पुणे, 23 मे: पुण्यातील धनकवडी (Dhankawadi) परिसरातील एका इमारतीत 32 वर्षीय महिलेची निर्घृण हत्या (Brutal Murder in Pune) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इमारतीत शेजारी राहणारी महिला मृत महिलेच्या घरी मोबाइल चार्जर परत घेण्यासाठी गेली असता, दार उघडं असल्याचं तिच्या निदर्शनास आलं. यावेळी तिनं घरात डोकावलं असता संबंधित महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं तिला दिसलं. यानंतर तिनं या घटनेची माहिती पोलिसांना दिली. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केली असून हत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही.
संबंधित 32 वर्षीय मृत महिलेचं नाव कल्पना घोष असून त्या मागील काही महिन्यांपासून धनकवडी गावठाण परिसरातील पाटीलनगर येथील इमारतीत एकट्या राहत होत्या. शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं निदर्शनास आलं आहे. मृत महिलेच्या शेजारच्या खोलीत एक महिला आपल्या दोन मुलींसोबत राहत होती. मृत महिलेनं शेजारील महिलेकडून शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास मोबाइल चार्जर आणला होता.
हे वाचा-एकाच कुटुंबातील 5 जणांची निर्घृण हत्या, मृतांमध्ये 10 वर्षाखालील तिघांचा समावेश
हाच चार्जर परत घेण्यासाठी संबंधित महिलेनं सोमवारी सकाळी मृत कल्पना घोष यांना फोन केला. पण त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे शेजारी राहणाऱ्या महिलेनं सकाळी कामावर जायचं असल्यानं मृताच्या घरी चार्जर आणण्यासाठी गेल्या. तेव्हा घराचं दार खुलं होतं. यावेळी तिनं घरात डोकावलं असता, कल्पना घोष यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं तिला आढळलं. याप्रकरणी शेजारच्या महिलेनं या घटनेची माहिती सहकारनगर पोलिसांना दिली.
हे वाचा-झाडाला लटकलेल्या अवस्थेत होता अल्पवयीन मुलगा-मुलीचा मृतदेह; घातपाताचा संशय
या घटनेची माहिती मिळताच सहकारनगर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. त्याचबरोबर पोलिसांनी शनिवारी सायंकाळी संशयास्पद हालचालीमुळे एका अनोळखी व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. मृत घोष यांच्या हत्येचं नेमकं कारण समोर आलं नसून सहकारनगर संशयित व्यक्तीची चौकशी करत आहेत. त्याचबरोबर परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधून काही पुरावे हाती लागतात का? याचा तपास देखील पोलिसांकडून केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Murder, Murder news, Pune