मुंबई, 21 जानेवारी: ‘ आई कुठे काय करते ’ या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे. मालिकेतील सर्व कलाकारही घराघरांत पोहचले असून सतत चर्चेत असतात. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील मुख्य चेहरा म्हणजे अरुंधती. मालिकेतील अरुंधती म्हणजेच अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर तिच्या अभिनयामुळे तर चर्चेत असतेच मात्र ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही प्रकाश झोतात असते. अरुंधती म्हणजेच मधुराणी प्रभुलकर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती सोशल मीडियाद्वारे अनेक फोटो व्हिडीओ शेअर करत असते. नुकतंच मधुराणीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याची चांगलीच चर्चा होत आहे. मालिकेत आता अरुंधती आणि अनुष्का यांचं नातं कसं आहे याची सगळ्यांनाच जाणीव आहे. या दोघींचंही एकाच मुलावर म्हणजे आशुतोषवर प्रेम आहे. अनुष्काला आता अरुंधती आणि आशुतोषविषयी सगळं सत्य समजलं आहे. त्यामुळे मालिकेत नवा ट्विस्ट आला होता. पण आता अनुष्काने मालिकेतून एक्झिट घेतली आहे. मालिकेत अनुष्काची भूमिका अभिनेत्री आणि गायिका स्वरांगी मराठे हिने साकारली आहे. आता अरुंधतीने तिच्यासोबत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हेही वाचा - Aai Kuthe Kay Karte: अखेर अनिरुद्धला ज्याची भीती तेच घडणार; मालिकेत नवा ट्विस्ट मधुराणीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मधुराणी आणि स्वरांगी ‘का रे दुरावा’ हे गाणं गाताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना मधुराणी यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘‘का रे दुरावा….का रे अबोला. ह्या कसलेल्या गुणी गायिकेबरोबर गायला धाडस लागतं. ते केलंय मी..!’’ या व्हिडीओमध्ये मधुराणी सुमधुर आवाजात हे गाणं गात असल्याचं दिसत आहे. त्यांच्या या व्हिडीओचं खूप कौतुक होताना दिसत आहे.
नुकताच ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत स्वरांगी आणि मधुराणी प्रभुलकर म्हणजेच अरुंधती आणि अनुष्काची सुरेल जुगलबंदी दाखवण्यात आली होती. मधुराणी प्रभुलकर एक उत्तम अभिनेत्री असण्याबरोबरच सुरेल गायिकाही आहे हे तिने नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओवरून स्पष्ट होतं. या व्हिडीओवर स्वरांगीनेही कमेंट करत मधुराणीचं कौतुक केलं आहे. तसेच चाहतेही मधुराणीच्या सुरेल अंदाजाचं कौतुक करत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
अनुष्का या व्यक्तिरेखेबद्दल सांगताना स्वरांगी म्हणाली होती कि, ‘‘मी आई कुठे काय करते या मालिकेची खूप मोठी चाहती आहे. खऱ्या आयुष्यात मी दोन मुलांची आई असल्यामुळे आई काय काय करु शकते याचा अनुभव घेतच आहे. अश्यातच या भूमिकेसाठी विचारणा झाल्यावर क्षणाचाही विलंब न लावता मी होकार दिला. गेले कित्येक दिवस स्वरांगी तू सध्या काय करतेस हा प्रश्न मला नेहमी विचारला जायचा. आता मी अभिमानाने सांगू इच्छिते की स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते मध्ये मी अनुष्का ही व्यक्तिरेखा साकारतेय.’’ ती या मालिकेत अल्पावधीसाठीच असली तरी तिने काही काळातच प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.