मुंबई, 26 नोव्हेंबर : विक्रम गोखले यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीत कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. विक्रम गोखलेंच्या निधनानंतर मराठी पासून बॉलीवुड्पर्यंत चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी त्यांना भावुक होत श्रद्धांजली वाहिली आहे. मराठमोळा अभिनेता सुबोध भावे याला विक्रम गोखलेंच्या निधनाने धक्का बसला आहे. त्याने काही दिवसांपूर्वीच पोस्ट शेअर करत त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली होती. पण आता विक्रम गोखलेंच्या निधनानंतर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.
विक्रम गोखले सोबतचे चित्रपटातील काही प्रसंगातील फोटो शेअर करत सुबोध भावेने लिहिलंय कि, ''विक्रम गोखले सर...ज्यांनी ज्यांनी मराठी कलाकृती श्रीमंत केली त्यातले तुम्ही एक महत्त्वाचे शिलेदार होतात. आयुष्यात पहिलं व्यावसायिक नाटक पाहिलं "संकेत मिलनाचा" ते तुमचं होतं.शाळेत असताना पाहिलं होत हे नाटक पण अजूनही तुमचं काम लख्ख आठवतंय. त्यानंतर तुमच्या पाहिलेल्या आणि तुमच्या अभिनयाची जादू अनुभवलेल्या कितीतरी व्यक्तिरेखा. तुमच्या बरोबर अनेक कलाकृतींमध्ये काम करण्याची संधी मिळाली.''
हेही वाचा - Vikram Gokhale Passes Away: असा नट पुन्हा होणे नाही! विक्रम गोखलेंच्या आठवणीत कलाकार भावुक
पुढे त्याने लिहिलंय कि, "अनुमती" या चित्रपटासाठी तुम्हाला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्कार होता. त्यात आपला एक मोठा प्रसंग होता. खरतर तुम्ही त्या चित्रपटात आणि अभिनयात ही माझे बाप. पण त्या एका प्रसंगाची तुम्ही साधारण २० ते ३० वेळा तालीम केलीत. तुम्ही आम्हा प्रेक्षकांना बांधून टाकायचा.न बोललेल्या तुमच्या विरामांमध्येही केवढी अर्थता होती. शेवटपर्यंत काम करत राहिलात.शेवटच्या क्षणी सुध्दा तुम्ही नक्की नवीन भूमिकेचा विचार करत असाल याची खात्री आहे. ही भूमिका कदाचित आम्हाला सोडून जायची असेल....पण आम्ही याला तुमचा तुमच्या पद्धतीने घेतलेला "विराम" समजू. तुम्हाला श्रध्दांजली नाही देऊ शकत. हो पण तुमच्या विरामानंतर येणाऱ्या पुढच्या शब्दाची आणि अर्थात तुमच्या "एन्ट्री" ची नक्की वाट पाहत राहू. तोपर्यंत जिथे असाल तिथे आनंदी रहा,शांत रहा. तुमच्यावर आणि तुमच्यातील कलेवर नितांत प्रेम करणारा तुमचा चाहता.'' अशा शब्दात सुबोध भावेने विक्रम गोखलेंबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत.
View this post on Instagram
मराठी चित्रपटसृष्टीत 'गोदावरी' हा चित्रपट तर 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेतील गुरुंजींची भूमिका अखेरची ठरली आहे. विक्रम गोखले अभिनयाबरोबरच अनेक राजकीय आणि सामाजिक विषयावर सातत्यानं भाष्य करत असतात. विक्रम गोखले यांनी आजवर अनेक मालिका, नाटक अनेक हिंदी मराठी सिनेमात महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीत कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.