मुंबई, 11 फेब्रुवारी : दिल्ली निवडणुकांमध्ये आम आदमी पक्ष बहुमताने विजयी होण्याची शक्यता आहे. त्यातच आता कतरिनाचा झाडू मारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय आणि याचा संबंध दिल्ली निवडणूकांच्या निकालाशी जोडला जात आहे.
दिल्ली निवडणुकींच्या धामधुमीत सोशल मीडियावर सध्या अभिनेत्री कतरिना कैफचा झाडू मारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर गाजतोय. आम आदमी पक्षाचे समर्थक हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. त्यांचा असा दावा आहे की, दिल्लीत आपचचं सरकार येणार असल्याची चिन्ह असल्याने कतरिनाही आपचं समर्थन करण्यासाठी झाडू मारतेय. या व्हिडिओमध्ये कतरिना कैफ पांढऱ्या रंगाचा ड्रेस घालून झाडू मारतेय. त्यातच झाडू ही ‘आप’ची निशाणी असल्याने हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय.
खरं तर कतरिना आणि आपबद्दल होणाऱ्या या चर्चांमध्ये तितकसं तथ्य नाही आहे. कतरिनाचा व्हायरल होणारा हा व्हिडिओ जुना आहे. अभिनेता अक्षय कुमार याने हा व्हिडिओ सर्वप्रथम शेअर केला होता. या व्हिडिओत अक्षय कतरिनाला ‘काय करत आहेस?’ असा प्रश्न विचारतो. त्यावर कतरिना ‘साफ-सफाई’ करत असल्याचं उत्तर देते. आणि व्हिडिओच्या शेवटी कतरिना अक्षयला झाडूने मारते.
मात्र आता आम आदमी पार्टीचे समर्थक या व्हिडिओचा वापर अशा प्रकारे करत आहेत. आम आदमी पार्टीला विजयासाठी शुभेच्छा देत कतरिनाने झाडू मारत आनंद व्यक्त केल्याचं सांगण्यात येतयं.तर तिकडे टिक-टॉकवर तर कतरिनाच्या या व्हिडिओमागे केजरीवल झिंदाबादच्या घोषणांचा आवाज देण्यात आलाय. या घोषणा ऐकू आल्यानंतर कतरिना हसते असंही या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलयं.
खरं तर अभिनेता अक्षय कुमारने जेव्हा हा व्हिडिओ शेअर केला होता त्यावेळेस असं लिहिलं होतं की, “सुर्यवंशी चित्रपटाच्या सेटवर आम्हाला स्वच्छ भारत अभियानाचा नवा ब्रँड अम्बेसिडर मिळालाय”. कतरिनाचा हा व्हिडिओ सुर्यवंशी चित्रपटाच्या सेटवर काढण्यात आलाय. शूटिंगदरम्यान कतरिनाने सेटवर झाडू मारली होती. चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीचा आगामी सिनेमा सुर्यवंशीच्या बॅक सेटवर हा व्हिडिओ शूट करण्यात आला होता.