Home /News /career /

नोकरी शोधणाऱ्यांसाठी पुण्यातील स्टार्टअप ठरणार संजीवनी? एका महिन्यात 800 इच्छुकांचे अर्ज

नोकरी शोधणाऱ्यांसाठी पुण्यातील स्टार्टअप ठरणार संजीवनी? एका महिन्यात 800 इच्छुकांचे अर्ज

कंपनीचं सध्याचं कार्यक्षेत्र पुणे आहे. मात्र, त्यांना जम्मू आणि काश्मीर, चंदीगड आणि बिहारमधून व्हॉईस-ओव्हर कलाकार आणि अभिनेते असलेले अर्जदार मिळू लागले आहेत.

    पुणे, 8 मार्च : कोरोना काळातून देश अलीकडेच सावरू लागला आहे; मात्र अद्याप तो पूर्वपदावर आलेला नाही. नोकऱ्या गेलेल्या कित्येकांना पुन्हा नोकरी मिळालेली नाही किंवा मिळाली असलीच तरी कमी पगाराची. थोड्याफार प्रमाणात सर्वच क्षेत्रांत हे चित्र असलं, तरी मीडिया, कंटेंट, फोटोग्राफी आणि एकंदरीतच अशा क्रिएटिव्ह क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत या क्षेत्रातले अनेक जण स्वतंत्रपणे व्यवसाय करत आहेत किंवा नोकरीपेक्षा फ्रीलान्सर म्हणून काम करण्याला प्राधान्य देत आहेत. असे फ्रीलान्सर्स आणि त्यांना कामाची संधी देऊ शकतील असे एम्प्लॉयर्स यांच्यात दुवा बनेल अशी कास्ट इंडिया (Cast India) ही स्टार्टअप कंपनी फेब्रुवारी 2022मध्ये पुण्यात सुरू झाली आहे. अशा कंपनीची किती गरज होती हे एकाच महिन्यात स्पष्ट झालं आहे. कारण काम मिळवू इच्छिणाऱ्या 800 व्यक्ती आणि चांगले कर्मचारी मिळवू इच्छिणाऱ्या 40 कंपन्यांनी एका महिन्याच्या कालावधीत 'कास्ट इंडिया'कडे नोंदणी केली आहे. तसंच सध्या तरी कंपनीचं कार्यक्षेत्र प्रामुख्याने पुणे असलं, तरी अगदी थेट जम्मू-काश्मीर, चंडीगड, बिहारमधूनही अनेक उमेदवारांचे अर्ज कंपनीकडे आले आहेत. त्यात व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट्ससह (Voice Over Artists) अभिनय क्षेत्रातल्या व्यक्तींचाही समावेश आहे. 'इंडियन एक्स्प्रेस'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. प्रद्युम्न बापट (Pradyumna Bapat) हे कंपनीचे सीईओ असून, पुलकित जैन (Pulkit Jain) हे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर आहेत. फिल्म अँड टेलिव्हिजन, मीडिया, जाहिरात, पब्लिक रिलेशन्स, इव्हेंट्स, मार्केटिंग अशा क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून या दोघांनी महिन्याभरापूर्वी या कंपनीची स्थापना केली. बापट यांनी सांगितलं, 'कोरोनानंतर या क्षेत्रात नोकऱ्या घटल्या, पगार कमी झाले आणि अनेक प्रोफेशनल्सनी स्वतंत्रपणे काम सुरू केलं. त्यापैकी अनेकांना त्यांचं काम सर्वोत्तम रीतीने येत असतं; मात्र त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत किंवा अपेक्षित पगार मिळत नाही. अनेक कंपन्यांना सोशल मीडिया एक्सपर्ट्स (Social Media Experts) हवे असतात. तसंच अनेक कंपन्या डिझायनर्स, सोशल मीडिया एक्सपर्ट्स, एन्फ्लुएन्सर्स काँट्रॅक्टवर घेऊ इच्छितात. हे पाहून आम्ही या दोन्हींमधला दुवा व्हायचं ठरवलं.' विद्यार्थ्यांनो, शिक्षण घेण्यासोबतच करा 'या' महत्त्वाच्या गोष्टी; लगेच मिळेल Job ग्राफिक डिझायनर्स, सोशल मीडिया एक्सपर्ट्स, ब्रोशर्स-फ्लायर्समधले जाणकार, ब्लॉग कंटेंट रायटर्स, शूटसाठी मॉडेल्स अशी वेगवेगळी 350हून अधिक प्रोफाइल्स कंपनीने निश्चित केली आहेत. कंपन्यांना या क्षेत्रातल्या व्यक्ती हव्या असतात, मात्र त्यावर जास्त गुंतवणूक करण्यासाठी अजूनही त्या धजावत नाहीत. अशा स्थितीत काँट्रॅक्टवर (Contract) चांगल्या व्यक्ती मिळाल्यास त्यांचं काम होऊन जातं. एक कोटी रुपयांची गुंतवणूक कास्ट इंडियामध्ये करण्यात आली आहे. सध्या तरी ही सेवा कंपन्या आणि इच्छुक उमेदवार अशा दोघांसाठीही मोफत आहे; मात्र काही दिवसांत उमेदवारांसाठी प्रति दिन एक रुपया आणि कंपन्यांसाठी प्रति महिना 349 रुपये आकारले जाणार आहेत. दोन्ही बाजूंची भेट घडवून आणणारा रिलेशनशिप मॅनेजरही लवकरच नियुक्त केला जाणार आहे. CBSE Term1 Result: विद्यार्थ्यांनो, या आठवड्यात निकाल जाहीर होण्याची शक्यता 'स्थानिक प्रोफेशनल्स आणि एम्प्लॉयर्स यांना एकमेकांशी जोडून देणं हे आमचं उद्दिष्ट आहे,' असं बापट यांनी सांगितलं. 2024पर्यंत जाहिरात उद्योगात 11 टक्के, मीडिया, फिल्म, टीव्ही क्षेत्रात 9 टक्के, पब्लिक रिलेशन्स क्षेत्रात 10.50 टक्के, तर इव्हेंट्स क्षेत्रात 11 टक्के वाढ होण्याचा अंदाज असून, त्यामुळे बाजारपेठेत अनेक उमेदवारांना संधी उपलब्ध होतील, असा विश्वासही बापट यांनी व्यक्त केला.
    First published:

    Tags: Pune, Startup

    पुढील बातम्या