मुंबई, 20 जानेवारी: झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. मालिकेतील यश आणि नेहाची केमिस्ट्री सगळ्यांनाच आवडली. पण छोट्याशा परीला मात्र प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. या मालिकेतून श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहेरे सोबतच मायरा वैकुळ देखील घराघरात पोहचली. मालिका सतत टीआरपीच्या शर्यतीत टॉप 10 मध्ये दिसून यायची. मात्र आता मालिका आपल्या शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. लवकरच ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. आता यश आणि नेहाला निरोप देताना प्रेक्षक तर भावुक झालेतच पण श्रेयस देखील भावुक झालेला पाहायला मिळाला. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेचा शेवटचा एपिसोड येत्या रविवारी म्हणजेच २२ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. तर मालिकेचं शूट देखील नुकतंच संपलं आहे. मालिकेत यशवर्धन चौधरी ही भूमिका अभिनेता श्रेयस तळपदेने साकारली होती. मालिकेच्या शेवटच्या भागानिमित्त श्रेयसचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये त्याने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. हेही वाचा - Myra Vaikul: सेटवर येताच चिमुकली मायरा सर्वातआधी करते ‘हे’ काम; वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य झी मराठीने पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये श्रेयस तळपदे म्हणतोय कि, ‘आजवर यश आणि नेहाला तुम्ही खूप प्रेम दिलंत. आपल्यामध्ये एक नातं तयार झालं होतं. आम्हालाही यश आणि नेहा म्हणून तुम्हाला भेटण्याची सवय झाली होती. पण आता वेळ आलीये निरोप घेण्याची. आता मालिकेचा शेवटचा एपिसोड प्रदर्शित होणार आहे. हा एपिसोड तुम्ही नक्की पाहाल अशी आशा आहे. आजवर तुम्ही खूप प्रेम दिलंत त्याबद्दल तुमचे आभार.’ अशा शब्दात श्रेयसने भावना व्यक्त केल्या आहेत. हे बोलताना तो चांगलाच भावुक झालेला पाहायला मिळाला.
या पोस्टखाली चाहत्यांनी देखील भावुक कमेंट्स केल्या आहेत. ‘पण तुमची मालिका संपायला नको होती’, ‘खूप खूप मिस करू तुम्हाला’, ‘कायम लक्षात राहिल अशी मालीका नक्कीच बघणार’ अशा इमोशनल कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. मालिका बंद होत असल्याने या मालिकेचे प्रेक्षक आणि कलाकारांचे चाहते नाराज आहेत. हे यावरून दिसतं. मालिका बंद केली जाऊ नये यासाठी अनेकजण कमेंट्स करत मालिका सुरु ठेवण्याचे आवाहन करत आहेत.
दरम्यान ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून श्रेयस आणि प्रार्थना बेहेरेने अनेक वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं होतं. यश आणि नेहाची फ्रेश जोडी प्रेक्षकांना फारच आवडली होती. तर आपल्या गोड अभिनयाने आणि बोलक्या स्वभावाने परीने सर्वांचं मन जिंकलं होतं. या तिघांना प्रेक्षक भरभरुन प्रेम देत होते. मात्र आता मालिका निरोप घेत आहे.