नवी दिल्ली, 01 फेब्रुवारी: जगभरातील अनेक देशांमध्ये गेल्या दोन वर्षापासून कोरोनाचा (Corona) कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अनेक देश मेटाकुटीला आल्याचं चित्र आहे. जगभरात सध्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण (Vaccination) वेगाने सुरू आहे. भारतात देखील परिस्थिती वेगळी नाही. देश सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा (Third Wave of Coronavirus) सामना करत आहे. गेल्या काही दिवसांपासून तिसऱ्या लाटेची तीव्रता काहीशी कमी झाल्याचं चित्र आहे. देशात एकीकडे कोरोना बाधित रुग्णांची संख्या घटत असताना, दुसरीकडे मात्र कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढताना दिसतो. यासाठी केरळ (Kerala) हे राज्य कारणीभूत असल्याचं मानलं जात आहे. केरळमध्ये काही दिवसांपूर्वी ज्या रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, त्यांचे दस्तावेज (Documents) नसल्यानं तो आकडा त्यावेळी न दाखवता, आताच्या आकडेवारीत दाखवला जात आहे. विशेष म्हणजे अजूनही काही रुग्णांचे अर्ज पेंडिंग असल्यानं हा आकडा वाढतच जाणार आहे.
हे वाचा-Coronavirus: कधी होणार कोरोनाचा The End...भारतातील मोठ्या वैज्ञानिकांनी दिलं उतर
देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव काहीसा कमी होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत देशात 1.67 लाख नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. ही संख्या रविवारच्या तुलनेत 20.4 टक्क्यांनी कमी आहे. मात्र कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांचा आकडा काहीसा भिती वाढवणारा आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनामुळे 1192 रुग्णांचा मृ्त्यू झाला आहे. मृत्यूचे आकडे अधिक दिसण्यामागे केरळ हे राज्य कारणीभूत आहे. गेल्या 24 तासांत केरळमध्ये सर्वाधिक 729 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. रविवारी ही संख्या 475 नोंदली गेली. मात्र केरळमधला कोरोनाचा ग्राफ (Corona Graph) कमी होताना दिसत आहे. सोमवारी केरळमध्ये 42,154 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. रविवारी ही संख्या 51,570 होती. गेल्या 24 तासांत केरळमध्ये 729 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. मात्र त्यापैकी 81 मृ्त्यू हे काही दिवसांपूर्वी झाले होते. परंतु, त्यावेळी दस्तावेजाचं काम पूर्ण न झाल्यानं त्यांची त्यावेळी नोंद झाली नाही. अर्ज केल्यानंतर 638 रुग्णांची कोविड मृत्यू (Covid Death) म्हणून नोंद झाली. मात्र अजून मोठ्या प्रमाणात अर्ज पेंडिंग असल्याने ही संख्या सातत्याने वाढणार आहे.
हे वाचा-शाळेत जाऊ दे न व! खूप झाले Online Classes, मुलांनी शाळेत जाणं का ठरेल योग्य?
मृतांचा आकडा वाढण्याचे कारण म्हणजे केरळमध्ये यापूर्वी झालेले मृ्त्यूही मोजले जात आहेत. कोविड बुलेटिननुसार, केरळमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 54,935 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 18,915 मृ्त्यू असे आहेत की ज्यांची नंतर कोविड मृत्यूमध्ये गणना झाली. म्हणजेच आतापर्यंत झालेल्या मृत्यूपैकी 35 टक्के मृत्यू हे नंतरच्या काळात कोविड मृत्यूच्या वर्गवारीत नोंदले गेले.
वास्तविक, 22 ऑक्टोबर 2021 पासून केरळ दररोज जुन्या मृत्यूंची आकडेवारी अॅड करत आहे. कोरोनामुळे अनेकांचा मृत्यू झालेला असताना त्यांचा समावेश कोविड मृत्यू वर्गवारीत झालेला नव्हता. मात्र आता हेच मृत्यू कोविड मृत्यू म्हणून गणले जात आहेत.
पूर्वी असं असायचं की एखाद्या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह यायचा आणि नंतर त्याचा मृत्यू झाला तर त्याची गणना कोविड मृत्यूमध्ये केली जात नसे. त्याच प्रमाणे एखाद्या कोरोनाबाधित रुग्णालयात दाखल केले आणि त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याचा मृत्यू झाला तर तोही कोविड मृत्यू मानला जात नसे. 4 ऑक्टोबर 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला की जर एखाद्या रुग्णाचा मृत्यू पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर 30 दिवसांच्या आत झाला तर तो कोविड मृत्यू मानला जावा. यानंतर केंद्र सरकार (Central Government) आणि 'आयसीएमआर'ने (ICMR) मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या.
हे वाचा-11 वर्षीय मुलाला वर्षभरातच अल्फा, डेल्टा, ओमिक्रॉनचा विळखा; कशी झाली अवस्था पाहा
या मार्गदर्शक सूचनांनुसार, ज्या रुग्णांचा यापूर्वी मृत्यू झाला आहे, परंतु, त्यांची केस कोविड मृत्यू म्हणून विचारात घेतली नसेल तर त्यांचे नातेवाईक यासाठी अर्ज करू शकतात. नातेवाईकांनी अर्जासह दस्तावेज सादर केल्यानंतर सरकार त्यांना कोविड मृत्यू मानून नुकसानभरपाई देते. या सर्व पार्श्वभूमीवर केरळमध्ये अशा अर्जांची संख्या वाढत असून, अद्याप मोठ्या प्रमाणात अर्ज पेंडिंग आहेत. त्यामुळे जसजसे अर्ज निकाल निघत आहेत तसतशी कोविड मृत्यूंची आकडेवारी वाढताना दिसत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.