मुंबई, 14 सप्टेंबर : उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानंतर प्रसिद्ध शिर्डीच्या साई बाबा मंदिराचं विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आलं. या घडामोडीनंतर मोठी खळबळ उडाली आहे. शिर्डी मंदिरानंतर आता मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराचं विश्वस्त मंडळ निशाण्यावर असल्याचं ABPमाझानं याबाबत वृत्त दिलं आहे. या दोन्ही विश्वस्त मंडळावर महाविकास आघाडीचं वर्चस्व होतं. आघाडी सत्तेत असताना शिवसेनेशी निगडीत माणसांची या मंडळाच्या अध्यक्ष स्थानी निवड करण्यात आली होती. सिद्धिविनायक मंदिराच्या विश्वस्त मंडळाच्या कायदेशीर बाबी तपासल्या जात असल्याचं म्हटलं जात आहे. सध्या सिद्धिविनायकाच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्ष पदी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि प्रसिद्ध अभिनेता सुत्रसंचालक आदेश बांदेकर आहेत. मंडळ बरखास्त केल्यास आदेश बांदेकर यांचं अध्यक्षपद जाण्याची शक्यता आहे. राज्यातील महामंडळांमध्ये शिर्डीच्या साईबाबांचं विश्वस्त मंडळ सर्वात मोठ आणि प्रसिद्ध मंडळ होतं. पण औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानंतर हे मंडळ बरखास्त करण्यात आलं. मंडळाच्या अध्यक्षपदाची निवड नियम डावलून केल्याचा आरोप करण्यात आल्यानं शिर्डीचं विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आलं. या बरखास्तीनंतर आता सिद्धिविनायक मंदिरावरही अशी कारवाई होऊ शकते याचा विचार केला जात आहे. हेही वाचा - Aadesh Bandekar : आदेश बांदेकरांनी केलं बाप्पाचं आगळंवेगळं विसर्जन; व्हिडीओ पाहून सर्वच थक्क दैनिक जागरणने दिलेल्या वृत्तानुसार, आदेश बांदेकर 24 जुलै 2020मध्ये तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी नियुक्त झाले. त्यांना मिळालेलं हे पद महाराष्ट्र सरकारच्या राज्य मंत्री पदाच्या बरोबर आहे. शानसाकडून आदेश बांदेकर यांना दरमहिना 7,500 रुपये मानधन दिलं जात आहे. त्याचप्रमाणे मंदिर ट्रस्टच्या प्रत्येक बैठकीत उपस्थित राहिल्यास 500 रुपये भत्ता त्याचप्रमाणे 3000 रुपये मोबाईल फोन खर्चही दिला जातो.
दूरदर्शनच्या ‘ताक धिना धिन’ या कार्यक्रमातून आपल्या करिअरला सुरूवात करणारे आदेश बांदेकर होम मिनिस्टर या कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले. 2009मध्ये आदेश बांदेकरांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेने बांदेकरांना दादरमध्ये मनसेच्या नितिन सरदेसाई यांच्या विरोधात मैदानात उतरवलं होतं. पण बांदेकर ती निवडणूक बरले. त्यानंतर त्यांना शिवसेनेने पक्षात सचिव पद दिले. त्यानंचक 2017मध्ये त्याच्याकडे सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली.