मुंबई, 27 जून: सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या शिवसेना ( Shiv Sena) आणि बंडखोर नेत्यांमुळे महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदेंच्या ( Eknath Shinde) बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारण नवं वळणं मिळालं आहे. एकीकडे महाराष्ट्रातील घडामोडींना वेग आलाय तर दुसरीकडे दोन अभिनेत्यांमध्ये वातावरण चांगलंच तापलं आहे. अभिनेते शरद पोक्षे ( sharad ponkshe) यांचा जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. शिवसेना नेते आणि अभिनेते आदेश बांदेकर ( aadesh bandekar) यांनी शरद पोक्षेंचा जुना व्हिडीओ शेअर करत ‘हा शरद पोंक्षे तुच ना?’, असा सवाल केला आहे. लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून चर्चांना उधाण आलं आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घ्या. अभिनेते शरद पोक्षे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. नुकतचं त्यांचं ‘दुसरं वादळ’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं. यावेळी शरद पोंक्षे यांनी नेते एकनाथ शिंदे यांच्यासह फोटो शेअर केला. शरद पोंक्षे यांनी काही वर्षांपूर्वीच कॅन्सरवर मात केली. त्यावेळी ‘हॉस्पिटलमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा फोन आला. म्हणाले तुम्ही बिल भरायचे नाही. फक्त स्वत:ची काळजी घ्यायची आणि बरं व्हायचं. सख्ख्या भावासारखे ते माझ्या मागे उभे राहिले’, असं म्हणत त्यांनी पोस्ट शेअर केलीय. शरद पोंक्षे यांनी एकनाथ शिंदे यांच्याबरोबरचा एक फोटोही त्यांच्या पुस्तकात छापला आहे.
हेही वाचा - महामिनिस्टरच्या निमित्तानं अभिनेत्री 15 वर्षांनी भेटली आदेश भावोजींना; ‘देवमाणूस 2’मध्ये साकारतेय खास भूमिका शरद पोंक्षे यांच्या या पोस्टवर प्रश्न विचारत आदेश बांदेकर यांनी शरद पोंक्षे यांनी 2019मध्ये लोकसत्ता दिलेल्या एका मुलाखतीचा व्हिडिओ शेअर केला. त्यावेळी पोंक्षे नुकतेच कॅन्सरवर मात करुन पुन्हा एकदा कामाला लागले होते. त्यांनी व्हिडीओमध्ये त्याच्या कॅन्सर लढ्याविषयी सांगितलं होतं. तेव्हा त्यांनी आदेश बांदेकर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांना मदत केल्याचं सांगितलं होतं. ते म्हणाले होते, ‘मला कॅन्सर झाल्याचं कळताच मी आदेशला हे सांगितलं आणि तोच पहिल्यांदा माझ्या मदतीसाठी धावून आला. काळजी करू नकोस, मी उद्याच्या उद्या तुला नांदेकडे पाठवतो. नांदे हे हिंदूकॉलनीत प्रसिद्ध डॉक्टर आहेत. मग त्यांच्याकडे माझी ट्रिटमेंट सुरू झाली. आदेश माझ्या मदतीला धावून आला. आदेशमुळे माझ्या आजाराची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कळली. त्यांनीही मला फोन करुन शरद काळजी करु शिवसेना आणि मी तुझ्या पाठिशी उभे आहोत असं सांगितलं. पैशांची कोणतीही काळजी करू नकोस’. शरद पोंक्षेंचे हे शब्द त्यांना पुन्हा आठवून देण्यासाठी आदेश बांदेकरांनी हा जुना व्हिडीओ शेअर केल्याचं दिसून येत आहे. यावर अद्याप शरद पोंक्षे यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

)







