मुंबई, 07 जुलै- हरहुन्नरी अभिनेत्रींमध्ये मराठमोळ्या माधुरी दीक्षितचं नाव आवर्जुन घेतलं जातं. अभिनय असो किंवा डान्स कोणत्याच पातळीवर माधुरी कमी नाही. आजही होतकरू अभिनेत्री तिच्यासमोर ‘पानी कम चाय’ वाटतील अशा पद्धतीने माधुरी ऑन स्क्रिन आणि ऑफ स्क्रिन वावरत असते. तिला नाचताना पाहताना माधुरीने वयाची पन्नाशी गाठली असं कोणीही म्हणू शकत नाही. ती किती सुंदर नाचते याचा अनुभव डान्स दिवाने २ या रिअलिटी शोच्या सेटवर आला. डान्स दिवाने २ या शोचा नुकताच एक प्रोमो प्रदर्शित करण्यात आला.
या प्रोमोमध्ये माधुरी चक्क बेली डान्स करताना दिसत आहे. माधुरीने स्पर्धक शायनासोबत अप्रतिम बेली डान्स केला. बाहुबली २ सिनेमातील वीरों के वीर या गाण्यावर दोघींनी बेली डान्स केला. व्हिडिओमध्ये सुरुवातीला शायना नाचते आणि तिचे पाहून माधुरी तिच्यासोबत बेली डान्स करते. ज्या क्षणाला माधुरी पहिला ठेका धरते तेव्हा जज खुर्चीवरून उठतात आणि तिच्यासाठी टाळ्या वाजवू लागतात. यात सुपर ३० स्टार हृतिक रोशनही स्वतःला खुर्चीवरून उठण्यावाचून रोखू शकला नाही. सोशल मीडियावरही माधुरीच्या चाहत्यांनी हा व्हिडिओ तुफान व्हायरल केला. या व्हिडिओवर त्यांनी माधुरीच्या डान्सचं भरभरून कौतुक केलं आहे.
दरम्यान, हृतिक रोशनच्या सुपर ३० सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. सुमारे वर्षभरानंतर हृतिकचा सिनेमा येत असल्यामुळे त्याचे चाहते फार उत्सुक आहेत. या सिनेमात हृतिकचा एक वेगळा अंदाज लोकांना पाहायला मिळणार आहे. हृतिक या सिनेमात बिहारमधील प्रसिद्ध शिक्षक आनंद कुमार यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. हृतिकनेही या सिनेमासाठी कसून मेहनत घेतल्याचं या सिनेमात दिसतं. ट्रेलरची लक्षवेधी गोष्ट म्हणजे हृतिक बोलत असलेली भाषा. हृतिकने बिहारी भाषेचा लहेजा खूप चांगल्याप्रकारे आत्मसात केला आहे.