पुणे, 29 जुलै : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णसंख्या (Coronavirus) कमी होत असल्याचं चित्र असलं तरी अद्यापही टेन्शन पूर्णपणे संपलेलं नाही. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध अधिक कडक करण्यात येणार आहे. राज्यातील लॉकडाऊन कधी हटवणार असा प्रश्न सध्या नागरिकांकडून विचारला जात आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्यापही लॉकडाऊन हटविण्यासाठी हिरवा कंदील गिलेला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये निराशा आहे.
दुसरीकडे टास्क फोर्सच्या बैठकीनंतर महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीनुसार राज्यातील 11 जिल्हे हे लेव्हल 3 मध्येच ठेवण्यात येतील. पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, रायगड, सिंधुदूर्ग, पालघर, नगर, बीड या ११ जिल्ह्यात निर्बंध शिथिल केले जाणार नाहीत. तर उलटपक्षी स्थानिक प्रशासनाच्या सहमतीने निर्बंध वाढवण्यात येणार आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली.
हे ही वाचा-लवकरच सामान्य जनतेला मुंबई लोकलमधून मिळणार प्रवासाची परवानगी?
दुसरीकडे 25 जिल्ह्यांत निर्बंध शिथिल करण्याबाबत तयारी सुरू आहे. याचे कागदोपत्री काम झाले असून केवळ मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी बाकी असल्याचं सांगण्यात आलं आहे. एक दोन दिवसांत याबाबतचा जीआर निघेल असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. केरळमधील रूग्ण वाढत असल्याने, ही चिंतेची बाब आहे. महाराष्ट्रात पुन्हा रुग्णसंख्या वाढू नये यासाठी अधिक काळजी घेतली जात आहे.
तिसऱ्या लाटेसाठी राज्याची तयारी
राज्यात तिसरी लाट येईल तेव्हा येईल. राज्याची तिसऱ्या लाटेसाठी तयारी आहे का हे खूप महत्त्वाचं आहे. पण येणाऱ्या लाटेसाठी आमची तयारी झाली आहे. या लाटेसंदर्भात जिल्हा, तालुका स्तरावरील सर्व अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्यात. सरकारनं लहान मुलांसाठी लागणाऱ्या औषधांचीही तयारी करण्यात आली आहे. तिसऱ्या लाटेसाठी सर्व बाजूंनी आपण तयार असल्याचं राजेश टोपेंनी म्हटलं आहे. तसंच लोकांनी कोरोना नियमांचं पालन करावं आणि लसीकरणाला प्रतिसाद द्यावा, असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona patient, Coronavirus cases, Maharashtra, Pune