मुंबई, 18 मार्च: ‘बिग बॉस 16’ चा विजेता एमसी स्टॅन सध्या खूपच चर्चेत आहे. बिग बॉसचं विजेतेपद जिंकल्यानंतर तो खूपच लोकप्रिय झाला. त्याच्या चाहत्यावर्गातही तुफान वाढ झाली. सध्या एमसी स्टॅन आपल्या शोसाठी देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करत आहे. मात्र त्याच्यासमोर नवनवीन अडचणी उभ्या राहत आहेत. नुकतंच त्याला नागपुरात शो करु देणार नाही असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला होता. त्यानंर्र आता इंदूरमध्ये एमसी स्टॅन च्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये गोंधळ आणि राडा झाल्याची बातमी समोर येत आहे. इंदूरमध्ये प्रसिद्ध रॅपर आणि बिग बॉस 16 चे विजेते एमसी स्टॅनच्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये खूप गोंधळ झाला. गोंधळामुळे स्टॅन स्टेजवरून खाली आला आणि त्याचा शो रद्द करावा लागला. लोकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. स्टॅन च्या चाहत्यांनी त्याचा शो रद्द केल्याने नाराजी व्यक्त केली आहे. याविरोधात त्यांनी सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. याप्रकरणी सध्या कोणीही एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला नाही. Akshay Kumar: हेरा फेरी 3 वर प्रेक्षक नाराज; ‘या’ कारणामुळे अक्षय कुमारला पत्र लिहून व्यक्त केला संताप मिळालेल्या माहितीनुसार, 17 मार्चच्या रात्री इंदूरच्या लासुदिया पोलीस स्टेशन परिसरातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये एमसी स्टॅनचा लाइव्ह कॉन्सर्ट सुरू होता. दरम्यान, करणी सेनेनेने अचानक कॉन्सर्टमध्ये एंट्री घेतली आणि त्यांनी तिथे गोंधळ सुरू केला. स्टॅनने शोदरम्यान आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप करणी सेनेने केला आहे. शोमध्ये आक्षेपार्ह, असभ्य शब्द वापरल्यास निषेध करण्यात येईल, असा इशाराही करणी सेनेने यापूर्वी दिला होता, असे सांगण्यात येते. दुसरीकडे लोकांचा एवढा विरोध पाहून स्टॅनने स्टेज सोडलं आणि तो खाली आला. त्यानंतरही करणी सेनेच्या सदस्यांनी बराच वेळ गोंधळ घातला. या गदारोळात, करणी सेनेचे दिग्वजय सिंह यांनी एमसी स्टॅन यांना मंचावर येऊन परिणाम पाहण्याचे खुले आव्हान दिले. या गोंधळाची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिस अधिकाऱ्यांनी करणी सेनेच्या सदस्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र ते मान्य झाले नाहीत. नंतर पोलिसांनी कडक कारवाई करत प्रकरण कसेतरी शांत केले.
हा सगळा गोंधळ पाहून हॉटेल व्यवस्थापनाने कार्यक्रम थांबवला. त्यांनी कार्यक्रम रद्द केल्याची औपचारिक घोषणा केली. तरीही, तिकीट खरेदी करून कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना कदाचित पुन्हा कार्यक्रम सुरू होईल, आणि त्यांना पुन्हा प्रवेश दिला जाईल, अशी आशा होती. त्यामुळे तिथे बराच वेळ गर्दी होती. त्यांच्यासह करणी सेनेनेही रस्त्यावर उतरून आंदोलन केले. बराच वेळ होऊनही प्रेक्षक रस्त्यावरून न गेल्याने पोलिसांनी लाठीमार करून त्यांचा पाठलाग सुरू केला. आता या गोंधळामुळे एमसी स्टॅनच्या अडचणीत वाढ झाली आहे.