नवी दिल्ली 16 नोव्हेंबर : सरकारी कायदे, नियम यातून पळवाट काढण्यासाठी गुन्हेगार कोणत्या थराला जाऊ शकतात याचं एक धक्कादायक उदाहरण नुकतंच पंजाबमध्ये उघडकीस आलं आहे. कर चुकवण्यासाठी (Tax Evasin) मालवाहतूकदारांच्या (Goods Carrier) टोळीनं पंजाब कर आकारणी विभागाच्या (Punjab Tax Department) वाहनांमध्येच पोर्टेबल जीपीएस (GPS) उपकरणं बसवल्याचं आढळलं आहे. याआधारे वाहनांचा मागोवा घेऊन तपासणीसाठी अधिकारी ज्या मार्गावर असतील ते रस्ते चुकवून किंवा ती वेळ टाळून मालवाहतूकदार प्रवास करत असत. पंजाब कर आकारणी विभागाच्या वाहनांमध्ये 12 उपकरणं बसवल्याचं समोर आलं आहे. टाइम्स ऑफ इंडियानं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
पंजाब राज्याच्या कर-1 विभागाचे अतिरिक्त आयुक्त सागर सेटिया यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, 'मोबाइल विंगच्या (Mobile Wing) नियमित तपसणीदरम्यान ही घटना उघडकीस आली आहे. आतापर्यंत 12 उपकरणं सापडली असून, नऊ उपकरणं कर विभागाच्या वाहनांमध्ये लावण्यात आली होती. लुधियाना मोबाइल विंग कार्यालयाच्या चार वाहनांमध्ये, जालंधर मोबाइल विंगच्या दोन वाहनांमध्ये आणि पतियाळा मोबाइल विंग कार्यालयातल्या एका वाहनात एकूण 9 जीपीएस उपकरणं बसवण्यात आली होती.
Ravana first Aviator: रावणाच्या लंकेत होती एअरपोर्ट्स? श्रीलंका करतेय संशोधन
या जीपीएस उपकरणांमध्ये सापडलेली मोबाइल सिम कार्ड्स ज्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत, त्यांचा शोध घेण्यासाठी लुधियाना पोलिसांच्या सायबर सेलकडे (Cyber Cell) तक्रार दाखल करण्यात आली आहे. सर्व माहिती मिळाल्यानंतर दोषींवर एफआयआरसह (FIR) कारवाई केली जाईल. आम्ही आमच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना अधिक सतर्क राहण्यास सांगितलं आहे.'
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कर चुकवणार्यांचं, विशेषत: पासधारक वाहतूकदार आणि कर न भरता मालाची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या संघटित टोळ्यांच्या सदस्यांचं कारस्थान असावं. करचुकवेगिरी करणाऱ्यांनी ट्रॅकिंग विभागाच्या पथकांकडून होणारी तपासणी चुकवण्यासाठी हा मार्ग अवलंबला आहे. या जीपीएस उपकरणांद्वारे हे गुन्हेगार कर विभागाचे अधिकारी आणि त्यांच्या वाहनांचा मागोवा घेत असत. त्यामुळे त्यांना अधिकाऱ्यांनी कोठे तपासणी चौक्या लावल्या आहेत किंवा छापे टाकण्याची योजना आखली आहे याची माहिती आधीच मिळत असे आणि ते पर्यायी मार्ग वापरून किंवा दुसरी वेळ निवडून तपासणीतून सुटू शकतील.
गेल्या काही दिवसांत कर विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासण्यांमध्ये, छाप्यांमध्ये कोणीही गुन्हेगार सापडले नाहीत. सतत असं घडू लागल्यानं अधिकाऱ्यांना संशय आला. कारण आतापर्यंत असं कधीच घडलं नव्हतं. एरव्ही एकाच दिवसात अनेक गुन्हेगार पकडले जात असत. तेव्हा विभागाच्या काही वाहनांची तपासणी करण्यात आली. तेव्हा हे धक्कादायक कारस्थान उजेडात आलं. विभागाच्या वाहनांमध्येच मॅग्नेटिक जीपीएस ट्रॅकर (Magnetic GPS Tracker) लावण्यात असल्याचं दिसून आलं.
हे आहेत सर्वात चलाख चोर! VIDEO पाहून व्हाल थक्क
तपासणीनंतर हे जीपीएस ट्रॅकर जप्त करण्यात आले. यानंतर लुधियानातल्या राज्य कर (मोबाइल विंग) सहायक आयुक्तांनी 11 नोव्हेंबर रोजी लुधियाना पोलीस विभागाच्या सायबर सेलच्या एसीपींना एक पत्र पाठवून त्यात या जीपीएस उपकरणांमध्ये वापरलेल्या सिम्सचे तपशील आणि फोन नंबर, कॉल रेकॉर्ड, ज्या मोबाइलवरून या उपकरणांचं निरीक्षण केलं जात होतं, त्यांचे आयएमईआय (IMEI) तपशील सादर करण्याची विनंती केली आहे. त्या आधारे ही उपकरणं बसवलेल्या व्यक्तींवर योग्य ती कारवाई करता येईल असं कर आयुक्तांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.