नागपुर, 19 फेब्रुवारी: मुंबई, पुणे, नागपुरसह विदर्भात काही शहरांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या (coronavirus) दिवसेंदिवस वाढतच आहे. ओसरलेली संख्या पुन्हा नव्या कोरोना लाटेच्या स्वरूपात येण्याची भीती निर्माण झाल्याने शहरांमधले सोशल डिस्टन्सिंगचे निर्बध कडक करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर, मुंबईपाठोपाठ नागपूर महानगरपालिकेनेही कोविड-19च्या निर्बंधांची (Covid-19 Rules) कठोर अंमलबजावणी सुरू केली आहे. हॉटेल्स (Hotels with 50 percent capacity) केवळ 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार असून, पाचपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळलेल्या बिल्डिंग सील (Building Seal) केल्या जाणार आहेत.
याबद्दल प्रसिद्ध करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये असं म्हटलं आहे, की आता होम क्वारंटाइन (Home Quarantine) रुग्णांच्या हातावर शिक्का मारण्यास पुन्हा सुरुवात होणार असून, अंत्यसंस्कार विधीला वीसहून अधिक व्यक्तींना उपस्थित राहता येणार नाही.
गुरुवारी (18 फेब्रुवारी) नागपुरात कोविड-19चे (Covid-19) 644 नवे रुग्ण सापडले. नागपुरात आतापर्यंत सापडलेल्या कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 41 हजार पर्यंत पोहचली आहे.
अवश्य वाचा - मोठी बातमी! विदर्भात फुटला कोरोनाचा टाइम बॉम्ब, नागपुरात गेल्या 24 तासात 644 नवे रुग्ण
गुरुवारी नागपुरात सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला, तर 250 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आलं.
75 दिवसांनंतर महाराष्ट्रात गुरुवारी एकाच दिवसात पाच हजार नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यापैकी बहुतांश रुग्ण अकोला (Akola) आणि नागपुर (Nagpur) विभागातले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने दिली. गुरुवारी राज्यात 5427 नवे रुग्ण आढळले आणि 37 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातल्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या 20 लाख 81 हजार 520 झाली आहे. तसंच, आतापर्यंत राज्यात 51 हजार 669 जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत, अशी माहितीही त्या अधिकाऱ्याने दिली.
गेल्या आठवड्यापासून राज्यात दररोज नव्या कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. 'गुरुवारी सापडलेल्या 5427 नव्या रुग्णांपैकी 2105 रुग्ण अकोला आणि नागपुर विभागातले आहेत. त्यापैकी एकट्या अकोल्यात 1258 नवे रुग्ण आढळले. तसंच, अमरावती नगरपरिषद परिसरात 542 आणि अमरावती जिल्ह्यात 191 नवे रुग्ण आढळले,' अशी माहिती सुद्ध्या या अधिकाऱ्याने दिली.
पुन्हा लॉकडाऊन? पाहा कुठे काय बंद आणि काय सुरू राहणार; नवे नियम लागू
यवतमाळ जिल्हा प्रशासनाने गुरुवारी रात्रीपासून 10 दिवसांचा लॉकडाउन (Lockdown) जाहीर केला आहे. तसंच, अमरावती जिल्ह्यात वीकेंड लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार, शनिवारी रात्री आठ वाजल्यापासून सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंतच्या काळात अमरावती (Amaravati) जिल्ह्यात लॉकडाउन असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Covid19, Mumbai, Nagpur