भारतातील कोरोना लसीकऱणाचा आकडा 100 कोटींच्या पार पोहोचला आहे. लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर केवळ 279 दिवसांत हा विक्रम घडला आहे. भारतात दहा महिन्यांपूर्वी 16 जानेवारी 2021 या दिवशी लसीकरणाला सुरुवात झाली होती. त्यानंतर भारतानं हा विक्रम पूर्ण केला आहे.
सर्वाधिक लसीकरण झालेल्या राज्यांच्या यादीत लोकसंख्येच्या दृष्टीनं सर्वात मोठ्या राज्यांचा समावेश आहे. सर्वाधिक लसीकरण उत्तर प्रदेश झालं आहे. उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत 12,21,60,335 डोस दिले गेले आहेत. तर महाराष्ट्रात 9,32,25,506 डोस देण्यात आले आहेत. तिसरा नंबर पश्चिम बंगालचा आहे. बंगालमध्ये आतापर्यंत 6,85,28,936 डोस देण्यात आले आहेत. तर गुजरातमध्ये 6,76,87,913 डोस देण्यात आले आहेत.
देशातील काही राज्यांमध्ये 100 टक्के नागरिकांना पहिला डोस देण्याचं काम पूर्ण झालं आहे. यामध्ये सिक्कीम, गोवा, हिमाचल प्रदेश, लडाख, चंदीगढ, लक्ष्यद्वीप, दादरा नगर हवेली या राज्यांचा समावेश आहे.
देशातील लसीकरणाने वेग घेतल्यामुळे भारत परकीय प्रवाशांसाठी दरवाजे उघडणार आहे. त्यासाठी काही नियम निश्चित करण्यात आले असून आरोग्य मंत्रालयानं RT-PCR टेस्ट बंधनकारक केली आहे.
देशातील कोरोनाचे रुग्ण घटत असून चार्टर्ड फ्लाईटनं येणाऱ्या नागरिकांना टूरिस्ट व्हिसा देण्याचा निर्णय सरकानं घेतला आहे.