प्योंगयांग, 12 मे : उत्तर कोरियात (North Korea) पहिला कोरोना बाधित रुग्ण (Covid positive) आढळून आल्याने किम जोंग उन यांनी गुरुवारपासून देशभरात लॉकडाऊन (Lockdown in North Korea) लागू केला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी किम जोंग उन यांनी प्रशासनाला कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर दोन वर्षांनी प्रथमच उत्तर कोरियात कोरोना बाधित आढळून आला आहे. पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने कोरोना प्रतिबंधात्मक नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीने सांगितले की, राजधानी प्योंगयांगमध्ये काही नागरिकांची कोविड चाचणी करण्यात आली. यामध्ये एका व्यक्तीला कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झाल्याचं आढळून आलं. या रुग्णाला तात्काळ आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं असून त्याच्यावर योग्य ते उपचार सुरू करण्यात आले आहेत.
वाचा : Coronavirus नंतर आता Monkeypox virus चं संकट! या लक्षणांकडे दुर्लक्ष पडेल महागात
संपूर्ण उत्तर कोरियात अनिश्चित काळासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना आणि खबरदारी घेतली जात आहे.
न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार, कोरोना बाधिताची नोंद झाल्यावर किम जोंग उन यांनी सत्ताधारी कोरियन वर्कर्स पार्टी पोलिट ब्युरोची बैठक बोलावली. या बैठकीत सदस्यांनी कोरोना व्हायरसविरोधी उपाययोजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. किम जोंग उन यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना या कोरोनाचा स्त्रोत लवकरात लवकर नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.
कोरोना महामारीच्या सुरुवातीला जेथे सर्व देश कोरोना विषाणूशी झुंज देत होते. त्यावेळी उत्तर कोरियाने आपल्या देशात शून्य कोविड केसेस असल्याचा दावा केला होता. पण आता याच उत्तर कोरियात कोरोना बाधिताची नोंद झाली आहे. त्यानंतर उत्तर कोरियात लॉकडाऊन लावण्यात आला आहे.
उत्तर कोरियाने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये जागतिक आरोग्य संघटनेला सांगितले होते की, त्यांनी याच महिन्यात 25,986 नागरिकांची कोविड चाचणी केली होती. या नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचं समोर आलं होतं. मात्र, उत्तर कोरियाच्या या दाव्यांवर विश्वास ठेवणे कठीण आहे. कठोर सेन्सॉरशिपमुळे उत्तर कोरियाकडून अचूक माहिती मिळणं अशक्य असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Lockdown, North korea