) मधील 'जान निसार' तर 'छिछोरे'मधील (Chhichhore) 'खैरियत पुछो..' ही दोन्ही गाणी गायली आहेत.
नेहाने शेअर केलेला हा व्हिडीओ पाहिल्यांनंतर अनेकांनी मोठ्या पडद्यावरील सुशांतच्या आठवणीत गेल्याची प्रतिक्रिया दिली आहे. हा व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. आता पर्यंत हा व्हिडीओ 61 लाखांहून अधिक युजर्सनी पाहिला आहे. याआधी देखील नेहा कक्करने सोशल मीडियावर सुशांत सिंह राजपूतसाठी भावुक पोस्ट लिहून तिच्या भावना व्यक्त केल्या होत्या.
नेहाने तिच्या पोस्टमध्ये असे लिहिले होते की, 'तू पुन्हा जन्म घेशील आणि त्यावेळी तू केवळ लढणार नाहीस तर जिंकशील सुद्धा. सुशांत आमचे तुझ्यावर खूप प्रेम आहे. आम्ही तुला कधी विसरणार नाही.'
अभिनेता सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. या प्रकरणी आतापर्यंत 30 जणांचा जबाब नोंदवण्यात आला आहे.
संपादन - जान्हवी भाटकर