यवतमाळ, 20 फेब्रुवारी: जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढता असल्याने जमावबंदी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी लागू केले आहेत. गुरुवारी सायंकाळपासून या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली, मात्र शुक्रवारीच या आदेशाची पायमल्ली होताना पाहायला मिळाली. शहरामध्ये या नियमांचे पालन होताना फारसे पहायला मिळाले नाही. शेवटी जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह स्वतः रस्त्यावर उतरून नागरिकांना नियमांचे पालन करायला सांगत होते. वर्दळीच्या काही भागात त्यांनी फेरफटका मारला यावेळी विना मास्क दिसलेल्यांना दंडात्मक कारवाई केली आहे
यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी सर्वांना प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाय योजनांची माहिती दिली. कोरोनाचं संकट वेळीच रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे नागरिकांनी देखील यामध्ये सहकार्य करणं आवश्यक आहे. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम मोडणाऱ्यांवर पोलिस विभागाच्या मदतीने कडक कारवाईचे संकेत जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. कोरोनाचे वाढते संक्रमण नियंत्रणात आणण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि विलगीकरणावर भर देण्यात यावा असेही ते म्हणाले.
(हे वाचा-नागपुरात कडक निर्बंध; अंत्यविधीला फक्त 20 जण; हॉटेल्सही 50 टक्के क्षमतेने)
दरम्यान यवतमाळमधील शनि मंदिर चौक, दत्त चौक, आर्णी नाका, भाजी मंडई, या भागात प्रचंड गर्दी आढळून आली होती. अनेकांच्या तोंडाला मास्क नसल्याचे विदारक चित्र जमावबंदीच्या पहिल्याच दिवशी पाहायला मिळाले . यवतमाळ पुसद आणि पांढरकवडा तीनही शहरे अतिधोकादायक अवस्थेतआहे . अशाही स्थितीत नियमांचे पालन होतांना दिसत नाही.
(हे वाचा-कोरोनानं देशापुढे ठेवलेलं सर्वांत मोठं आव्हान; 26 कोटी मुलांचं शैक्षणिक नुकसान)
यवतमाळ जिल्ह्यात कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढू लागला आहे. दरदिवशी नव्या रुग्णांमध्ये भर पडत आहे. शुक्रवारी दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून 126 जण नव्याने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सध्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या 15,825 झाली असून यापैकी 867 रुग्ण अद्याप अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर 444 जणांचा मृत्यू झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus in india, Covid19, District collector, Maharashtra, Shiv jayanti, Yavatmal