लखनऊ, 27 डिसेंबर : महिलांवरच्या अत्याचाराबाबत सातत्यानं आवाज उठवला जात असला, तरी देशाच्या अनेक भागांमध्ये आजही महिला सुरक्षित नाहीत. उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये नुकतीच एक घटना समोर आलीय. पोलीस शिपाई असलेल्या एका व्यक्तीनं लग्नाचं आमिष दाखवून एका तरुणीचं अनेक दिवस शारीरिक शोषण केलं. तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याबाबत तपास सुरु केला आहे. ‘आज तक’नं त्याबाबत वृत्त दिलं आहे. लखनऊमध्ये राहणाऱ्या तरुणीची ओळख पोलीस शिपाई सुनील कुमार सिंह याच्याशी झाली. तो प्रयागराजचा राहणारा असून, कानपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात राखीव दलात काम करतो. तक्रारदार तरुणीशी ओळख झाल्यानंतर सुनील कुमार आणि तरुणीचं व्हॉट्सअपवर बोलणं सुरु झालं. कधीकधी तो तिच्या घरीही जाऊ लागला. त्याचदरम्यान त्यानं लग्नाचा विषय काढला. लग्नाचं आमिष दाखवून त्यानं तरुणीचा विश्वास संपादन केला. तिच्या खोलीवरही तो सतत जाऊ लागला. वेगवेगळी प्रलोभनं दाखवून त्यानं तरुणीशी जबरदस्तीनं शरीरसंबंध ठेवले. त्यासाठी वेळोवेळी लग्न करण्याचं आमिष त्यानं दाखवलं नाहीतर धमक्याही देऊ लागला. आरोपी सुनील कुमार सिंह याच्याविरोधात तरुणीनं कृष्णानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार सुनील यानं तरुणीच्या घरी जाऊन 50 हून अधिक वेळा तिच्याशी जबरदस्तीनं शरीर संबंध ठेवल्याचा तिचा आरोप आहे. त्यासाठी तो तिला पैसेही देत होता. तरुणीच्या म्हणण्यानुसार, सुनील कुमारच्या घरच्यांसोबत तिचं बोलणं झालं होतं. त्याचा मोठा भाऊ अजय सिंह गुजरातमध्ये नोकरी करतो हेही तरुणीला माहीत होतं. त्यामुळे सुनील कुमार लग्न करेल याबाबत तिला विश्वास वाटू लागला होता. मात्र प्रत्यक्षात लग्न करण्याचा विषय तिनं काढला, तेव्हा त्यानं नकार दिला. हेही वाचा - विवाहित प्रेयसीसोबत प्रियकराचं भयानक कृत्य, स्वत:ही उचललं टोकाचं पाऊल आरोपी सुनील कुमार याच्या कुटुंबियांशीही तरुणीनं लग्नाबाबत चर्चा केली. मात्र त्यांनीही लग्नाला नकार दिला. त्यानंतर आरोपीनं पोलिसात नोकरी करत असल्याचं सांगत तरुणीला धमकावण्यास सुरुवात केली. पोलिसात असल्यानं आपलं कोणी काहीही वाकडं करु शकत नाही, असं सांगत तो तरुणीला धमकवायला लागला. यामुळे तरुणी घाबरून गेली व तिनं कृष्णानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारदार तरुणी प्रतिष्ठानमध्ये नोकरी करते. त्याच ठिकाणी आरोपी सुनील कुमार याच्याशी झालेल्या ओळखीचं रुपांतर प्रेमात होऊन त्याचा आरोपीनं गैरफायदा घेतला. तरुणीनं दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.