मुंबई, 03 फेब्रुवारी : आई कुठे काय करते मालिकेतून सध्या महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले अभिनेते मिलिंद गवळी एव्हरग्रीन अभिनेते म्हणून ओळखले जात आहे. मालिकेत त्यांनी साकारलेल्या अनिरुद्धला तोड नाही. प्रेक्षकांनी अनिरुद्धला भरभरुन प्रेम दिलं आहे. मिलिंद गवळी सोशल मीडियावरही फार सक्रीय असतात. अनेक फोटो व्हिडीओ तसंच त्यांच्या भावना ते पोस्टमधून लिहित असतात. ते मालिकेतील सहकलाकारांबद्दल तसेच विविध किस्से, अनुभव नेहमीच शेअर करत असतात. आता मिलिंद गवळींनी त्यांच्याच व्यक्तीरेखेविषयी म्हणजे अनिरुद्ध विषयी मोठं भाष्य केलं आहे. त्यांची ही पोस्ट चर्चेत आली आहे. मिलिंद गवळींनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ आई कुठे काय करते मालिकेतील एका सीनचा आहे. हा सीन तेव्हाच आहे जेव्हा अनिरुद्ध आशुतोष आणि अरुंधतीवर गंभीर आरोप करतो. सध्या मालिकेत अरुंधती दुसरा संसार थाटणार आहे पण त्यामुळे अनिरुद्ध चांगलाच बावचळला आहे. त्याला अरुंधती दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न करतेय ही गोष्ट सहन होत नाहीये. त्यामुळे तो खूपच विचित्र वागतोय. त्याच्या या वागण्याला मालिकेतील सगळे तर कंटाळले आहेतच पण स्वतः मिलिंद गवळी देखील नाराज झाले आहेत. हेही वाचा - Aai Kuthe Kay Karte: अरुंधतीनं लग्नाचा निर्णय सांगताच बावचळला अनिरुद्ध; खेळणार ‘हा’ नवा डाव मिलिंद गवळींनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे कि, ‘अनिरुद्ध अरे थांब जरा थांब , किती बोलतोयस” खरंच अनिरुद्ध सारखी माणसं किती बोलतात आणि काय काय बोलतात ,किती मनाला लागेल असं बोलतात ,कशाचाच भान ठेवत नाही ,समोरच्याला काय वाटेल? त्याला किती त्रास होईल ? त्याचं मन किती आपण दुखवतो आहोत , याचं कसलंच भान नाही या माणसाला, मग अशा माणसाची चीड नाही येणार का.? बर्याच वेळेला तर मला सुद्धा त्याची चीड येते.’
त्यांनी पुढे अनिरुद्धविषयी म्हटलं आहे कि, ‘अनिरुद्ध बोलायला लागला की माझं सुद्धा डोकं भंणभंण करायला लागतात, कधी तर तो इतकं विचित्र बोलतो की मला असं वाटतं की माझं डोकं फुटेल कि काय. पण त्याला बोलावंच लागतं ,तो बोलला नाही तर, कसं व्हायचं? काळ्या रंगाचा ब्लॅकबोर्ड असला तरच तर त्यावर पांढरी अक्षर उमटून दिसतील ना. हा अनिरुद्ध तो ब्लॅकबोर्ड आहे. बरं नमिता आणि मुग्धाने लिहिलेलं आम्हा सगळ्यांना बोलावच लागतं , न बोलून सांगतात कोणाला! बरं हा अनिरुद्ध पहिल्या एपिसोड पासूनच असाच आहे, पहिल्या एपिसोड मध्ये अरुंधतीला घराच्या बाहेर काढलं होतं त्याने आणि आता सुद्धा तेच करतोय. हल्ली अनिरुद्ध खूपच डोक्यात जातो आणि बाहेर यायचं नावच घेत नाही.’ अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
मिलिंद गवळींच्या या पोस्टखाली चाहते विविध प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. ‘सर तुम्ही किती डोक्यात गेलात तरी आम्हाला खूप आवडतात’, ‘तुम्ही छान भूमिका निभावता’ असं म्हणत चाहते मिलिंद गवळींच कौतुक करत आहेत.

)







