• Home
  • »
  • News
  • »
  • coronavirus-latest-news
  • »
  • 100 कोटींचा टप्पा गाठला; पुढे काय? मोदींचा महालसीकरणाचा रथ ओढणाऱ्या 6 सारथ्यांनी सांगितली योजना

100 कोटींचा टप्पा गाठला; पुढे काय? मोदींचा महालसीकरणाचा रथ ओढणाऱ्या 6 सारथ्यांनी सांगितली योजना

Corona vaccination in India : भारतात कोरोना लसीकरण मोहिमेचं शिवधनुष्य पेलणाऱ्या सहा तज्ज्ञांशी न्यूज 18 ने बातचीत केली आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर : भारताने एक अब्ज (100 Crore vaccinated) नागरिकांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा (Corona vaccination in india) टप्पा ओलांडून आज (21 ऑक्टोबर 2021) इतिहास रचला आहे. जगातल्या सर्वांत मोठ्या लसीकरण मोहिमेतील (World’s biggest vaccination drive) हा मैलाचा दगड. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 16 जानेवारी 2021 रोजी ही देशव्यापी मोहीम सुरू केली होती. या वर्षभरात देशातल्या 944 दशलक्ष प्रौढांचं लसीकरण पूर्ण करण्याच्या उद्देशाने ही मोहीम सुरू करण्यात आली होती. आतापर्यंत यांपैकी 75 टक्के नागरिकांनी लशीचा पहिला डोस घेतला आहे. 31 टक्के नागरिकांनी लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत. देशातल्या 90 टक्के नागरिकांना ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेकाच्या कोव्हिशिल्ड (Covishield) या लशीचा डोस देण्यात आला आहे. देशात पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये या लशीचे उत्पादन घेतलं जातं. कोव्हिशिल्ड वगळता भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन, रशियाची स्पुतनिक-व्ही, मॉडर्ना आणि जॉन्सन अँड जॉन्सन या लशींनाही भारतात आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. एवढ्या मोठ्या लसीकरण मोहिमेचं शिवधनुष्य पेलणाऱ्या सहा तज्ज्ञांशी न्यूज 18 ने बातचीत केली. डॉ. बलराम भार्गव, आयसीएमआरचे (ICMR) मुख्य संचालक - भारत एवढ्या लवकर 100 कोटी लसीकरणाचा टप्पा गाठेल असं तुम्हाला वाटलं होतं का? - आपण हा टप्पा पार केला आहे, ही खरं तर खूप समाधानाची बाबत आहे. या लसीकरण मोहिमेत सहभागी असणारे आरोग्य कर्मचारी आणि सर्वांनाच या यशाचं श्रेय जातं. त्यांच्या अविरत मेहनतीमुळेच आपण एवढ्या लवकर हा टप्पा गाठू शकलो. हे वाचा -  जबरदस्त! भारतानं ओलांडला 100 कोटी लसीकरणाचा टप्पा: 'ही' राज्यं ठरली अग्रेसर खरंतर संपूर्ण देशाचाच यात मोठा सहभाग आहे. सुरुवातीला नागरिकांच्या मनात लशीबाबत या मोहिमेबाबत शंका होत्या; मात्र हळूहळू त्या कमी होत गेल्या आणि लसीकरणाला (Vaccination In India) नागरिकांचा प्रतिसाद वाढू लागला. यातूनच आपण आज या टप्प्यावर पोहोचलो आहोत. - सर्व भारतीयांचं लसीकरण झालं, तर पुढील वर्षीपासून आपण मास्क घालणं बंद करू शकतो का? - पुढचं वर्ष हे खरंच खूप चांगलं असावं अशी आशा आहे; पण म्हणून लगेच मास्क काढण्याचा सल्ला आम्ही देणार नाही. कोरोना पूर्णपणे गेल्याशिवाय मास्क अनिवार्यच असणार आहे. याउलट लसीकरण झाल्यामुळे हुरळून न जाता, येणारे सण-उत्सवही खबरदारी बाळगूनच साजरे करायचे आहेत. - जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) एका समितीने बूस्टर डोसचा सल्ला दिला आहे. भारतही त्यावर विचार करत आहे का? - कोरोनाबाबत जेवढी माहिती मिळत आहे, तेवढी घेण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. बूस्टर डोसबाबत बऱ्याच गोष्टी महत्त्वाच्या ठरतात, जसं की अँटीबॉडी स्तर, सेल्युलर इम्युनिटी, म्युकोसल इम्युनिटी, इत्यादी. याव्यतिरिक्त मोजता न येणाऱ्याही काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. त्यामुळे सध्या तरी आमच्याकडे असलेल्या माहितीचा अभ्यास आम्ही करत आहोत. काही देशांनी कोरोनासोबत विविध आजार असणाऱ्या नागरिकांना तिसऱ्या डोसची (Booster Dose in India) परवानगी दिली आहे. भारतात सध्या पॉझिटिव्हिटी रेट दोन टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे देशात अजून तरी बूस्टर डोसची गरज नाही. डॉ. व्ही.के. पॉल, कोविड-19 टास्क फोर्सचे (Covid-19 Task Force) प्रमुख - सुरुवातीला तुम्हाला पत्रकार परिषदांच्या माध्यमातून नागरिकांना लसीकरणासाठी विनंती करावी लागत होती, तिथपासून ते आतापर्यंतचा प्रवास कसा राहिला? - सुरुवातीला नागरिकांनी लसीकरणाकडे फिरवलेली पाठ आणि आता एक अब्जचा टप्पा हा खरंच खूप अविस्मरणीय प्रवास आहे. अर्थात, कित्येकांना केवळ संकोच नाही, तर भीतीही आहे; पण त्यांना योग्य मार्गदर्शन करणं, लशीचं महत्त्व समजावणं आणि त्यांना लसीकरण केंद्रापर्यंत आणणं हे आपलं कर्तव्य आहे. हे वाचा - 100 कोटी लसीकरण Spice Jet नं केलं साजरं, विमानावर झळकले असे अनोखे PHOTOs लसीकरणाचा एक मोठा टप्पा आपण पार केला आहे; मात्र आता यातूनही मागे राहिलेल्यांपर्यंत पोहोचणं हे खरं चॅलेंज आहे. यासाठी आम्ही राज्यांना विनंती केली आहे. हे काम युद्धपातळीवर केलं जाणं गरजेचं आहे. यासाठी आमच्याकडे गावागावांमध्ये पोहोचू शकणारं आरोग्य कर्मचाऱ्यांचं मोठं सैन्य आहे. ज्यांना पहिला डोसही मिळाला नाही, त्या व्यक्तींना पहिला डोस मिळावा आणि ज्यांना पहिला डोस मिळाला आहे, ती व्यक्ती दुसरा डोस घेईल याची खात्री करणं हेच आता आमचं ध्येय आहे. - देशात आता पुरेसा लससाठा आहे. त्यामुळे सरकार लशींची कितपत निर्यात करण्याचा विचार करत आहे? - आम्ही देशालाच प्राधान्य देणार आहोत; मात्र निर्यातही सुरू राहणार आहे. यामध्ये संतुलन राखण्यात येईल. देशाला पुरेसा लससाठा उपलब्ध झाल्यानंतर बाकी लशी बाहेर निर्यात (Vaccine Export) करण्यात येणार आहेत आणि पहिल्यापासून तसंच होत आलं आहे. आम्ही ज्याप्रमाणे भारतासाठी काम करत आहोत, त्याचप्रमाणे इतर देशांच्या मदतीसाठीही करत आहोत. यातूनच आम्ही WHO COVAX यंत्रणा आणि इतर देशांना लशी पुरवत आहोत. पुढील वर्षीपासून इतर देशांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात करण्यात येईल. पृथ्वीवरच्या एकूण लोकसंख्येपैकी एका मोठ्या भागाचं लसीकरण करण्यात भारताचा मोलाचा वाटा असेल. डॉ. आर. एस. शर्मा, कोविन (CoWin) प्रमुख - कोविन पोर्टलच्या नजरेतून हा 100 कोटी लसीकरणाचा प्रवास कसा राहिला? - 16 जानेवारीला जेव्हा पंतप्रधान मोदींनी या मोहिमेची सुरूवात केली, तेव्हा हा प्रवास सुरू झाला. ही जगातली सर्वांत मोठी लसीकरण मोहीम आहे. आम्ही दर दिवसाला दोन लाख डोसेसपासून सुरुवात केली आणि ही संख्या वाढणार असल्याची कल्पना आम्हाला होती; पण ही संख्या वाढून अगदी दहा लाख डोस प्रतिदिन एवढी होईल याचा कोणालाही अंदाज नव्हता. जगातल्या कोणत्याही अॅपने (CoWin App) एवढ्या कमी वेळात एवढी मोठी संख्या गाठली नाही. आम्हाला केवळ आमच्या अॅपचाच नाही, तर या देशातल्या नागरिकांचाही अभिमान आहे. आपल्याकडचे डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी आणि लसीकरण केंद्रावरील कर्मचारी यांच्याशिवाय ही कामगिरी केवळ अशक्य होती. - कोविन अॅप लाँच झालं, तेव्हा ग्रामीण भागात ते पोहोचेल का याबाबत कित्येकांनी शंका व्यक्त केली होती. सरकारने ही दरी कशी भरून काढली? - कोविन हे नागरिकांसाठी बनवण्यात आलेलं सर्वसमावेशक आणि पारदर्शक अॅप आहे. या अॅपवर गरजेची सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध आहे. सरकारने नागरिकांमध्ये याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. “कोविन पे रजिस्टर किया क्या?”, “कोविन पे देखो, व्हॅक्सिनेशन स्लॉट है क्या?” अशा प्रकारच्या स्लोगन्सच्या माध्यमातून कोविन लोकांपर्यंत आणि घराघरांमध्ये पोहोचलं. हे अॅप अगदीच साधं आणि पारदर्शक असल्यामुळे कोणीही ते वापरू शकत होतं. यामुळेच ते ग्रामीण भागापर्यंतही आरामात पोहोचलं. - देशातल्या लसीकरणात कोविनचा आणि अर्थातच तुमचा मोठा वाटा राहिला आहे. तुमच्यासमोर या मोहिमेत सर्वांत मोठं आव्हान काय होतं? - केवळ तंत्रज्ञानाच्या अभावामुळे लोक लसीकरणापासून वंचित राहू नयेत यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. कित्येक ठिकाणी नागरिक किंवा ऑपरेटर्स माहिती भरताना चुका करत होते आणि या चुकांचं खापर कोविनवर फोडण्यात येत होतं. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीने पहिला डोस आपला मोबाइल नंबर वापरून घेतला आणि दुसरा डोस पत्नीचा मोबाईल नंबर वापरून घेतला, तर सिस्टीम त्याला दोन पहिले डोस असं समजेल. अशा वेळी ती व्यक्ती मला दोन पहिले डोस मिळाले, पण दुसरा डोस नाही मिळाला असं म्हणू लागेल. हे वाचा - लहान मुलांच्या लसीकरणाविषयी मोठी बातमी! COVOVAX ला या महिन्यात मिळणार मान्यता कोविन हे एक सॉफ्टवेअर आहे. आयटीमध्ये एक म्हण (GIGO) आहे, की तुम्ही कचरा आत टाकलात, तर कचराच बाहेर पडेल. म्हणजेच, तुम्ही चुकीची माहिती भरलीत, तर चुकीचेच निष्कर्ष मिळतील. आम्ही आता बऱ्याच चुका दुरुस्त केल्या आहेत. तुम्ही तुमच्या लसीकरण प्रमाणपत्रातल्या कित्येक चुका आता दुरूस्त करू शकता. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशामध्ये जेव्हा एखादं सॉफ्टवेअर तयार केलं जातं, तेव्हा ते सर्वसमावेशक असणं गरजेचं असतं. कोविन ही महत्त्वाची चाचणी पास करतं. देशात डिजिटली रेकॉर्ड झाल्याशिवाय एकही कोविड डोस दिला जाणार नाही याची काळजी आम्ही घेतली. हे केलं नसतं, तर कोणी किती डोस घेतले किंवा पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये किती दिवसांचं अंतर ठेवलं याचा थांगपत्ताच लागला नसता. अशा बऱ्याच गोष्टींचा विचार करून कोविन तयार करण्यात आले होते. - भारतात पब्लिक हेल्थ सिस्टिमसाठी डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यासाठी कोविनचा हा अनुभव कसा कामी येईल? - कोविनचाच (CoWIN other usages) वापर आता अनेक गोष्टींसाठी करता येऊ शकतो. ब्लड बँक, लसीकरण मोहीम, अवयवदान अशा विविध ठिकाणी याचा वापर होऊ शकतो. तसंच, या प्लॅटफॉर्मचं डिझाइन वापरून असेच विविध प्लॅटफॉर्म्स तयार करता येऊ शकतात. डॉ. एन. के. अरोरा, एनटीएजीआय (National Technical Advisory Group on Immunisation) प्रमुख - लहान मुलांसाठीचं लसीकरण कधी सुरू होईल? - आम्ही सध्या घातक आजार होण्याची अधिक शक्यता असणाऱ्या मुलांची यादी तयार करत आहोत. लहान मुलांना रोगलक्षणात्मक आजार शक्यतो होत नाहीत किंवा अगदी कमी प्रमाणात होतात. अगदी घातक आजार होण्याची शक्यता लहान मुलांमध्ये कमी असते. त्यामुळे अशा मुलांना आम्ही प्राधान्य देणार आहोत. भारताची लोकसंख्या पाहता अशा मुलांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. साधारणपणे पुढच्या महिन्यात (Vaccination in Children) आम्ही या मुलांचं लसीकरण सुरू करू. हे वाचा - Mumbai Local विद्यार्थ्यांसाठीही खुली! मिळणार महिन्याचा पास; अशी आहे प्रक्रिया या मुलांचं लसीकरण पूर्ण झाल्यानंतर, साधारणपणे 2022 च्या पहिल्या तिमाहीत आम्ही दोन वर्षं आणि त्यापुढील निरोगी लहान मुलांचं लसीकरण (India Children vaccination) सुरू करू. ज्याप्रमाणे अगदी कमी वेळेत आपण प्रौढांच्या लसीकरणाचा मोठा टप्पा गाठला आहे, तसंच देशातल्या 44 कोटी लहान मुलांचं लसीकरणही वेगाने पूर्ण होईल अशी मला खात्री आहे. - लसीकरण मोहिमेतले काही महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेतले होते. ही मोहीम योग्य मार्गावर आहे का, याबाबत कधी तुम्हाला काळजी वाटली होती? - लसीकरणाबाबत कोणताही निर्णय हा पुरावे आणि फॅक्ट्सवर आधारित असावा हे सूत्र आम्ही पहिल्यापासून पाळत आलो आहोत. यामुळे आमच्या निर्णयांवर आम्हाला खात्री होती. अशा खूप कमी वेळा होत्या जेव्हा आम्हाला वाटलं, की अमुक एक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करायला हवी होती. आजच्या या दिवसाची तयारी खरं तर 2020च्या फेब्रुवारीमध्येच सुरू करण्यात आली होती. मला विचाराल, तर या प्रवासात देश अधिक आत्मविश्वासाने पुढे आला आहे. डॉ. रेणू स्वरूप, विज्ञान मंत्रालयाच्या बायोटेक विभागाचे (Biotech Dept, Ministry of Science) सचिव - संशोधन क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात झालेली गुंतवणूक देशाला कशा प्रकारे फायद्याची ठरू शकते? - 2025 पूर्वी देशातल्या बायो सेक्टरने 150 बिलियन रुपयांची बायो-इकॉनॉमी आणि 100 बिलियन रुपयांचं बायो मॅन्युफॅक्चरिंग हब (Bio Manufacturing hub) उभारायला हवं असं आव्हान आमच्यासमोर आहे. गेल्या वर्षीच हे आकडे आमच्यासमोर ठेवण्यात आले होते. आज एका वर्षानंतर आम्हाला खात्री आहे की हे आव्हान आम्ही यशस्वीरीत्या पेलून दाखवू. देशातलं उपलब्ध मनुष्यबळ, वाढलेली क्षमता आणि गरजेला धावून जाण्याची संस्कृती हेच आम्हाला आमचं ध्येय गाठण्यात, देशाला आत्मनिर्भर बनवण्यात आणि भारताला ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब (India as Global Manufacturing hub) बनवण्यात मदत करणार आहे. - भारत लशींचा निर्माता कसा झाला? - जगभरात भारताची ओळख केवळ मोठ्या संख्येने नव्हे, तर चांगल्या प्रतीच्या लशी बनवण्यासाठी झाली आहे. कोरोनाचे थैमान सुरू झाल्यानंतर लशीच्या निर्मितीबाबत विचार करणाऱ्या पहिल्या काही देशांमध्ये भारताचा समावेश होता. सरकारने लसनिर्मिती कंपन्यांसोबत मिळून काम केलं. त्यामुळेच अगदी कमी वेळेत लस केवळ तयारच नाही झाली, तर तिच्या आपत्कालीन वापराला मंजुरीही मिळाली. यामुळे जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोनही मोठ्या प्रमाणात बदलला. डॉ. शेखर मांडे, सीएसआयआरचे (CSIR) प्रमुख संचालक - कोरोनाच्या या लढाईतून आपण सर्वांनी काय धडे घेतले? तुम्ही काय सांगाल? - सर्वांनीच कोरोनाच्या या लढाईतून काही ना काही शिकण्यासारखं आहे. प्रशासन असो, राज्य सरकार असो, वैज्ञानिक, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी किंवा सामान्य माणूस असो; या सर्वांसाठी ही संपूर्ण महामारी एक मोठा धडा ठरली आहे. हे वाचा - एकही मृत्यूची नोंद नाही, महापौरांच्या प्रतिक्रियेनं उंचावेल पुणेकरांची मान मला विचाराल तर, आपण या काळात एकमेकांसोबत मिळून कसं काम करता येईल हे शिकलो. अगदी लस बनवणारा वैज्ञानिक असो, ते मग लस पोहोचवणारी व्यक्ती असो. सर्वांच्याच कामात एक योग्य ताळमेळ दिसून आला. हे जणू एखाद्या मोठ्या संगीत मैफलीप्रमाणे होतं, जिथे समोर गाणारी व्यक्ती आणि मागे वाद्य वाजवणाऱ्या सर्व व्यक्ती यांच्यात योग्य ताळमेळ होता. या मोठ्या चमूने सामान्यांना कोरोनाची झळ बसण्यापासून वाचवले. यासोबतच, लोकांचा विज्ञानावरचा विश्वास वाढला. खरंच डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल देशातल्या नागरिकांचं अभिनंदन करायला हवं. तसंच, प्रशासनाचंही अभिनंदन करणं गरजेचं आहे. या संपूर्ण काळात कित्येक अशा गोष्टी घडल्या ज्या आपण अभिमानाने पुढील कित्येक पिढ्यांना सांगू शकू.
First published: