गुवाहाटी, 5 मे : गुन्हेगार फक्त सामान्य लोकांनाच फसवतात असं नसून आता त्यांची पोलिसांनाच फसवण्यापर्यंत मजल गेली आहे. एका महिला PSI ने स्वतःच्या लग्नाच्या काही महिने आधी तिच्या होणाऱ्या पतीला फसवणुकीच्या आरोपाखाली अटक केली. या महिला पोलीस अधिकाऱ्याला तिच्या पतीने आपण मोठ्या हुद्द्यावर नोकरीला असल्याचं सांगितलं होतं. मात्र, काही काळानंतर तिला त्याचा संशय येऊ लागला.
जुनमोनी राभा (PSI Junmoni Rabha) असं या महिला पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. तिचा होणारा पती राणा पोगाग (Rana Pogag) याने ऑइल इंडिया लिमिटेडचा पीआर अधिकारी म्हणून आपली ओळख खोटी सांगत असे. जुनमोनी यांनाही त्याने अशाच प्रकारे मोठा अधिकारी असल्याचं सांगून फसवलं होतं. तसंच, त्याने अनेकांना ओआयएल इंडिया लिमिटेडमध्ये नोकरी देण्याच्या खोट्या बहाण्याने करोडो रुपयांची कथितपणे फसवणूक केल्याचा आरोप त्याचावर आहे.
आसामच्या (Assam) नागाव जिल्ह्यात तैनात असलेल्या एसआय जुनमोनीने फसवणूक केल्याबद्दल एफआयआर दाखल केल्यानंतर त्याला अटक केली आणि तिच्या होणाऱ्या पतीला नागाव पोलिसांच्या स्वाधीन केलं. गेल्या ऑक्टोबरला त्यांचा साखरपुडा झाला होता आणि या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ते विवाहबंधनात अडकणार होते.
वृत्तानुसार, आरोपी राणा जानेवारी 2021 रोजी जुनमोनीला माजुली येथे तिचं पोस्टींग असताना भेटला आणि काही महिन्यांनंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या संमतीने आणि आशीर्वादाने त्यांचा साखरपुडा झाला. तिने मीडियाला सांगितल्यानुसार, तिची नागाव येथे बदली झाल्यानंतर तिला त्याच्यावर संशय आला. ती म्हणाली की, त्याच्याकडे सध्या कोणतीही नोकरी नाही आणि तो तिच्याशी खोटे बोलला की, तो दुसर्या ठिकाणी म्हणजे सिलचरला जॉईन व्हायला नाखूष आहे, जिथे त्याची बदली झाली आहे. कारण, तो तिच्यापासून दूर राहणं सहन करू शकत नाही!
हे वाचा - 11 लाख चोरून टॅटूची हौस भागवली, पोलिसांनी टाकला असा डाव; चालाख चोरटे आले जाळ्यात
‘मला तीन लोकांचे आभार मानायचे आहेत ज्यांनी पुढे येऊन मला त्याच्या उपद्व्यापांची माहिती दिली आणि माझे डोळे उघडले,’ असं जुनमोनीने माध्यमांशी बोलताना सांगितलं.
त्यानंतर पोलिसांनी राणाच्या ताब्यातून बनावट शिक्के आणि खोटी कागदपत्रं जप्त केली. त्याला आता 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
‘त्याच्याबद्दल काहीतरी खूप संशयास्पद होतं आणि हळूहळू मला त्याच्या घोटाळ्यांबद्दल कळलं,’ असं जुनमोनीने मीडियाला सांगितलं.
हे वाचा - मुख्यमंत्री योगींच्या निशाण्यावर आलेल्या कोण आहेत IAS Nidhi Kesarwani?
या फसवणुकीपूर्वी पोलीस उपनिरीक्षक जुनमोनी राभा एजीपी आमदार अमिया भुयान यांच्याशी टेलिफोनिक संभाषण व्हायरल झाल्यानंतर चर्चेत आल्या होत्या. अमिया भुयानने जुनमोनी यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांपासून दूर जाण्यास सांगितलं होतं, तेव्हा तिने त्यांना योग्य उत्तर दिलं होतं. गेल्या वर्षी माजुली बोटीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सरकारने ब्रह्मपुत्रा नदीत बोटींगला बंदी घातली होती. असं असताना नदीत बेकायदेशीरपणे एक इंजिन बोट चालवल्याबद्दल जुनमोनी यांनी अमिया यांच्या मतदार संघातील काही लोकांना अटक केली होती. या लोकांना सोडण्यास अमिया यांनी जुनमोनी यांना सांगितलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Assam, Crime news, Police