पाटणा, 16 नोव्हेंबर : प्रेम करणं वाईट नाही. पण पत्नीला धोका देवून किंवा तिचा विश्वासघात करुन दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंधात असणं हे अयोग्य आहे. बिहारची राजधानी असलेल्या पाटणा येथून तर त्यापेक्षाही जास्त भयानक घटना समोर आली आहे. एका इसमाने आपल्या मेव्हणीवर असलेल्या प्रेमाखात पत्नीचा जीव घेतला. त्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो मृतदेह एका बॉक्समध्ये ठेवला. पण शेजारच्यांना त्याच्या कृत्याची चाहूल लागली. त्यानंतर आरोपी आपल्या मेव्हणीसोबत फरार झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी आपल्या पत्नीसोबत इतकं निर्घृणपणे कसं वागू शकतो? असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जातोय.
संबंधित घटना ही पाटणा जवळील मोकामा पोलीस ठाणे हद्दीतील अनुमंडल परिसरात घडली आहे. आरोपी पतीचं नाव सन्नी पासवान असं आहे. त्याने आपल्या मेव्हणीसोबत पत्नी वर्षा कुमारीची हत्या केली. विशेष म्हणजे सन्नी आणि वर्षा यांचं चार वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. त्यांना दोन मुलं देखील आहेत. पण तरीही आरोपीने आपल्या पत्नीची हत्या केली. आरोपीने आपल्या मुलांचा विचार का केला नाही, तो इतका निष्ठूर का बनला? असा सवाल मृतक महिलेल्या नातेवाईकांकडून उपस्थित केला जातोय.
हेही वाचा : क्षुल्लक कारणावरुन टोकाचा वाद, राजधानी दिल्लीत भयानक रक्तपात; एकाचा मृत्यू
संबंधित घटनेचा अजून पूर्णपणे उलगडा झालेला नाही. पण जेव्हा ही घटना घडली तेव्हा शेजारी राहणाऱ्यांना त्याची कल्पना आली. त्यांनी तातडीने वर्षाच्या कुटुंबियांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर वर्षाचा भाऊ रात्री दहा वाजेच्या सुमारास पोलिसांना घेऊन घरी दाखल झाला. पोलिसांनी घराची झडती घेतली तेव्हा घरात वर्षाचा मृतदेह एका बॉक्समध्ये सापडला. तर तिचा पती आणि बहीण हे घटनास्थळावरुन फरार झाले होते.
बॉक्समध्ये महिलेचा मृतदेह बघून पोलीस चक्रावले. मृतक वर्षाच्या मानेवर काही खुणा आढळल्या आहेत. त्यामुळे गळा आवळून किंवा गळफासद्वारे तिची हत्या करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवल आहे. पण जोपर्यंत सन्नी आणि त्याची मेव्हणी सापडत नाहीत तोपर्यंत या प्रकरणाचा सविस्तर उलगडा होणार नाही, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
हेही वाचा : करचुकवेगिरीसाठी भामट्यांचं धक्कादायक कृत्य; सरकारी वाहनांमध्ये बसवले GPS
खरंतर महिला ही आपल्या माहेरी राहत होती. तिच्यात आणि सन्नीमध्ये वारंवार भांडणं व्हायचे. त्यामुळे ती माहेरी आली होती. या दरम्यान सोमवारी (15 नोव्हेंबर) वर्षाचे वडील आणि भाऊ काही कामानिमित्ताने घराबाहेर पडले होते. त्यांना घरी यायला उशिर होणार होता. याच गोष्टीचा फायदा घेऊन सन्नी सासरी पोहोचला. त्याने मेव्हणीच्या मदतीने वर्षाची हत्या केली. त्यानंतर ते दोघे पळून गेले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Crime news, Murder