नवी दिल्ली, 29 जुलै: देशात एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांच्या दैनंदिन (Corona Cases) संख्येत घट होत असताना दुसरीकडे काही राज्यांत आणि ठराविक जिल्ह्यांत हळूहळू पुन्हा रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. केरळमध्ये तर दैनंदिन रुग्णसंख्या भयावह पद्धतीने वाढते आहे. 24 तासांत 22 हजार नवे रुग्ण गुरुवारी सापडले. मागील काही दिवसांपासून देशातल्या नव्या कोरोनाबाधित रुग्णांची दैनंदिन संख्या 42 हजारांवर गेल्याचे दिसून येत आहे. बुधवारच्या आकडेवारीनुसार, 24 तासांत देशात 43 हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला (Corona Third Wave) सुरुवात झाल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
कोरोनाबाधित रुग्णांचा दैनंदिन आकडा बघता कोरोनाची तिसरी लाट सुरू झाली की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे. जुलै-ऑगस्टमध्ये कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, असा अंदाज काही महिन्यांपूर्वी तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर सध्याची वाढती रुग्णसंख्या बघता नवी लाट सुरू झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी एक रुग्णांची विशिष्ट संख्या दिसू लागणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
राज्यभर Unlock नाहीच; पुण्यासह 11 जिल्ह्यांमध्ये निर्बंध अधिक कडक
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे (AIIMS) माजी संचालक डॉ एम.सी. मिश्र यांनी न्यूज 18 शी बोलताना सांगितले की सध्याची वाढती रुग्णसंख्या पाहता देश कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर असल्याचं काही लोकांचं म्हणणं आहे. रुग्णसंख्येत सातत्याने घट झाल्यानंतर ती पुन्हा वाढू लागल्याने असं बोललं जात आहे. मात्र वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करता हे म्हणणं योग्य नाही. रुग्णसंख्या कमी अधिक प्रमाणात घट किंवा वाढ होऊ शकते.
कधी समजायचं तिसरी लाट आली?
डॉ. मिश्र म्हणाले की दुसऱ्या लाटेतील सर्वाधिक रुग्ण संख्येच्या तुलनेत एक तृतीयांश रुग्ण संख्या जोपर्यंत आढळून येत नाही, तोपर्यंत देशात तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली आहे, असं म्हणता येणार नाही. याबाबत अधिक सविस्तर समजून घेत असताना दुसऱ्या लाटेतील (Second Wave) आकडेवारीकडे पाहणं आवश्यक आहे. मार्च 2021 नंतर भारतात दुसरी लाट सुरु झाली. यादरम्यान एका दिवसांत चार ते सव्वाचार लाख रुग्ण आढळून येत होते. ही दुसऱ्या लाटेतील सर्वाधिक संख्या होती.
Corona: या राज्यातील लोकांमध्ये सर्वाधिक अँटीबॉडीज; महाराष्ट्रातील स्थिती काय?
ही स्थिती पाहता आता जर देशात एक लाख ते सव्वा लाख कोरोनाबाधित रुग्ण दररोज आढळून येऊ लागले म्हणजेच दुसऱ्या लाटेतील सर्वाधिक रुग्ण संख्येच्या तुलनेत एक तृतीयांश रुग्ण रोज आढळून येऊ लागले तर देशात कोरोनाची तिसरी लाट आली असल्याचे आपण म्हणू शकतो. परंतु, देशात जर दररोज दोन-पाच हजार किंवा 10 ते 20 हजाराने रुग्णसंख्या आढळत असेल किंवा कमी होत असेल तर देशात तिसरी लाट आली आहे असं म्हणता येणार नाही. त्यामुळे सध्या देशात दुसरी लाट सुरु आहे, हे स्पष्ट होतं.
यामुळे होतेय रुग्णसंख्येत वाढ आणि घट
डॉ. मिश्र म्हणाले की देशातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येत रोज बदल होतोय. यामागे नवी लाट हे कारण नसून, अन्य काही कारणं आहेत. यामध्ये चाचण्यांची संख्या वाढणं, कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्याने लोकं पॉझिटिव्ह होणं, दक्षिण, ईशान्य भागातील राज्यं तसंच महाराष्ट्र या राज्यांमध्ये रुग्णसंख्या जास्त असल्याने तिथं रुग्णसंख्येत अजून वाढ होताना दिसत आहे. तसेच कोरोना व्हेरियंटमधील (Corona Variant) बदल हे देखील एक कारण असू शकतं.
कोरोनाची एकही केस नसताना देखील लोकांनी काळजी घ्यावी
डॉ. मिश्र यांनी सांगितले, की देशात अद्याप कोरोनाची दुसरी लाट सुरु असून तिसरी लाट आलेली नाही. देशातील काही राज्यांमध्ये रुग्णसंख्या जास्त असून, अन्य भागात रुग्णसंख्या कमी झाली आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की सर्वजण सुरक्षित आहेत. कोरोनाचा धोका कधीही डोकं वर काढू शकतो. त्यामुळे आपल्या आसपास कोरोना बाधित एकही रुग्ण नसला तरी लोकांनी कोरोनाप्रतिबंधक नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. लोकांनी मास्क (Mask) लावणं, सोशल डिस्टन्सिंगचं (Social Distancing) पालन करणं आवश्यक असून सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी टाळावं. लहान मुलांमध्ये जागृती करुन त्यांना घराबाहेर जाण्यापासून रोखावं.
धक्कादायक! मुंबईतील डॉक्टर तरुणीला तीनदा कोरोनाने गाठलं; लसीकरणानंतरही संसर्ग
केवळ सरकारवर भरोसा ठेवून आपण सुरक्षित राहू शकत नाही. परदेशात तेथील सरकारने देखील योग्य व्यवस्था ठेवली होती, नियोजन केले होते, परंतु, अडचणी अद्यापही कायम आहेत. त्यामुळे केवळ व्यवस्थेवर अवलंबून राहू नये, हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. 2020 मध्ये कोरोनाविषयी ज्या नियमांचे पालन आणि उपाययोजना आपण करत होतो, ते सर्व सुरुच ठेवत सुरक्षित राहणं आवश्यक असल्याचं, डॉ. मिश्र यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Kerala