ग्वाल्हेर, 27 डिसेंबर : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहेत. त्यातच आता मध्यप्रदेशातून काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने आपल्या विवाहित प्रेयसीला आपल्या दुकानात बोलावून तिच्यावर गोळ्या झाडत तिची हत्या केली आणि नंतर मंदिरात स्वतःवर गोळी झाडून घेतली. यात त्याच्या प्रेयसीचा जागीच मृत्यू झाला. तर प्रियकराचा 24 तासांनंतर रुग्णालयात मृत्यू झाला. खून आणि आत्महत्येची ही घटना ग्वाल्हेरच्या भितरवार पोलीस स्टेशन हद्दीतील मोहनगड गावात घडली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी तरुणासह त्याचे आई-वडील, भाऊ आणि काकाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी घडली. मोहनगड येथे माहेरी आलेल्या मालती चौहान या विवाहित महिलेची तिच्या शेजारी राहणाऱ्या पवन राणा याने दुकानात गोळ्या झाडून हत्या केली. रक्तबंबाळ झालेल्या मालतीला भितरवार रुग्णालयात आणण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्याचवेळी गंभीर जखमी पवनला भितरवार येथून उपचारासाठी ग्वाल्हेर येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान 24 तासांनंतर पवनचाही मृत्यू झाला. मृत विवाहितेच्या भावाने केला हा आरोप - घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळावरून कट्टा जप्त केला. मालतीचा भाऊ हरिओमने सांगितले की, पवनची आई वंदनाने त्याची बहीण मालती हिला घरी बोलावले होते. तेथे पवनसह सर्वांनी मिळून त्याची बहीण मालतीची हत्या केली. मालतीचा भाऊ हरिओमने दिलेल्या तक्रारीवरुन भितरवार पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा एफआयआर नोंदवला. मालतीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी पवन राणा, त्याचे वडील भूपेंद्र राणा, आई वंदना राणा, भाऊ उपेंद्र राणा आणि काका उमराव यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी शवविच्छेदनानंतर दोघांचेही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहेत. हेही वाचा - लग्न लावून दिलं नाही म्हणून… बोरिवलीत अल्पवयीन मुलीचा रागाच्या भरात भयानक निर्णय अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयराज कुबेर यांनी सांगितले की, मालती आणि पवन दोघेही एकमेकांच्या ओळखीचे होते. तपासादरम्यान पवनने आधी मालतीवर गोळी झाडली आणि नंतर स्वत:वर गोळी झाडल्याचे समोर आले. पोलिसांना घटनास्थळावरून एक कट्टाही मिळाला आहे. मालतीचे शवविच्छेदन आणि कट्टाची फॉरेन्सिक तपासणी, कुटुंबीयांच्या जबानीसह पोलिसांनी पवनसह पाच जणांविरुद्ध 302 चा गुन्हा दाखल केला आहे. रविवारी सासरी जाणार होती गर्लफ्रेंड - एएसपीच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणाची कसून चौकशी केली जात आहे. गावकऱ्यांच्या चौकशीत मालतीचा विवाह दतिया येथील इंदरगड येथील सोनूसोबत तीन वर्षांपूर्वी झाल्याचे समोर आले आहे. हे लग्न यशस्वी झाले नाही. लग्नानंतर काही महिन्यांतच मालतीचा सोनूपासून घटस्फोट झाला. काही दिवसांपूर्वी मालतीचे दुसरे लग्न ग्वाल्हेरमध्ये झाले. दुसऱ्या लग्नानंतर मालती सासरच्या घरून पहिल्यांदाच माहेरी आली. रविवारी मालतीला घेण्यासाठी सासरची मंडळी येणार होती. मात्र, त्याआधीच ही भयानक घटना घडली. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.